अशीही एक निवृत्ती….

अशीही एक निवृत्ती….
Published on
Updated on

घराबाहेरचं विश्व महिलांसाठी खुलं होऊन बरीच वर्ष झाली असली, तरी खऱ्या अर्थाने त्या 'घरा' बाहेर पडलेल्या नाहीत. अजूनही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घराच्या जबाबदाऱ्या, मुलांप्रती, घरातल्यांच्याप्रती असलेलं कर्तव्य यांचं पारडं जड असतं. एकवेळ नोकरीतून निवृत्ती मिळवणं त्यांना सोपं जातं; पण घराच्या व्यापातून मन बाजूला काढणं अजूनही अनेकजणींना जमत नाही. घरातील बाबींकडे लक्ष देणं खऱ्या अर्थाने कमी झालं, तर या निवृत्तीची पहिली पायरी गाठली असं म्हणावं लागेल. खरंच असं करणं शक्य आहे?

फेससबुकवर शालिनी काकूंची फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली आणि जरा बरं वाटलं. त्या रिटायर्ड झाल्यापासून त्यांची काही खबरबातच कळली नव्हती. दोन्ही मुलं परदेशात आणि नवरा त्याच्या बिझनेसमुळे सतत फिरतीवर असल्याने त्या नक्की कोणत्या मुलाकडे कोणत्या देशात राहताहेत हेच कळलं नव्हतं; पण फेसबुकवर त्यांचं लोकेशन बघितल्यावर त्या त्यांच्या गावी जावून राहिल्या आहेत, हे कळलं. थोडं आश्चर्यही वाटलं की, इतकी वर्षं शहरात राहिलेल्या काकूंना आता गावात अॅडजेस्ट करता येत असेल का? पण जसजसं त्यांच्या अकाऊंटवर त्यांच्या गावातल्या अॅक्टिव्हिटी अपडेट होत गेल्या तसतशी त्यांच्या गावी जाण्यामागची कल्पना लक्षात येत गेली. तिथल्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी. खास करून मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या धडपडत होत्या. कधी तिथल्या महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देत होत्या, तर कधी बचतीचे. त्यांच्या आयुष्यातल्या या यू टर्नबद्दल एकदा त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, 'आजवर घरच्यांसाठी जगले आता तिथून निवृत्ती मिळाली आहे, तर समाजाचं देणं फेडते. अपरोक्ष भावनेने काही करण्यात किती समाधान असतं याचा अनुभव मी घेत आहे आणि या निवृत्तीच्या टप्प्यावर सुखीही आहे.'

खरंच निवृत्तीची अशी कल्पना किती जणांना सुचत असेल? महिलांना तर कामावरून निवृत्ती मिळाली, तरी घरातूनच त्यांचा पाय निघत नाही. जबाबदाऱ्या असतात हेही खरंय पण त्यात नक्की किती गुंतून पडायचं हेही आपणच ठरवावं लागतं. घर आणि तिथली माणसं यातून मनाने निवृत्त होणं किती जणींना जमतं? त्यासाठी खरं तर मनाची वेगळी तयारीच हवी. अजूनही मुलं त्यांच्या संसारात काय करत आहेत? नातवंडांना वळण लावलं जात आहे की नाही? घरातले रितीरिवाज पुढची पिढी योग्यप्रकारे सांभाळते आहे का? या आणि अशा कितीतरी गोष्टी घरातून मनाने बाहेर पडायला अडसर ठरतात. घरातून बाहेर पडून समाजात काय चालंलय. आपल्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा तिथे काही उपयोग होतोय का, याची पडताळणी कितीजणी करतात? पुरुष जसे रिटायर्ड झाले की, बऱ्यापैकी आपलं स्वतंत्र आयुष्य जगतात; पण बायकांना ते जमायला खरंच प्रयत्न करावे लागतात. कारण त्या संसारात इतक्या गुंतून पडलेल्या असतात की, त्याबाहेर काही आहे हे विसरून जायला होतं.

या बायकांनी आधी स्वतः च्या मनाला पटवून द्यायला हवं की, घरात आपण जितकं गुंतवून घेऊ तितकी तिथली मागणी वाढतच जाणार आहे. त्यातून ठराविक वयानंतर बाहेर पडणं ही गरज आहे. इतकी वर्षे घरासाठी अनेक इच्छा आकांक्षांना बाजूला ठेवलेलं असतं. एकदम त्यातून बाहेर पडणं सोपं नाही; पण व्यवस्थित आखणी करून काही गोष्टी करायच्या ठरवल्या, तर नक्कीच काही गोष्टी होऊ शकतात.
टप्याटप्याने या गोष्टी करायला हव्यात. घरातल्या माणसांना हळूहळू स्वावलंबी बनवणं हा त्यातला मुख्य भाग असतो. इतके दिवस घरातल्या बाईला काही कामांसाठी गृहीत धरल्याने बाकीच्यांची मर्जी आणि वेळा सांभाळणं हेही गृहीतच धरलेलं असतं. त्यातून अंग काढून घेऊन थोडी अलिप्तता दाखवणं फार गरजेचं असतं. हे सगळं जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे एकदम होणार नाही हे अगदी खरं असलं तरी कुठूनतरी सुरुवात करायलाच हवी. ही आखणी तुम्हाला ज्या वयात घरातून निवृत्ती घ्यायची आहे, त्याच्या आधी दोन-तीन वर्षे तरी करायला हवी.

घरातून लक्ष काढणं म्हणजे, ते मनानेही काढणं होय. नाहीतर माझ्या अनुपस्थितीत काय घोळ करून ठेवला असेल याचीच चिंता करत बसलं, तर त्याला निवृत्ती म्हणता येणार नाही. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर आपल्या कामाची जबाबदारी कोणीतरी घेणार हे जितक्या सहजतेने आपण स्वीकारतो तशीच तयारी घरच्या कामाचा 'हँडओव्हर' देताना असली पाहिजे. आता या सगळ्यातून तुम्हाला जो वेळ मिळणार आहे, त्याचा विनियोग तुमच्या स्वतःसाठी कसा करता येईल, याची आखणी करता येईल. त्यातून आपल्या छंदासाठी, राहून गेलेल्या एकाद्या कामासाठी किंवा काहीतरी गोष्ट शिकण्यासाठी करून घेता आला तर उत्तमच.

समवयस्कांमध्ये मिसळण्याची चांगली संधी यामुळे मिळेल. मनन- चिंतन करायला वेळ मिळेल. कधी एखादी कविता करावीशी वाटली, कधी एखादी खरेदी करत भटकावंसं वाटलं, पाहायची राहून गेलेली ठिकाणं पहावीशी वाटली, तर त्यासाठी वेळेची कमतरता भासणार नाही. या सगळ्यात राहून गेलेल्या गोष्टी करायच्या आहेतच; पण निवृत्तीनंतर केवळ एवढ्याच गोष्टी सतत करत राहता येणार नाहीत. त्यामुळे दैनंदीन कामांचाही काही क्रम लावायला हवा. त्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगासने, फिरणे असे व्यायाम हवेत. पथ्याचं काही करून तब्येत सांभाळायची कला आत्मसात करायला हवी. तेव्हा गृहिणींच्या निवृत्तीचीही तयारी करायला पाहिजे. तो दिनक्रम कसा असेल ते प्रत्येकाने आपली निवड पाहून ठरवायचे आहे. त्यामुळे एक आनंदी आणि मनासारखी निवृत्ती उपभोगता येईल एवढं मात्र,खरं.
– रमा मिलिंद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news