सर्वव्यापी ए. आय. (AI)

ए. आय.चा वापर करताना व्यक्ती, समुदाय आणि सरकार यांना योग्य तो समतोल साधणे आवश्यक
AI
भारतासारख्या १.४ अब्जांहून अधिक लोकसंख्येच्या देशात ए.आय. हे अत्यंत प्रभावी साधन म्हणून वापरलं जाऊ लागलं आहे.(file photo)
Published on
Updated on
डॉ. योगेश प्र. जाधव, समूह संपादक, दै. पुढारी

भारतासारख्या १.४ अब्जांहून अधिक लोकसंख्येच्या देशात ए.आय. हे अत्यंत प्रभावी साधन म्हणून वापरलं जाऊ लागलं आहे. साहजिकच ज्या वेगाने ए.आय. चा प्रभाव वाढतो आहे ते पाहता ए.आय.च्या नैतिक वापराबाबत, अनपेक्षित परिणामांबाबत आणि संभाव्य दुरुपयोगाबाबत चिंता व्यक्त होऊ लागल्या आहेत. ए. आय. चा वापर करताना व्यक्ती, समुदाय व सरकार यांना योग्य तो समतोल साधणे आवश्यक आहे. ए.आय.च्या इतक्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे तयार झालेली आव्हाने कोणती आणि ती आव्हाने पेलण्यासाठी आपण काय करायला हवं, याचा विचार करणं आवश्यक आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए. आय. ही गोष्ट एखाद्या विज्ञान कथेसारखी वाटण्याचा एक काळ होता. ए.आय. खरंच अस्तित्वात आलं तर काय होईल, याच्या सुरस आणि चमत्कारिक भविष्यकथा आपण चवीने वाचत - सांगत असू. आज काळ बदलला. त्या गोष्टींमध्ये कल्पिलेला भविष्यकाळ आता प्रत्यक्षात आला आहे. तंत्रज्ञानाच्या आणि संवादाच्या क्षेत्रात झालेली क्रांती ही गेल्या दोन दशकात घडलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट. त्याचबरोबर मानवी बुद्धिमत्ता विकसित होत गेली आणि आज ती अशा वळणावर आहे, की आपल्या रोजच्या जगण्यात आपण अत्यंत सहजपणे ए.आय.चा वापर करू लागलो आहोत. आपण जेव्हा एखादे सोशल मीडिया अॅप्लिकेशन वापरतो, तेव्हा त्यावर दिसणाऱ्या जाहिराती निश्चित करणारे अल्गोरिदम, इथंपासून ते पोलिस गुन्हेगार शोधून काढण्यासाठी वापरतात तो फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान असलेला ए.आय., इथंपर्यंत आपल्या जीवनात आता या तंत्रज्ञानाचा वापर होतोय.

स्मार्टफोन आपल्याला गुगल मॅपच्या मदतीने कोणत्या रस्त्याला जास्त ट्रॅफिक आहे हे दाखवतात, गर्दीचा मार्ग टाळून दुसरा मार्ग सुचवतात, अनेक ई-लर्निंग अॅप्लिकेशन्स आणि त्यांचे शैक्षणिक प्लॅटफॉर्म्स विद्यार्थ्यांच्या क्षमता व त्यांच्यातील कमतरता काय आहेत, हे ओळखण्यासाठी आणि त्यानुसार त्यांना शिक्षण देण्यासाठी ए.आय.चा वापर करतात, Practo सारख्या टेलीमेडिसिन सेवा ए.आय.च्या साहाय्याने रुग्णांच्या तक्रारींचे वर्गीकरण करतात आणि योग्य वेळी योग्य सेवा देतात. ई कॉमर्सच्या क्षेत्रात तर ए. आय. ने अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. आपण ज्याला कस्टमर एक्सपिरियन्स म्हणतो, तो अधिकाधिक विकसित करण्यातही ई कॉमर्स कंपन्या ए.आय.चा वापर करतात. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारखे प्लॅटफॉर्म्स ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासाठी ए.आय.चा वापर करतात.

