

ए.आय.चा प्रवास थरारक आहे. आजच्या काळात ज्या गतिमानतेनं त्याचा वापर होत आहे, ते पाहून येणाऱ्या काळातत्याचं स्वरूप काय असेल, याविषयी उत्सुकता असणे साहजिकच आहे. येणाऱ्या काळात ए.आय. हे दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे. हे तंत्रज्ञानच वाईट आहे, असे म्हणता येणार नाही. आज अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा विधायक वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता AL महाक्रांती पुजारी चर्चांयत दिन विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेमध्ये कृत्रिम आणि बुद्धिमत्ता हे दोन भिन्न शब्द आहेत. मुळात आपण संगणकाला माणसासारखं बुद्धिमान म्हणू शकतो का, असा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून विविध तंत्रज्ञांच्या मनात होता; पण याची सुरुवात नेमकी कशा प्रकारे झाली हे सांगता येणार नसलं, तरी ॲलन ट्युरिंग या ब्रिटिश गणिततज्ज्ञ आणि संगणकतज्ज्ञाने याची मूळ कल्पना मांडलेली होती. त्याला त्याने 'ट्युरिंग' टेस्ट असं नाव दिलं होतं. या चाचणीचे थोडक्यात स्वरूप मोठं रंजक होतं. म्हणजे असं की, समजा दोन झाकलेल्या खोल्यांमध्ये एकीकडं माणूस आणि दुसऱ्या खोलीत संगणक बसवला आहे आणि कोणत्या खोलीत माणूस आहे आणि कोणत्या खोलीत संगणक आहे, हे आपल्याला माहीत नाही. अशा स्थितीत दोघांनाही समान प्रश्न विचारून त्यातून येणाऱ्या उत्तरांवरून आपण संगणक कुठे आहे आणि माणूस कुठे आहे, हे ओळखायचे. या चाचणीतून दोन्ही ठिकाणची उत्तरं एकसारखी आल्यास आपल्याला असं म्हणता येईल की, माणूस आणि संगणक या दोन्हींच्या बुद्धिमत्तेत फार फरक करता येणार नाही. ही चाचणी अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती. आजचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान आणि ट्युरिंग टेस्ट यांच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे; पण ही एक सुरुवात होती हे निश्चित. त्यानंतर बऱ्याच दशकांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगानं पार पडलेल्या एका परिषदेमध्ये जॉन मॅकार्थी या शास्त्रज्ञानं ही संकल्पना पहिल्यांदा मांडली होती. अलीकडच्या काळातलं त्याचं टोकाचं स्वरूप आलं, त्याला सिंग्युलॅरिटीची संकल्पना म्हणतात. याचा अर्थ माणूस आणि संगणक यांच्यातील फरकच जवळपास संपुष्टात येईल आणि ते सिंग्युलर म्हणजे एकच रूप असल्यासारखं होईल. असा हा ए.आय. चा थरारक प्रवास असून तो अवघ्या सात दशकांमध्ये इतका विस्तीर्ण व अफाट व्हावा. हे त्यातलं सर्वांत मोठं नवल आहे.
अर्थात, बऱ्याच तंत्रज्ञानांबाबत असं घडतं. उदाहरणच घ्यायचं झाल्यास बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीमागचं जे ब्लॉकचेन तंत्रज्ञान आहे, त्याची पायाभरणी १९९० च्या दशकामध्ये झाली होती; पण प्रत्यक्षात बिटकॉईन अवतरायला २००८ साल उजाडलं. बरेचदा असं होतं, की तंत्रज्ञान तयार असतं; पण त्याचा वापर नेमका कशासाठी करायचा, याचा उलगडा होत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत असं म्हणता येणार नाही; परंतु एक काळ असा आला होता, ज्यावेळी कागदोपत्री सगळं काही तयार होतं; पण प्रत्यक्षात ते कसं अवतरणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी संगणकामध्ये लागणारं तंत्रज्ञान, प्रोग्रॅमिंग, गणितं सगळं तयार होत चाललेलं होतं; पण ते एकत्रित स्वरूपात येऊन त्याला वापरण्याजोगा साचा किंवा स्वरूप अलीकडच्या काळात आल्यामुळं या तंत्रज्ञानानं प्रचंड वेग धारण केलेला आहे. संगणकांचा वेग आणि त्यांची क्षमता कल्पनेपलीकडे वाढत चाललेली असल्यामुळं हे शक्य झालं आहे.
