मन की बात : आपलेहात
मानवी शरीररचना म्हणजे परमेश्वराची कलाकृती आहे. प्रत्येक अवयवाचे आपले आपले काम ठरलेले. मेंदू जणू ट्रॅफिक कंट्रोल करणार. जणू ज्या त्या ठिकाणी ज्याची त्याची सवयच, 'आदत से मजबूर!' त्यामुळे अगदी एखाद्या बोटाला जरी दुखापत झाली, तर ते बरे होईपर्यंत आपला खोळंबाच होतो नाही.
कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती,
करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम॥
आपल्या या सुभाषिताने जणू आपल्या हातांची महतीच सांगितली आहे. रोजचा दिवसाची आनंदात व उत्साहात सुरुवात करणे म्हणजे येणार्या दिवसाचे महत्त्व जाणणे होय. आपल्या हातात वसलेली लक्ष्मी माता म्हणते की, सकाळचा आळस झटकून स्वतःच्या मनगटाच्या जोरावर कष्ट उपसलेत तर पैसा, संपत्ती, जडजवाहीर व मनशांती या रूपात मी सदैव तुमच्यात वास करीन, तर आपली देवी सरस्वती सांगत असते की, हातात लेखणी धरून माझी आराधना केलीत तर माझ्या बरोबरीने माता लक्ष्मी पण तुमच्या घरात वास करेल, याची खात्री बाळगा.
तर असे हे 'आपले हात जगन्नाथ!' स्वतःवरील विश्वासावर आपले आयुष्य घडवत असतात. श्रमाचे, कष्टाचे, जिद्द, चिकाटीचे सामर्थ्य फार समाधान मिळवून देतात; मात्र काही आळशी, लोभी, रडे सतत हाताच्या रेषा, भविष्य यावर नशिबाचे फासे उलट-सुलट करत त्रस्त असतात. त्यावर उपाय, तंत्र-मंत्र, जप-ताप, गंडे-दोरे या चक्रात अडकून आज व उद्या तर हरवून घेतातच, त्याबरोबर शारीरिक व मानसिक आजारांना खुले आमंत्रणच देऊन बसतात.
कधीतरी हेच आपले हात कोणाच्या तरी हातात प्रेमभराने दिले, की मैत्रीचा सुखद गारवा मिळून जातो व पुढे जाऊन हीच मैत्री गळ्यातील ताईत होऊन जाते, तर कोणासाठी कधी आयुष्यभरासाठी एकमेकांचा गळ्यात माळा घालून आपलेसे करतात. देवापुढे किंवा आपल्या श्रद्धेपुढे 'तेथे कर माझे जुळती' म्हणून भक्तीभावात रंगून जातात. कारण, भाव मनापासून असेल तर धूप, दीप, नैवेद्य यापेक्षा अंतःकरणाने मनोभावे जोडलेले दोन हात व डोळ्यातील अश्रूंचा अभिषेक समर्पणाची भावना वाढीस लावते, हे अबाधित सत्य आहे.
विनोद, गप्पाष्टक, चेष्टा, मस्करी करताना उत्स्फूर्त दाद म्हणजे एकमेकांना दिलेली टाळी, त्यातील रंगत अजूनच वाढवते. गरजेच्या संकटाच्या वेळी कोणाला तरी हात देणे म्हणजे पैसा, माया, आधार, सेवा या स्वरूपात निरपेक्ष भावनेने केले, की त्याचे समाधान लाखमोलाचे असते. मदत देणारे व घेणारे हात असतात, तसेच आपले पद, प्रतिष्ठा, खुर्ची, सत्ता, संपत्ती या गोष्टींचा गैरफायदा घेऊन धमकवणारे, बळकावणारे, लुटारू हात पण आपल्याच आजूबाजूला वावरत असतात व कित्येक निरपराध, सचोटीने वागणार्या सज्जनांच्या सहनशक्तीचा अंत घेतात व त्यांना असहाय्यपणे हार पत्करावी लागते; पण हे दगाबाज ते काम आपले नाही म्हणून हात वर करतात
आयुष्यात येणारे सततचे अपयश, संकटे,दुःख याने एखादा जीव अगदी हरून कातावलेला असतो. थकून-भागून हातावर हात ठेवून तो आपली हाराकिरी दाखवून जातो. अशावेळी कोणाच्या तरी मदतीचा हात त्याच्या आशा पल्लवित करून जातात. एखादा खुशालचेंडू बाजीराव कोणाचाही पुढे हात पसरणे, त्याचा हक्क समजतात.
कोण्या एका प्रामाणिक ठाकूरचे हात एखाद्या दुष्ट गब्बररूपाला 'फासी का फंदा' वाटतो, तर याच हाताने 'एकच प्याला' म्हणून उचललेला मद्याचा प्याला घरादाराचे अवघे आयुष्य बरबाद करून जाते. याच हाताने विकृतपणे एखाद्या लेकराची, लहानग्याची व स्त्रीची अब्रू लुटून तिचे आयुष्य नरक करणारे नराधम राजरोस तोंड वर करून फिरत असतात.
एकीकडे हेच काही हात घराच्यांनी, आपल्यांनी अव्हेरलेले दुःखी, वृद्ध, अनाथ, अपंग, रोगाने बाधित, मनोरुग्ण, पीडित, व्यसनी यांना सावरून समाजप्रवाहात माणूस म्हणून जगू द्यावे, यासाठी जीव तोड कष्ट घेत असतात, त्या महाभागांना शतशः नमन!
'एकी हेच बळ' यासाठी हेच हात 'साथी हात बढाना' म्हणून एकत्र येतात तेव्हा अशक्य ते शक्य होऊन जाते.स्वातंत्र्य संग्राम हा त्याचा ठोस पुरावा आहे. नाही तर अजून पण आपण ब्रिटिशांची चाकरी करत बसलो असतो, तर ही आपली 'हाथ की सफाई' आपण कोणत्याही वाईट व दुष्ट प्रवृत्ती, अन्याय, दादागिरी यासाठी आपल्या बाजूने खारीचा वाटा उचलत सुरू केली, तर खरोखर अच्छे दिन हे फिरून फिरून येणारच, यात शंका नाही.
हाथोने हाथो को सहारा दे दिया…
मिलजुलकर बोज हटा दे….
