हल्ली आपल्याकडे शेती आणि शेती क्षेत्राशी अन्योन्यपणे निगडित असलेल्या अभ्यासक्रमांची, नोकरी-व्यवसायातल्या पर्यायांची चर्चा होऊ लागली आहे. करिअर करण्याच्या असंख्य वाटा या क्षेत्रात दडलेल्या आहेत, हे आपल्या आता लक्षात येऊ लागलं आहे आणि तसे अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध होऊ लागले आहेत.
आपल्याकडे ठरावीक हंगामात ठराविक भाजीपाला आणि फळं मोठ्या प्रमाणात पिकतात, उपलब्ध होतात. त्याच पार्श्वभूमीवर फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची चर्चा आणि चलती अलीकडच्या काळात वाढत असल्याचं दिसत आहे. शेतातून मिळणारा भाजीपाला आणि फळं हा या उद्योगातला मुख्य कच्चा माल असून, त्याच्या प्रक्रिया पश्चात वैशिष्ट्यांची माहिती घेतली तरी या क्षेत्रातला वाव लक्षात येऊ शकेल.
भाज्यांमध्ये टोमॅटो जास्त टिकत नाहीत; पण त्यापासून केलेला सॉस किंवा केचप खूप दिवस टिकतं. कांद्याचं निर्जलीकरण करून त्याच्या पाती सुक्या स्वरूपात विक्रीला उपलब्ध करून देता येऊ शकतात. कांदा-लसूण यांची पेस्टही ‘ऑल टाइम हिट’ ठरणारी आहे. बटाट्याचे वेफर्स, चिवडा, पापड असे वेगवेगळे पदार्थ व्यवस्थित पॅकिंगसह किरकोळ दुकानं, हॉटेल्स, बेकरी, चित्रपटगृहं, रेल्वे किंवा एसटी स्टँड इथे विकायला ठेवता येऊ शकतात. चिंचेवर प्रक्रिया करून त्याची पावडर तयार करून ती विकता येऊ शकते.
आवळ्यापासून तयार केलेलं सरबत आरोग्याबाबत जागरूक असलेल्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. द्राक्षावर प्रक्रिया करून ‘रेडी टू सर्व्ह’ या पद्धतीने सरबत तयार करून प्रदर्शनं, पर्यटन स्थळं अशा ठिकाणी त्याची विक्री करता येऊ शकते.
अर्थात प्रक्रिया करण्याचा असा कोणताही उद्योग करण्यापूर्वी योग्य ते मार्गदर्शन मिळवणंही महत्त्वाचं ठरतं. अशा व्यवसायासाठी यंत्रसामग्री लागू शकते, त्याचा अंदाज घ्यावा लागतो. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी उच्च दर्जाची कौशल्यं आणि प्रचंड भांडवल नसलं तरी एकवेळ चालतं; पण सातत्यपूर्ण कष्टाची मात्र तयारी हवी. कृषी महाविद्यालयं, जिल्हा उद्योग केंद्रं, कृषी भवनं इथे या संदर्भातल्या अभ्यासक्रमाविषयीची आणि नोकरी-व्यावसायविषयक संधींची अधिक माहिती मिळू शकते. तसंच या क्षेत्रात काम करणार्या जाणकार अनुभवी व्यक्ती व संस्थाही या संदर्भातल्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.