हल्ली पुरुषच नाही, तर महिलाही कार चालवताना दिसतात. आत्मविश्वासाने चारचाकी चालवणार्या महिलांचं प्रमाण लक्षणीय पद्धतीने वाढतंय, ही चांगली गोष्ट आहे. अर्थात, कार चांगल्या पद्धतीने चालवता यावी यासाठी या यंत्राच्या तंदुरुस्तीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं आणि लक्षात ठेवणं गरजेचं असतं. म्हणूनच इंजिनच्या तंदुरुस्तीसाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरतील असे दोन ठळक मुद्दे पुढे नोंदवले आहेत. कार चालवणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते मार्गदर्शक ठरू शकतील.
प्रवास छोटा असेल तर प्रश्न नाही; पण पंचेचाळीस-पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कार चालवल्यानंतर एखाद्या ठिकाणी थांबल्यावर लगेच इंजिन बंद करू नये. चालू स्थितीत दोन-तीन मिनिटं सुरू ठेवून मग इंजिन बंद करावं. कारशी संबंधित अंतर्गत उपकरणं व यंत्रणा अधिक काळ सुव्यवस्थित राहण्याच्या द़ृष्टीने ते फायद्याचं ठरतं.
काही अनुभवी किंवा अनुभवी कारचालकांना उतारावर न्यूट्रल गिअरवर गाडी चालवण्याची सवय असते; पण अशा प्रकारात कारवरचं नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे कारमध्ये गिअर बदलत असताना ऑटोमेटिक ब्रेकिंगची यंत्रणाही कार्यरत असते. या यंत्रणेमुळे घाटरस्त्यांवर किंवा तीव्र उतार असलेल्या रस्त्यांवर प्रवास करताना गाडीचं नियंत्रण ती चालवणार्या व्यक्तीच्या हातात राहण्यास मदत होते; पण कार न्यूट्रल असल्यास गिअर आणि ब्रेक सक्रिय नसतात. त्यातून धोका उत्पन्न होऊ शकतो. हा धोका टाळणं आपल्या हातात असतं, हे कार चालकाने सदैव ध्यानात ठेवायला हवं आणि न्यूट्रल गिअरवर गाडी चालवण्याचं धाडस टाळायला हवं.