मोठा काळ, छोटी गुंतवणूक

मोठा काळ, छोटी गुंतवणूक

दीर्घ कालावधीसाठी, सातत्याने, ठरावीक अंतराने अगदी लहान रक्कम गुंतवून काही वर्षांनी मोठी रक्कम मिळवावी असं मनात असेल, तर एस. आय.पी. अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा विचार करता येतो. यात अगदी पाचशे रुपयांपासून आठ-दहा हजार रुपयांपर्यंत आपली जेवढी दरमहा गुंतवणूक करण्याची क्षमता आणि इच्छा असेल त्यानुसार रक्कम निश्चित करता येते. यात लगेच परतावा मिळत नाही; पण दीर्घकालीन फायदा मिळण्याची शक्यता मोठी असते.

बहुतेक एसआयपी योजनांना लॉक-इन कालावधी नसतो. त्यामुळे पैसे दीर्घकाळ अडकून पडल्याची भावना निर्माण होत नाही व गरजेच्या वापरासाठी पैसे काढणं तुलनेने सुलभ असतं असं तज्ज्ञ सांगतात. आपलं बैंक खातं आपल्या एसआयपी योजनेच्या खात्याशी जोडलेलं असावं लागतं. एकदा नेमक्या 'एसआयपी'ची निवड केल्यावर म्युच्युअल फंड आपल्या खात्यातून रक्कम काढून घेतो आणि आपण निवडलेल्या प्लॅनमध्ये ठरावीक तारखेला जमा करतो.

ही एक प्रकारची पद्धतशीर आणि शिस्तबद्ध गुंतवणूक ठरते. मुख्य म्हणजे यामुळे कमी जोखमीच्या बचतीची सवय लागण्याची शक्यता वाढते. आपण असं मानूया की, एखाद्या व्यक्तीकडे शेअर बाजारात गुंतवण्यासाठी लाख-दोन लाख रुपये आहेत. त्या व्यक्तीने ते पैसे एकत्र स्टॉकमध्ये ठेवले, तर अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा बाजाराची उलथापालथ कशी असेल हे त्या व्यक्तीला ठाऊक नसतं; पण तीच गुंतवणूक दीर्घकाळासाठी मासिक अंतराने विभागली गेली, तर गुंतवणुकीतला आणि परतव्याच्या संदर्भातला धोका कमी होतो. त्या दृष्टीने 'एसआयपी'त जोखीम कमी आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

विशेष म्हणजे, काही एसआयपींमधल्या गुंतवणुकीसाठी कर सवलत मिळू शकते. कर सवलत मिळवण्याचा हेतू असेल, तर त्यानुसार सुरुवातीलाच तशा एसआयपीची निवड करणं श्रेयस्कर ठरतं. एसआयपीतल्या गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणारा परतावा पुन्हा मूळ रकमेत गुंतवला जातो. त्यामुळे मुदलाची रक्कम वाढत राहते आणि त्यावर मिळणाऱ्या नफ्यातही वाढ होत राहते. त्यामुळे बहुतांश एसआयपीद्वारे कर सवलत मिळाली नाही, तरी एसआयपी गुंतवणूक फायद्याची मानली जाते.

-अर्थमंत्र

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news