

Pineapple Benefits
लडस्, जॅम यासारख्या पदार्थांत अनेकदा आणि हमखास असतो तो अननस. हे फळ बाहेरून टोचरं, रानटी दिसत असलं तरी वरचं साल काढल्यावर अनुभवाला येणारा या फळाच्या फोडींचा खास पोत आणि त्यात ओतप्रोत सामावलेला मधुर ओलावा काही औरच! खास चव आणि गुणधर्म यामुळे हे फळ माणसांच्या आहारातलं आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि मान टिकवून आहे.
आपल्या शरीरात डिहायड्रेशन होऊ नये, पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी अननस खाणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे फळ चविष्ट तर आहेच; शिवाय त्यात भरपूर पोषक घटकही सामावलेले आहेत. ते घटक शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपकारक ठरू शकतात.
अननस खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. अननसामध्ये असलेलं क जीवनसत्त्व मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवून मौसमी आजारांचा धोका कमी करतं. शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी अननसाच्या बहुगुणांचा फायदा होतो. अननस केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही तर पचनालाही तो साहाय्यभूत ठरतो.
अननसात असलेलं कॅल्शियम स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देतं. यामध्ये असलेलं मँगेनिज आणि कॅल्शियम हाडांसंदर्भातल्या त्रासांवर गुणकारी ठरतं. अननसाचं सेवन लहान-मोठी हाडं व स्नायू मजबूत करण्याच्या कामी येतं.
अननसात तंतुमय घटकांचं अर्थात फायरचं प्रमाण खूप असतं. हे फायबर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करण्यात आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं. हृदयाशी संंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी अननसाचं सेवन उपयुक्त मानलं जातं.
अननस खाल्ल्याने वजन कमी होण्यासोबतच पोटाची चरबी कमी होण्यास हातभार लागतो. अननसाचं सेवन शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच मुख्यत: शरीरातलं मेटॅबॉलिजम सुधारतं व चयापचय प्रक्रिया सुरळीत ठेवतं.
या सार्यातून वाढीव चरबी व वजन कमी होण्याची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता वाढते. आपल्या ‘डाएट’विषयी संवेदनशील असणार्यांना अननस खाण्याचा सल्ला दिला जातो, तो त्यासाठीच!