शाम्पूू हा केसांसाठी आवश्यक असणारा घटक आहे. कोणता शाम्पू चांगला, कोणता हानिकारक, अशा चिकित्सकतेतून शाम्पूची निवड केली जाते. तेलकट केसांसाठी घरच्या घरी काही साहित्य आणून शाम्पू तयार करता येतो. दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा हिरव्या चण्याची पावडर, अर्धा चमचा मेथी पावडर एकत्र करून चांगले मिश्रण तयार करावे. केसांना लावायच्या आधी मिश्रणात अंड्याचा पांढरा बलक घालून तो केसांना शाम्पूप्रमाणे लावावा. हा शाम्पू केसांना लावल्यानंतर फेस येत नाही. पण केस स्वच्छ होतात. एक ग्लास रिठे चार ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी हे पाण्यात कुस्करा व पाणी गाळून घ्या. या पाण्यात एक चमचा शिकेकाई पावडर मिसळून त्याने केस धुवा. केसांना चमक येईल.
ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा लाल व्हिनेगर व चिमूटभर मीठ टाकून चांगले हलवा. या मिश्रणाने केसांच्या मुळांना हळुवार मसाज करा. एका तासाने केस धुऊन नंतर विंचरल्याने केस मऊ होतात.
कोरड्या केसांसाठीही घरात शाम्पू करता येतो. एका ग्लासभर दुधात एक अंडे फेटून घ्या. मिश्रणात भरपूर फेस आल्यानंतर केसांना चांगल्या प्रकारे लावा. पाच मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग नक्की करा. एका नारळाच्या दुधात दोन चमचे चण्याचे पीठ किंवा एक लहान चमचा शिकेकाई पावडर मिसळा. केस व केसांच्या मुळांना हे मिश्रण लावा. पाच मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. केस चमकदार आणि निरोगी होतील.