आजच्या काळात ए.आय.चा वापर ज्या गतिमानतेनं होत आहे, ते पाहून येणाऱ्या काळात याचं स्वरूप काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत जागतिक पातळीवरील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली भीती एका बाजूला आहे आणि त्यानुसार उद्या हे तंत्रज्ञान माणसालाच नष्ट करेल, अशा शक्यता व्यक्त होत आहेत; तर इतक्या टोकाला हे तंत्रज्ञान जाणार नाही, कारण माणूस त्याला नियंत्रित करू शकेल, असं म्हणणारा दुसरा गट आहे. माणसाचं त्याच्यावरचं नियंत्रण राहण्याची शक्यता का आहे? याचं कारण माणसामध्ये असणारी भावना संगणकांमध्ये येणं शक्य नाही. कारण त्यासाठी शरीरामध्ये डीएनएसहीत अन्य जैविक गोष्टी असणं आवश्यक असतं. त्या संगणकांमध्ये येणं शक्य नाही. पुढच्या क्षणी माणूस काय विचार करेल, हे कुणीही सांगू शकत नाही. संगणकात अशी प्रणाली आपण बसवू शकत नाही. परंतु संगणकाला जर विचार करण्याची क्षमताच नसेल आणि तो जर मानवाने तयार केलेल्या नियमांप्रमाणेच चालत असेल, तर मानवातील कुटिल बुद्धीही त्याच्यात अप्रत्यक्षपणानं येणारच आहे. किंबहुना आज या कुटिल बुद्धीतून आखले जाणारे डावपेच संगणकांना अप्रत्यक्षपणानं शिकवले जातच आहेत; पण माणसाची सारासार विचारशक्ती त्याच्यामध्ये नसल्यामुळं उद्याच्या भविष्यात जर मानवानं शिकवलेल्या नियमांनुसार संगणक हा दोनपैकी कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, हे ठरवून ती कृतीतून अमलात आणू लागल्यास अनर्थ घडण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, त्याला माणसाचाच राग आला आणि त्यानं यंत्रणा बंद पाडून माणसालाच संपवण्याचं ठरवलं तर काय होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे, असं म्हटलं जातं की अशा प्रकारची बुद्धी त्याच्यामध्ये कधीच असणारच नाही. त्यामुळं ए. आय. वर माणसाचंच नियंत्रण अबाधित राहील.
या दोन प्रमुख शक्यता आपापल्या पातळीवर कायम असतानाच ए. आय. चा प्रसार-प्रचार आणि वापर वाढत आहे. येणाऱ्या काळात दैनंदिन आयुष्यापासून विविध शास्त्रज्ञ ज्या क्षेत्रात काम करत असतात, तिथंपर्यंत ए.आय.चा परिणाम हा प्रचंड मोठा असणार आहे. याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञानच वाईट आहे असा बिलकुल नाही. आज अनेक क्षेत्रांमध्ये याचा विधायक वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्रात अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन करताना एखादा निष्णात हृदयरोगतज्ज्ञ असेल आणि त्यानं हजारो शस्त्रक्रिया केलेल्या असल्या, तरी बरेचदा त्याला रोगनिदान करताना किंवा उपचारप्रक्रिया करताना एखादी गोष्ट सापडत नाही किंवा त्याचा अनुभव थिटा ठरतो. याचं कारण त्यानं आजवर केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये तशा प्रकारची केस आलेलीच नसते. अशा मोक्याच्या क्षणी प्रचंड प्रकारच्या डेटाच्या अॅनालिसिसद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या डॉक्टरला काय करावं हे सुचवू शकतं. काही वर्षांपूर्वी ड्रायव्हरलेस कार या विज्ञानकथांचा एक भाग वाटत होत्या; भारतात त्यांचा वापर किती प्रभावी होऊ शकेल हा भाग अलाहिदा; पण आज त्या प्रत्यक्ष धावत आहेत.
