मन की बात : ती (नाती ) तेव्हा तशी

Published on
Updated on

मोगर्‍याचे फूल ओंजळीत घेतले की त्याचा गंध मनाला  व शरीराला  पण अगदी प्रसन्न करून जातो. आपण मोठे होताना आपल्या नव्या आयुष्यात नवी नाती जोडण्यात जरी व्यस्त असलो तरीसुद्धा बालपणीच्या त्या आजोळच्या आठवणी मात्र आपल्या तनामनात अत्तराच्या कुपीसारख्या खास जपून ठेवलेल्या असतात, नाही का!!!

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात  दोन्हीकडच्या आजोळला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वात्सल्याच्या कुशीत व आठवणीने भरलेला आनंदाचा घडा! त्या वेळी फोनची जलदसेवा  नव्हती, तरी पोस्टकार्ड मात्र वेळेत पोहचायचे.  नातवंडे येताना दिसली की झाडाखाली वाट बघणार्‍या आजीचा जीव सुपासारखा व्हायचा. काय करू आणि काय नको अशी तिची धांदल. खूप मोठा वाडा नाही. खाऊनपिऊन सुखी असे  घर   कोणत्याच गोष्टीला कमी पडले नाही. कारण प्रेमाचा अखंड वाहता झरा खळखळत असायचा. मावस, मामे भावंडांबरोबर एकाच उशीवर झोपून पण अजिबात अडचण होत नसायची. रात्र रात्र जागून आजीने सांगितलेल्या गोष्टींनंतर परी व राक्षसाबरोबर स्वप्नातपण जगत होतो. दोन्ही  घरी काकू, आत्या, मामी, मावशी; चांगल्यासाठी बोलणे, धाक दाखवणे, प्रसंगी एखादा धपाटा हा शिस्तीचा बडगा सर्वमान्य होता. सण समारंभ, लग्न यात लटके  रुसणे, रागावणे हा पण एक आनंद होता. मिळून सार्‍याजणी तो राग-रुसवा हसून खेळून काढत व परत  तुझ्या गळा माझ्या गळा होत असे. एकमेकांना घासातील घास प्रेमाने, हक्काने भरवण्यातील आनंद शब्दातीत होता. कोणाकडे कधीही जाण्यासाठी आमंत्रणाची, ठरवलेल्या वेळेची गरज कधीच नसायची.

घर छोटे असले तरी त्या घरात खूप सारे प्रेम असल्यामुळे या खूप सार्‍या माणसांमुळेच त्या घराला घरपण यायचे. प्रेमाने, मनापासून पदार्थ  करून भरविणे, खाऊ घालणे ही तृप्तता जास्त होती. वाद, भांडण, रुसवा असला तरी रडून पडून मन मोकळे करून रात गयी बात गयी  म्हणून नात्यांसाठी जगणे चालूच असायचे.

नंतर नंतर नोकरी, कामधंदा यासाठी घरापासून लांब राहताना कुठेतरी मने पण लांब झाली. सेपरेट घरात त्याच घरातल्यांची  मने पण सेपरेट होऊ लागली. टी.व्ही. वरच्या आजीच्या गोष्टींना तेव्हाची सर मात्र अजिबातच नाही. मोठ्या मोठ्या घरात आपलेच   (पाहुणे ) येणारे  दोन लोक कसे अ‍ॅडजस्ट होणार हा चर्चेचा मुद्दा होतो. नात्यातील कोणी काही प्रेमाने बोलले, सांगितले तर छोट्यांचा इगो, इन्सल्ट डोके वर काढतो. जरासे खुट्ट झाले की नात्यात ओरखडे उठणारच. मोडेन पण वाकणार नाही हाच पवित्रा असतो. समोर माणूस नको पण स्वतःच्या बंद खोलीत मात्र फॉरवर्ड आलेले मेसेज ऑनलाईन पाठवण्यात धन्यता मानायची. फुल्ली इंटेरिअर केलेल्या घरात दोन पिढ्यातील चार प्रतिष्ठित माणसे राहतात. वाद, भांडणात माघार न घेता कोण, कसे, कुठे किती चुकले यावरच न संपणारे  वाकतांडव चालू राहते.

जगण्यासाठी जणू नाते ही धोंड वाटू लागते. पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते. पण नात्याने समृद्ध होणे तितकेच कठीण असते. 

नाते असले की मतभेद हे असणारच. पण  त्यावर संबंध तोडणे  इतका जालीम उपाय  नको असतो. काही धरायचे, काही सोडायचे. बिनसलेल्या वेळेला सावरून धरणेच शहाणपणा असतो. समोरची आपलीच व्यक्‍ती चुकली तरी झाले गेले विसरून प्रेम करता आले पाहिजे. कमी स्वागत झाले तरी जाणे येणे हवेच. तोच तर नात्यांचा बांध असतो. आयुष्यात आलेली नाती जणू ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. नाहीतर सव्वाशे करोडमध्ये आपणच का भेटावे?

आयुष्य खूप छोटे आहे. 

            नात्यापेक्षा मौल्यवान काही नाही.

  आपले माणूस आपल्याजवळ असणे यासारखी दुसरी श्रीमंती नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news