भारतातील महान शास्त्रीय गायिकांची यादी करायची असेल, तर त्या यादीत मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी अर्थात एम. एस. सुब्बुलक्ष्मी हे नाव प्राधान्याने आणि अगदी न विसरता घेतलं जाणार हे निश्चित ! त्यामागचं कारणही तसंच आहे. (M. S. Subbulakshmi)
मदराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी यांनी कर्नाटक संगीताला जागतिक उंचीवर नेऊन ठेवण्याचं अद्वितीय काम आपल्या सांगीतिक योगदानातून केलं. त्यांचा जन्म मदुराईतला. त्यांची आई षण्मुखवाडिवु या नामवंत वीणावादक होत्या, तर त्यांची आजी अक्कमल या व्हायोलिनवादक होत्या. असा हा बहुमूल्य संगीत- वारसा त्यांना लाभला.
या वारशाचं चीज करणाऱ्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. एवढंच नाही, तर अवघ्या सतराव्या वर्षी मद्रासच्या संगीत अकादमीत गाण्याचा मान त्यांना मिळाला. कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च अढळपदावर साधारणतः १९६६ सालच्या आसपास सुब्बुलक्ष्मी विराजमान झाल्या. भारतातील प्रमुख भाषांतील संतांच्या भक्तिपर रचना त्यांनी गायल्या व लोकप्रिय केल्या. भक्तिरसाचा आविष्कार हे त्यांच्या गायकीचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.
सुब्बुलक्ष्मींनी (१६ सप्टेंबर १९१६ ११ डिसेंबर २००४) 'ती'च्या पाऊलखुणा भक्तिसंगीतात अनेक प्रयोग केले. नवनवीन रचना निर्माण केल्या. कर्नाटक संगीतातील विविध प्रकार त्या बिनचूक व प्रभावीपणे सादर करत. त्या जशा उत्तम गायिका होत्या, तशाच उत्कृष्ट वीणा व मृदंगवादकही होत्या.
केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही त्यांची ख्याती पसरली व त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली. १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतील गायनाने त्यांनी अनेक राष्ट्रप्रमुखांना मंत्रमुग्ध केलं. रशिया, अमेरिका, फ्रान्समधेही त्यांच्या अनेक मैफली झाल्या. १९८२ साली लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये झालेली त्यांची मैफल ऐकण्यासाठी राणी एलिझाबेथ उपस्थित होत्या.
सुब्बुलक्ष्मी यांचं हे अतुलनीय सांगीतिक योगदान अनेक अर्थानी दखलपात्र व सन्माननीय ठरलं. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व 'भारतरत्न' पुरस्काराने त्यांना गौरवलं. स्पिरीट ऑफ फ्रीडम तसंच राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कारही त्यांना लाभला. युनेस्को पुरस्कृत आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेने सन्माननीय सदस्यत्व बहाल करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला.