आपले पैसे कमी जोखमीसह वृद्धिंगत करण्यासाठी गुंतवणं म्हणजे काळजीपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणं. यात गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी असते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठरावीक कालावधीसाठी बँकेत ठेव जमा केली जाते. निश्चित ठरावीक व्याज दर आणि जोखमीविना सुरक्षित परतावा ही फिक्स्ड डिपॉझिटची वैशिष्ट्ये ठरतात.
सरकारद्वारे जारी केलेले बॉण्ड्स हाही गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. सरकारी पाठबळ असल्याने ठरावीक व्याज दर, जोखमीविना दीर्घकालीन सुरक्षितता या गुंतवणुकीला लाभते. सरकारी उद्योग वा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गुंतवणूक करणार्या म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवल्यास कमी जोखीम असते. पीपीएफ ही भारत सरकारद्वारे चालवलेली दीर्घकालीन बचत योजना आहे. यात करमुक्त व्याज आणि निश्चित परतावा मिळत असल्याने सुरक्षितता आणि दीर्घकालीन फायदा मिळतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेली योजना आहे. निश्चित व्याज दर, करसवलत आणि दीर्घकाळासाठी सुरक्षित बचत ही या योजनेची वैशिष्ट्यं ठरतात.
काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूक नियमित आणि स्थिर परतावा मिळवून देते. सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमात जोखीम फार कमी असते. मूळ गुंतवणूक सुरक्षित राहते आणि अशी गुंतवणूक दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरते. यातल्या काही गुंतवणुकींवर करसवलत मिळते तसेच निव्वळ परतावा वाढण्यासही हातभार लागतो. स्थिरता आणि विश्वसनीयता ही वैशिष्ट्ये सांभाळणारे पर्यायच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी निवडावेत, असं गुंतवणूक सल्लागार सुचवतात, ते त्यासाठीच!