स्पोटिफाय आणि नेटफलिक्स यासारखे मनोरंजन सुविधा पुरवणारे अॅप्लिकेशन्स आपल्या युजर्ससाठी ए.आय. क्युरेटेड प्लेलिस्ट तयार करतात. गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या कंपन्या शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार आपल्या ग्राहकांना सल्ला देण्यासाठी ए.आय.चा वापर करतात. भारतासारख्या १.४ अब्जांहून अधिक लोकसंख्येच्या देशात तर ए.आय. हे अत्यंत प्रभावी साधन म्हणून वापरलं जाऊ लागलं आहे. साहजिकच ज्या वेगाने ए.आय.चा प्रभाव वाढतो आहे ते पाहता ए.आय.च्या नैतिक वापराबाबत, अनपेक्षित परिणामांबाबत आणि संभाव्य दुरुपयोगाबाबत चिंता व्यक्त होऊ लागल्या आहेत.

ए.आय. चा वापर करताना व्यक्ती, समुदाय व सरकार यांना योग्य तो समतोल साधणे आवश्यक आहे. ए.आय.च्या इतक्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे तयार झालेली आव्हाने कोणती, आणि ती आव्हाने पेलण्यासाठी आपण काय करायला हवं, याचा विचार करणं आवश्यक आहे. ए.आय.च्या सर्वव्यापी वापरामुळे आपली असंख्य कामे सुलभ झाली असली, तरी त्यातून काही गंभीर आव्हानेही आपल्यासमोर उभी ठाकली आहेत. आज ए.आय. तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेलं आहे. आपण गुगल सर्च करतो, युट्यूब पाहतो, सोशल मीडिया वापरतो, एखादी झूम मीटिंग करतो, ऑनलाईन काहीतरी खरेदी करतो, त्या प्रत्येक गोष्टीत आपण ए.आय.चा वापर करतो. त्यामुळे ए. आय. आता आपल्या रोजच्या वापरात सर्रास येऊ लागलं आहे.

मानवी मर्यादांच्या पलीकडे असलेली किचकट कामे करण्याचा वेग ए.आय.कडे आहे. चॅटजीपीटीसारख्या कमी काळातच लोकप्रिय झालेल्या ए.आय. टूलने तर आपली अनेक कामे कल्पनेच्या पलीकडे सोपी करून ठेवली आहेत. मेल लिहिणे, कविता लिहिणे, चित्र काढणे, व्हिडीओ बनवणे अशा अनेक कलात्मक कामातही ए. आय. आता अत्यंत प्रभावीपणे काम करू लागलं आहे. परंतु ए. आय. काम करत असताना सुरू आलेल्या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत डेटा हा जो अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, तोच अनेकदा सदोष आणि पक्षपाती असल्यामुळे ए.आय.ने घेतलेले निर्णय, त्यातून मिळालेली उत्तरेही पक्षपाती असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे जिथे जिथे ए.आय.चा वापर होतोय, त्या प्रत्येक ठिकाणी बायस अस्तित्वात आहे. या बायसमुळे अनेक चुकीचे, सदोष परिणाम ए.आय. कडून मिळतात.

कोणताही अल्गोरिदम हा ऐतिहासिक डेटावर आधारित असल्यामुळे त्या डेटामध्ये असलेल्या पूर्वग्रहांचे प्रतिबिंब त्यांच्यात दिसते. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या भरती प्रक्रियेत त्या कंपनीतील पूर्वीच्या भरतीच्या डेटाचा वापर केला जातो. त्या डेटाचा वापर करून तयार झालेला अल्गोरिदम लिंग किंवा जातीवर आधारित पूर्वग्रह कायम ठेवू शकतो आणि त्यामुळे पात्र उमेदवार दुर्लक्षिले जाऊ शकतात. डेटा प्रायव्हसी ही आणखी एक महत्त्वाची समस्या आहे. ए.आय. प्रणालींना डेटा आवश्यक असतो, परंतु भारतासारख्या देशात डेटा संरक्षणाचे कायदे अजून विकसित होत आहेत. नागरिक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक माहितीचा अर्थ न कळल्यामुळे ती सहजपणे शेअर करतात. त्यातून त्या माहितीचा गैरवापर, देखरेख आणि मूलभूत हक्कांच्या संभाव्य हननाचा प्रश्नही उभा राहतो.

