लोकपरंपरेतील मुक्ताई आणि ज्ञानदेव यांचं बहीण-भावाच्या प्रेमाचं निरपेक्ष नातं अनेक लोकगीतांमध्ये गुंफलं गेलं आहे. तसंच ते अगदी वेगळ्या कल्पनेतूनही व्यक्त झालं आहे. संसार करणार्या, घरकामात बुडून गेलेल्या आयाबायांना घराबाहेर पडण्याची संधी देणारं कारण म्हणजे देवदर्शन. अशीच एक मालन ओवीच्या माध्यमातून तिच्या मनातली हौस, इच्छा बोलून दाखवते आहे. तिकडे जाऊन करायचं काय, याचं तिने पक्कं नियोजन केलं आहे अर्थात आजच्या भाषेमध्ये ‘प्लॅन’ केलेला आहे.
हावस मला मोठी /
आळंदीला गं जायाची /
शेंडीचा नारळ /
इंद्रावतीला वहायाची /
आळंदीच्या माळावरी /
कुनी सुपारी फोडली /
देव गेनबाच्या संगं /
बारस हौशानं सोडली /
चल सये लवकर /
नको करूस घोटाळा /
आपल्याबरोबर आलेल्या सईबाईला तिची मैत्रीण ‘तू लवकर बाहेर पड, आपण आळंदीला जाण्यास उशीर नको करायला; कारण आळंदीला जाऊन शेंडी असलेला नारळ इंद्रायणी नदीला अर्पण करायचा आहे, तिथे मंदिरात ज्ञानोबा माऊलींच्या साक्षीने एकादशीचा उपवास सोडायचा आहे, हे सगळं करायचं तर आळंदीला जाण्यासाठी आपण लवकर निघायला हवं’ असं ओवीच्या माध्यमातून सांगते आहे. इथपर्यंतचा ओवीचा प्रवास नेहमीसारखा ओवीतल्या आशयाप्रमाणेच होतो.
चल सये लवकर /
उचल पाऊल लगलग /
ज्ञानदेव सखा माझा /
बाई भेटल जिवलग /
माऊलींना मराठी माणसाच्या मनात जिव्हाळ्याचं स्थान आहे. म्हणून ‘ज्ञानदेव सखा माझा / बाई भेटल जिवलग /’ असे शब्द ओवीमध्ये येतात. आळंदीला गेल्यानंतर तिच्या मनात ज्ञानेश्वर महाराज अर्थात तिचे‘द्यानूयीबा’ यांची आठवण येणं स्वाभाविकच. ती लोकपरंपरेतील कष्टकरी बाई. तिची भाषा ही लोकभाषाच आहे. म्हणून ती ‘द्यानूयीबा’ असं सहज म्हणते. आणि ज्ञानेश्वरांना याच आयाबायांना भक्ती-ज्ञानाच्या प्रवाहात घेऊन यायचं होतं.
ही झाली परंपरा. या परंपरेला अपेक्षित नसलेल्या अनेक घटना लोकपरंपरेतील गीतांमध्ये घडताना दिसतात. कारण लोकगीतं मौखिक परंपरेतून विस्तारत जातात. परंपरेने टिकून राहिलेल्या लोकगीतांमध्ये गीत म्हणणारी मालन तिच्यात नवीन ओवीची भर सहजपणे घालते. कारण कुणी एका रचनाकाराने लोकगीतं रचलेली आहेत, त्याची नाममुद्रा गीतामध्ये आलेली आहे असा प्रकार लोकपरंपरेमध्ये नसतो. लोककथा, लोकगीतं ही संपूर्ण समूहाची असतात.
समूहनिर्मिती, मौखिक कथा, गीतं, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार हे सारं म्हणजे लोकसंस्कृतीचे आविष्कार आहेत. आळंदीला गेलेल्या मराठी सईच्या ओवीच्या संदर्भात हे सर्व सांगण्याची गरज आहे.