अशाच प्रकारे बँकिंग क्षेत्रामध्ये कोणत्या व्यक्तीला कर्ज मिळावं आणि कोणता व्यक्ती कर्ज मिळण्यास अपात्र आहे, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका क्षणात सांगू शकतं. सुरक्षा यंत्रणांचा विचार केल्यास अलीकडच्या काळात विमानतळांवर ए.आय. चा वापर विलक्षण वाढला आहे. मानवी हस्तक्षेप त्यात खूप कमी प्रमाणात असतो. चेहरा ओळखण्यापासून, प्रवाशांच्या बॅगांमध्ये आक्षेपार्ह काही आहे का यासारख्या सर्व तपासण्या ए.आय.मार्फतच केल्या जातात. शिक्षणामध्ये ए.आय. चा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नेमके का इनपुटस् दिले पाहिजेत, त्यांची नेमकी कोणत्या विषयात कोणती समस्या आहे, याबाबत ए. आय प्रभावी ठरू शकते. राजकीय इच्छाशक्ती असेल तर शासनव्यवस्था सुधारण्यामध्ये ए. आय. चा वापर विलक्षण परिवर्तन घडवून आणू शकतो. ए.आय.संदर्भातील चर्चांमध्ये मशिन लर्निंग हा शब्द नेहमी येताना दिसतो. मशिन लर्निंग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्राथमिक अवस्था आहे. 'मशिन लर्निंग'चे 'सुपरव्हाईज्ड' म्हणजे देखरेखीखाली होणारे आणि 'अनसुपरव्हाईज्ड' म्हणजेच देखरेखीविना होणारे असे दोन प्रकार असतात. आपण आपल्या अनुभवांमधून शिकत जातो. म्हणजेच आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींनुसार आपण पुढच्या
आयुष्यातील निर्णय घेत जातो. असाच प्रकार 'सुपरव्हाईज्ड मशिन लर्निंग'च्या बाबतीत घडतो. यामध्ये संगणकाला पुरविलेल्या माहितीच्या आधारे तो काही नियम तयार करतो आणि या नियमांच्या आधारे संगणक पुढच्या प्रसंगांमध्ये त्याला योग्य वाटेल अशी कृती करीत राहतो. याउलट 'अनसुपरव्हाईज्ड मशिन लर्निंग'मध्ये संगणकाला पुरविण्यात आलेल्या माहितीमध्ये नियमबद्ध असे काही नसते. म्हणजेच ही माहिती विखुरलेली असते. त्यातून संगणकाला कोणतेही नियम तयार करता येत नाहीत. साहजिकच संगणक यावेळी नियोजित प्रकारे काम करीत नाही. उलट, पुरविण्यात आलेल्या या माहितीच्या साठ्यामधून आपल्याला काही नियम तयार करता येतील का, यासाठी संगणक प्रयत्नशील असतो. उदाहरणच घ्यायचे झाल्यास क्रेडिट कार्डाशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. ते टाळण्यासाठी किंवा फसवणूक झाल्यानंतर त्यातून शक्य तितक्या लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. यासाठी आता मानवी हस्तक्षेप करून गुन्हे होण्याआधीच ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणे खूप कठीण असते. मुळात क्रेडिट कार्डोंची एकूण संख्या आणि त्यांच्याद्वारे होत असलेले व्यवहार हे इतकं प्रचंड आहेत, की अशा प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवणे आणि त्यामध्ये एखादा गुन्हा तर होत नाही ना, याची काळजी घेणे हे माणसे नेमून करण्याचे काम अजिबातच नाही. म्हणूनच अशा कामांसाठी संगणकांचा वापर करावा लागतो. त्याला 'बिग डेटा ॲनॅलिटिक्स' असे म्हणतात. जेव्हा माहितीच्या साठ्यांचं प्रमाण वाढतच जातं तेव्हा एका मर्यादेपलीकडे ही माहिती नक्की कशी साठवायची, हा प्रश्न सोडवणं खूपच कठीण होऊन बसतं. हे लक्षात घेऊन अलीकडच्या काळात 'बिग डेटा' ही नवी संकल्पना जन्मली आहे. या तंत्रज्ञानाची अगदी सोप्या शब्दांत व्याख्या सांगायची, तर 'प्रचंड मोठ्या प्रमाणातली आणि विखुरलेली माहिती वेगानं एकत्रित करून त्यातून गरज भासेल तेव्हा सहजपणे आणि त्वरेनं आवश्यक माहिती मिळवणं आणि त्यातून अगदी आयत्या वेळी महत्त्वाचे निष्कर्ष काढू शकणं', अशी कामं साध्य करून देणारे तंत्रज्ञान म्हणून आपण 'बिग डेटा'कडे बघू शकतो. चॅट जीपीटी नावाच्या अल्लाउद्दीनच्या