गुगलच्या संशोधकांनी भारतात वापरल्या जाणाऱ्या ए.आय.च्या अल्गोरिदमचा अभ्यास केला. त्या अभ्यासात आपण वापरत असलेल्या अल्गोरिदमच्या नि:पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. ए.आय.चा गाभा असलेलं तंत्रज्ञान हेच मुळात पश्चिमेकडील देशात विकसित झालेलं आहे. त्याचा विकास हा पश्चिमेकडील देशांच्या, तिथल्या समाजाच्या गरजांना पूरक ठरेल, अशा पद्धतीने झालेला आहे. ते तंत्रज्ञान भारतात वापरलं जातं तेव्हा आपल्या वापराच्या दृष्टीने डेटा गोळा करून त्याचं अवलोकन पुरेशा अचूकतेने होत नाही. त्यामुळे भारतीय परिस्थितीसाठी अर्धवट विकसित झालेल्या या ए. आय. ने दिलेला रिझल्ट पक्षपाती असतो.

या पक्षपाताचा परिणाम भारतात वेगवेगळ्या समूहांसाठी अन्यायकारक असू शकतो. महत्त्वाचं म्हणजे भारतात आजही ज्यांच्यापर्यंत इंटरनेट पोहोचू शकलेलं नाही, अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिजिटल फुटप्रिंट फक्त त्यांचीच तयार होते, जे इंटरनेटचा वापर करतात. ए.आय.ला ट्रेन करण्यासाठी जो डेटा वापरला जातो त्यात या समूहांचं प्रतिनिधित्व अत्यंत कमी, काहीवेळा तर शून्य असतं, परंतु अशा डेटामधून तयार झालेल्या ए.आय.चे रिझल्ट मात्र प्रत्येकाला लागू होतात. त्यातून जास्त प्रतिनिधित्व मिळालेल्या समूहाच्या बाजूने पक्षपाती असणारा निर्णय ए.आय. देऊ लागतं. ही सर्व उदाहरणे पाहता भारतात कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये ए.आय.मधला बायस अन्यायकारक ठरू शकतो, याची चाचपणी सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

परंतु यातून एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ए. आय. ला ट्रेन करण्यासाठी वापरला जाणारा डेटा, तो पुरवणारी माणसेच जर पक्षपाती असतील तर तो ए.आय. निःपक्ष असू शकत नाही. म्हणूनच ए.आय.चा बायस कमी करण्यासाठी अभ्यासक सुचवतात तो उपाय म्हणजे मशिनला डेटा फीड करताना तो पूर्णपणे तपासून, त्यात संपूर्ण लोकसंख्येला पुरेसं प्रतिनिधित्व मिळतंय की नाही, याची खात्री करून डेटा पुरवायला हवा. ए.आय.च्या क्रांतीमुळे उभी राहिलेली ही सगळी आव्हाने लक्षात घेतली तर काय दिसतं? व्यक्ती, समाज आणि शासन या तिन्ही स्तरांवर आपल्याला ही आव्हाने समजून घ्यावी लागतील. त्यांची उत्तरे शोधावी लागतील. व्यक्तींच्या पातळीवर जबाबदारीने ए. आय. चा वापर करण्याची सुरुवात जागरूकतेने होते. ए. आय. प्रणाली कशा कार्य करतात, त्यांचा डेटा कसा वापरला जातो आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत, हे समजून घेतल्याने वापरकर्त्यांना सारासार विवेकाने निवड करण्यास मदत होते. या नव्या तंत्रज्ञानातून काय ठेवायचं, वगळायचं, याचा सांगोपांग विचार करणं गरजेचं आहे.

