गरोदरपण हा जितका संवेदनशील तितकाच अत्यंत जबाबदारीने निभावण्याचा टप्पा आहे, हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतं. खरं तर हे गरोदर बाईइतकंच तिच्या घरच्यांनाही ठाऊक असायला हवं आणि त्याद़ृष्टीने त्यांनी सतर्क राहायला हवं. गरोदर बाई आणि तिच्या घरच्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीने हे समजून घ्यायला हवं की, बाळाच्या आणि आईच्या आरोग्याच्या द़ृष्टीने गर्भवतीची नियमित तपासणी आवश्यक असते. आता कुणाला प्रश्न पडेल की, प्रत्येक तपासणीच्या वेळी डॉक्टर किंवा नर्स नेमक्या कुठल्या गोष्टी तपासतात? साधारणतः यामध्ये सहा गोष्टी तपासल्या जातात.
एक - तारखेप्रमाणे किती आठवडे झाले आहेत? दोन - गर्भाची वाढ त्या प्रमाणात योग्य आहे का? तीन - बाळाच्या हृदयाचे ठोके त्यानुसार नीट आहेत ना? चार - गरोदर स्त्रीचा रक्तदाब किती आहे? पाच - वजन किती आहे? सहा - सूज आहे का? याशिवाय गरज भासेल त्या त्या टप्प्यावर काही रक्त, लघवीच्या आणि सोनोग्राफीच्या तपासण्यादेखील करायला सांगितल्या जातात.
सामान्यतः गरोदरपणातली तपासणी ही पुढील वेळापत्रकाप्रमाणे केली जाते - पहिले 28 आठवडे (म्हणजे सात महिने) दर महिन्यातून एकदा. 28 ते 36 आठवडे (म्हणजे सातवा महिना ते नववा महिना) दर पंधरा दिवसांनी. 36 ते 40 आठवडे (म्हणजे नवव्या महिन्यानंतर) दर आठवड्याला.
बर्याचदा असं आढळून येतं की, शहरांपासून लांबच्या ठिकाणी, त्यातही खेडेगावांमध्ये हे वेळापत्रक असंच्या असं अमलात येणं बर्याचदा शक्य होत नाही म्हणून मग किमान चार वेळा गर्भवतीची तपासणी आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या चार वेळा कोणत्या? एक - पाळी चुकल्यानंतर. दोन - विसाव्या आठवड्याच्या सुमारास म्हणजे पाचव्या महिन्यात. तीन - 32 ते 34 आठवड्यांच्या सुमारास म्हणजे सातव्या-आठव्या महिन्यात.
चार - 37 व्या आठवड्यानंतर म्हणजे नवव्या महिन्यात! गरोदरपणातील तपासणीबाबतचं असं वेळापत्रक ठरलेलं असलं तरी नैसर्गिक वाढीमध्ये काही अडचण जाणवली किंवा गरोदर स्त्रीला जास्त त्रास होत आहे, अशी शंका आली तर डॉक्टर तपासणीसाठी लवकरही बोलावू शकतात, हेही आवर्जून लक्षात घ्यायला हवं.