दिव्याने तर लोकांना अक्षरशः अचंबित करून सोडलं आहे. वाटेल त्या विषयावरचा, वाटेल तितका क्लिष्ट प्रश्न विचारा आणि त्याचं अचूक उत्तर मिळवा, असा हा महाथरारक प्रकार आहे. इतकंच नव्हे, तर आधीच्या प्रश्नाला किंवा त्यावर चॅट जीपीटीनं दिलेल्या उत्तराला धरून पुढचा प्रश्न विचारला, तर जणू समोरचा माणूस आतापर्यंतच्या संभाषणाला आधारून पुढचं उत्तर देईल, अशी हुशारी त्यात आहे. याचं पुढचं पाऊल म्हणजे, त्याला आपण समजा एखादं चित्र दाखवलं, तर त्या चित्रामधला मजकूर वाचण्याची क्षमता आता चॅट जीपीटीमध्ये आली आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रयोगाची आकृती आपण चॅट जीपीटीला दाखवली, तर त्याचा अर्थ लावून प्रयोग समजून सांगणं त्याला जमू शकतं. ही फक्त झलक झाली. एकूणच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात पुढच्या पाच वर्षांमध्ये घडू शकणाऱ्या गोष्टी अक्षरशः विज्ञानकथा वाटतील, अशा असतील.
जनरेटिव्ह ए. आय. हे ए. आय. चं नवं अपत्य असून, त्याची किमया आतापर्यंतच्या सर्व आविष्कारांपेक्षा भन्नाट आहे. म्हणजे असं की, आतापर्यंत ए.आय. उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पृथक्करण अणि विश्लेषण करण्याचं काम करत होता. नवनिर्मिती करणं किंवा त्यासाठीची सर्जनशीलता असणं हे त्याला जमत नव्हतं. 'जनरेटिव्ह ए.आय.' या तंत्रज्ञानाची कमाल म्हणजे ते आधी दिलेल्या माहितीच्या आधारे नवीन गोष्ट ओळखेलच; पण त्याच विश्लेषणाच्या आधारे आपल्या सूचनांनुसार नवीन गोष्ट निर्माणही करू शकत आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास, शास्त्रीय संगीतातील काही राग आपण ए.आय.ला ऐकवले, तर त्याची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तो पुढील वेळी अचूकपणाने यमन राग ओळखू शकतो; पण जनरेटिव्ह ए.आय. मुळे या रागांच्या आधारे एखादा नवीन रागही निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळं ए.आय. मधील क्रांती निर्मिती, कला, नवा विचार, सर्जनशीलता अशा सगळ्या गोष्टींची मापकं पूर्णपणे बदलून टाकणारी आहे. येणाऱ्या भविष्यात आपल्या जगण्याशी संबंधित अनेक क्षेत्रांभोवतीच्या सीमा अस्तित्वहीन होणार आहेत. यातून कोणकोणत्या क्षेत्रात किती भन्नाट प्रकारची नवनिर्मिती होऊ शकेल, याचा तूर्तास अंदाज लावणंही अवघड आहे. ए.आय.चा हा प्रवास वेगानं होत असताना या तंत्रज्ञानाचे काही धोके उद्भवू शकतात, अशी भीतीही व्यक्त होत असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिकण्याची क्षमता असणारे संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जात असले, तरी या शिकण्यातून नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. यंत्रमानवांना भावना नसतात. मग हा माणसापेक्षा हुशार झालेला भावनाविहीन यंत्रमानव भविष्यात काय करेल याविषयी काहीच सांगता येत नाही. त्यामुळेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी जगभरात चिंतेचा सूर उमटत होता आणि आहे. खासकरून या नवतंत्रज्ञानामुळं ठराविक प्रकारच्या नोकऱ्यांवर किंवा अकुशल लोकांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल, असे एक सर्वसामान्य मत सुरुवातीच्या काळात होते; पण ए.आय. चा धोका विशिष्टांना नसून सर्वांनाच आहे, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या संभाव्य धोक्यांपासून स्वत:ला दूर ठेवत नवबुद्धिमत्तेचा अचूकपणानं फायदा करून घेण्याचं कौशल्य ज्यांना अंगी बाणवता येईल, त्यांच्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान यशाच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल...