

सुंदर केस हे व्यक्तीमत्वाला उठाव देतात. काळे, घनदाट, लांब केस प्रत्येक महिलेला हवेसे वाटतात, पण केस सुंदर असावेत यासाठी त्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. केसाच्या आरोग्यासाठी तेल लावणे महत्त्वाचे असते. हल्ली केसाला तेल लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते, पण तेलामुळे केसांचे पोषण होते. केसांना ओलसरपणा मिळतो. केसांना तेल लावताना काही चुका आपसूक होत असतात, पण त्यामुळे केसांना योग्य आणि पूर्ण पोषण मिळत नाही. या चुका टाळायला हव्यात.
केसाला तेल लावताना ते कोमटच असले पाहिजे. असे केल्यास तेल केसाच्या मुळाशी जाण्यास मदत होते आणि केसाला पूर्ण पोषण मिळते. तेल गरम करताना ते खूप गरम होणार नाही याची काळजी घ्या. कारण त्यामुळे तेलातील पोषक घटक नष्ट होतात.
मसाज करताना, केसाला तेल लावताना हलक्या हातांनी मसाज करावा. जास्त जोर लावला तर मालिश करताना केस गुंतून तुटतात, तसेच केसांची मुळे कमजोर होतात. म्हणूनच बोटांनी हळूवार पण गोलाकारात मसाज करावा.
तेल लावण्यापूर्वी मोठ्या दातांच्या कंगव्याने ते मोकळे करून घ्यावे. त्यातील गुंता काढून टाकावा. त्यामुळे प्रत्येक केसाला व्यवस्थित तेल लागते. शिवाय धुतानाही ते तुटत नाहीत.
बहुतेकदा घरी तेल लावताना आपण हाताच्या बोटानेच तेल लावतो. नव्याने झालेल्या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की बोटे स्वच्छ नसतील तर केस जास्त प्रमाणात गळू लागतात. त्यामुळे केसाला तेल 'लावताना कापसाच्या बोळ्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
केसाला तेल लावायचे म्हणजे फक्त लांब केसाला तेल लावून फायदा होत नाही. त्यातून केसाला पोषण मिळत नाही. पूर्ण पोषण मिळण्यासाठी डोक्याच्या त्वचेला म्हणजेच केसाच्या मुळाशी तेल लावून मसाज करावा.
केसाला तेल लावलेले असो किंवा नसो केस खूप घट्ट बांधू नयेत. कारण त्यामुळे केस कमजोर होतात आणि गळू लागतात.
-वनिता कापसे (निगा)