तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून स्वत:चं सजगपणे संरक्षण करायचं असेल, तर पुढे नोंदवलेले मुद्दे आवर्जून मनाशी ठेवा आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने त्यातील मार्गदर्शन आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणा.
कोणावरही सहजगत्या विश्वास ठेवू नका.
एकटे असाल तर तसं कोणाला (परक्या व्यक्तींना) सांगू नका.
आपल्या वैयक्तिक गोष्टी विश्वासातील नसलेल्या व्यक्तींजवळ खुलेपणाने बोलताना काळजी घ्या.
कोणाच्याही त्रासाला बळी पडून, कुणावर रागावल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जेवण न करणं, औषध न घेणं, वैयक्तिक स्वच्छता न पाळणं असं करू नका.
स्वत:ला एकटं एकटं ठेवू नका.
आपल्याजवळील मौल्यवान वस्तूंबद्दल विश्वासातील व्यक्ती सोडून कोणालाही काही सांगणं टाळा.
बाहेर जाताना शक्यतो दागिने घालू नका. गरजेपुरतेच रोख पैसे बाळगा.
पैशाचे व्यवहार किंवा त्याविषयीची चर्चा अनोळखी माणसांसमोर करू नका.
चेकबुकवर सह्या करून ठेवणं किंवा चेक अनोळखी व्यक्तीला लिहायला सांगणं टाळा.
न वाचता घाईघाईत कोणत्याही कागदावर सही करू नका.
आपल्या हयातीतच आपल्या सर्व मालमत्तेची वाटणी करून ती प्रत्येकाला देऊन टाकणं टाळा.
आपल्या डेबिट कार्डाचे, इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड कुणाला सांगू नका.
घरातले मतभेद परक्या व्यक्तींसमोर उघड करू नका.
घरात किंवा स्वत:जवळ खूप जास्त रोकड रक्कम ठेवू नका.
मोठ्या कालावधीनंतर परतावा मिळणारी गुंतवणूक करू नका आणि इतर कुणासाठी कर्ज काढताना पुरेसा विचार करा.
कुठल्याही कारणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.