अगदी लहान मूलही युट्यूब सर्च करताना चुकलेल्या स्पेलिंग्जसाठी ऑटोकरेक्ट आणि ऑटोसजेस्टचा आधार घेते. हेच मूल शाळेत हाताने स्पेलिंग लिहितं, जे आता तंत्रज्ञानाच्या वेगापुढे कालसुसंगत वाटत नाही. याला बेकायदेशीर किंवा अनैतिक म्हणायचं की उपयुक्त म्हणायचं, हे समाज म्हणून आपण किती प्रगत झालोय यावर अवलंबून आहे. शासकीय पातळीवर भारतात ए.आय. तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल अनेक कायदे विचाराधीन आहेत. तंत्रज्ञानाचा वापर होत असताना व्यक्तीचे मूलभूत हक्क, प्रायव्हसी, सुरक्षितता इत्यादी गोष्टींचे उल्लंघन होणार नाही याची शाश्वती देणाऱ्या नवीन कायद्यांची आपल्याला गरज आहे.

डेटा प्रायव्हसी बिलच्या निमित्ताने भारताने त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली असे म्हणता येईल, परंतु या बाबतीत जगभरातील इतर देशांच्या तुलनेत आपण अजूनही चाचपडत आहोत या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा असू शकेल, याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार नवीन कायदे आणि नियम आणण्यासाठी शासनाला अजून बरंच काम करावं लागेल. ए.आय.च्या वाढत्या प्रभावावर आर्थिक दृष्टीनेही काही आक्षेप घेतले जातात. ए. आय. मुळे सुपर फर्म्स तयार होतील, काही रोजगार अनावश्यक ठरून बेरोजगारीत वाढ होईल, संपत्ती आणि ज्ञानाची मक्तेदारी केंद्रे निर्माण होतील, अशी भीतीदेखील व्यक्त केली जाते.

अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे ए. आय. ज्या गतीने व्यापत आहे, ते पाहिल्यावर उत्पन्न विषमता निर्माण होऊ नये, यासाठी सामाजिक सुरक्षिततेच्या अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्ट्रांच्या धोरणकर्त्यांपुढे नजीकच्या भविष्यकाळातील हे आव्हान आहे आणि हे आव्हान कसे पेलले जाते, यावर देशांचा विकास अवलंबून राहील. या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा असू शकेल, याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार नवीन कायदे आणि नियम आणण्यासाठी शासनाला अजून बरंच काम करावं लागेल.

ए.आय.च्या वाढत्या प्रभावावर आर्थिक दृष्टीनेही काही आक्षेप घेतले जातात. ए. आय. मुळे सुपर फर्म्स तयार होतील, काही रोजगार अनावश्यक ठरून बेरोजगारीत वाढ होईल, संपत्ती आणि ज्ञानाची मक्तेदारी केंद्रे निर्माण होतील, अशी भीतीदेखील व्यक्त केली जाते. अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे ए. आय. ज्या गतीने व्यापत आहे, ते पाहिल्यावर उत्पन्न विषमता निर्माण होऊ नये, यासाठी सामाजिक सुरक्षिततेच्या अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राष्ट्रांच्या धोरणकर्त्यांपुढे नजीकच्या भविष्यकाळातील हे आव्हान आहे आणि हे आव्हान कसे पेलले जाते, यावर नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर त्यामुळे समाजात झपाट्याने बदल होतात, त्याला आपण डिसरप्शन म्हणतो

कॉम्प्युटर आलं, त्यानंतर इंटरनेट आलं आणि आता ए.आय. आलं. सुरुवातीच्या दोन्ही क्रांतींच्या तुलनेत मात्र ए.आय. तंत्रज्ञानाने घडवून आणलेली क्रांती अत्यंत वेगवान आहे. हे तंत्रज्ञान विकसित होण्याचा वेगच इतका आहे, की त्या वेगाला प्रतिसाद देण्याइतका विचार करण्याचा वेळही आपल्याकडे नाही. त्याचा झपाट्याने होत असलेला विकास आता आपण दुर्लक्षित करू शकत नाही आणि तो थांबवणंही माणसाच्या हिताचं नाही. कोणताही बाऊ न करता त्याच्या क्षमता समजून घेणं, आणि त्यानुसार स्वतःला अपडेट करत राहणं, हा त्याच्याशी जुळवून घेण्याचा योग्य मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news