फॅशनेबल : पर्सच्या दुनियेत… | पुढारी

Published on
Updated on

बॉक्सच्या आकाराच्या हँडबॅग्ज ः आता आपल्या नेहमीच्या दैनंदिन हँडबॅग्जना रजा द्या आणि थोड्या दिमाखात बाहेर पडण्याची तयारी ठेवा. सध्या चौरसाकृती हँडबॅग्जचा जमाना आहे. या हँडबॅग्जचा आकार मोठा असतो आणि त्यांच्यात कप्पेही एक किंवा दोन असतात. त्यामुळे तुमच्या अनेक वस्तू त्यांच्यात राहतात. या बॅग्ज घेतल्यावर तुम्ही बिझनेस वुमन दिसता आणि तुमच्या आकर्षकतेत भर पडते. तेव्हा या रुबाबदार हँड बॅग्ज खरेदी करण्यासाठी मनाची तयारी करा आणि पीच, लाल किंवा इतर तुमच्या आवडत्या रंगातील हँडबॅग खरेदी करा. 

मोठी हँडल असलेल्या हँडबॅग्ज ः या पारंपरिक प्रकारात मोडणार्‍या हँडबॅग्ज असतात. त्यांच्या आत तीनपर्यंत कप्पे असतात. शिवाय पैसे ठेवण्यासाठी छोटासा कप्पा असतो. बाहेरच्या बाजूलाही पुढे एक आणि मागे एक किंवा फक्‍त मागे असे कप्पे असतात. या हँडल असलेल्या हँडबॅग्ज हातात अडकवून बाहेर पडणे सोपे पडते. त्यामुळे गडबडीच्या वेळी कुठेही जाणे सहजशक्य होते. या प्रकारात अनेक रंग आणि रंगसंगती आढळतात.  

फरच्या बॅगा ः थोडा 'हटके' लूक हवा असेल, तर फरच्या गुबगुबीत पर्स किंवा हँडबॅग वापरा. खास समारंभांना जाणार असाल, तर जरूर या बॅगा वापरा. अलिकडे या बॅग्जवर डिझाईनही मिळू लागले आहेत. तुमच्या मित्र-मैत्रिणींचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर अशी बॅग नक्कीच वापरा. तुम्ही एकदम 'कूल' वाटाल आणि तुमच्या एकूणच व्यक्‍तिमत्त्वाला त्यामुळे उठाव येईल. 

मोठ्या आकाराच्या चेनच्या हँडबॅग्ज ः या पट्ट्यापट्ट्यांनी बनलेल्या बॅगा असतात आणि मोठ्या आकाराच्या असतात. त्यांना आतून आणि बाहेरून बर्‍याच चेन लावलेल्या असतात. या चेन लक्षात येण्याजोग्या मोठ्या असतात आणि त्यांचेही वेगवेगळे प्रकार असतात. यात भडक रंग अधिक प्रमाणात असतात. त्या प्लास्टिकच्याही असतात आणि चमकत्या रंगाच्या दिसतात. साधा, प्लेन ड्रेस घालणार असाल किंवा साडी नेसणार असाल, तर या पर्स छान दिसतात. एरव्हीही त्या उठून दिसतात. 

कापडी हँडबॅग्ज ः 1970 च्या चित्रपटांतील हिरॉईन्स आठवतात? त्यांच्या हातात बर्‍याचदा अशा कापडी, सुंदर डिझाईन्सच्या, मखमली वगैरे पर्सेस दिसत. आता ती फॅशन परत आली आहे. सुंदर सिल्कच्या किंवा जरीच्या कापडाच्या पर्सेसची फॅशन आता पुन्हा आली आहे. या पर्सची हँडल्सही अनेक वेळा जाडसर आणि विणल्यासारखी असतात. त्या आकाराने मोठ्या, छोट्या आणि मध्यम आकारातही मिळतात. त्यामुळे वापराच्या दृष्टीने सोईच्या आणि दिसायला सुंदर अशा या हँडबॅग्ज आहेत. शिवाय तुमच्या कपड्यांना त्यांच्यामुळे एकदम उठाव येतो आणि तुम्हीही छान उठून दिसता. 

मॅचिंग हँडबॅग्ज ः फॅशनच्या दुनियेत सहसा तुमच्या शूज आणि चपलांशी तुमच्या हँडबॅग्ज मॅचिंग असाव्यात असे मानले जात असे. परंतु आता असे अनेक नियम कालबाह्य झाले आहेत. आता आपल्या कपड्यांना साजेशा रंगाच्या हँडबॅग्ज वापरल्या जातात. लाल ड्रेस असेल, तर खुशाल लाल रंगाची हँडबॅग घ्या किंवा तुम्हाला हवे असेल तर चक्क विरुद्ध रंगाची हँडबॅग फॅशन म्हणून वापरा. 

सापाच्या कातड्याच्या हँडबॅग्ज ः सापाच्या कातड्याच्या हँडबॅग्जची फॅशन अलिकडे पुन्हा आली आहे. खरे तर ही कातडी खरी नसते. खरी असेल तर ती खूप महागडी असते आणि शिवाय अलिकडे त्यांच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे सावधान! वापर करताना काळजी घ्या आणि कृत्रिम कातड्याचीच हँडबॅग वापरा. या हँडबॅग्ज सुंदर दिसतात आणि शिवाय त्या सापाच्या कातड्याच्या नसल्यामुळे तुम्ही तशा हँडबॅग्ज वापरायला घाबरत असाल, तर तुम्हाला त्या वापरताना घाबरायचेही कारण नाही.

छोट्या हँडबॅग्ज ः अलिकडे अगदी छोट्या हँडबॅग्जही आल्या आहेत. त्यांना फॅशनेबल बेल्ट असतात. परंतु त्यांचे आकार फार मोठे नसतात. खरे तर हँड पर्स असेच त्यांचे स्वरूप असते. फक्‍त पैसे आणि रुमाल एवढ्याच गोष्टी बरोबर नेणे आवश्यक असेल, त्यावेळी अशा पर्स खूपच छान दिसतात आणि सुटसुटीतही असतात. त्या प्लास्टिक, कापड आणि लेदर अशा तिन्ही प्रकारांत मिळतात. काही वेळा मोठ्या हँडबॅगमध्ये फक्‍त पैसे ठेवण्यासाठीही तुम्ही त्या ठेवू शकता किंवा तुमच्या महत्त्वाच्या रिसीट अगर कागदपत्रे तुम्ही त्यांच्यामध्ये ठेवू शकता. त्यामुळे मोठ्या पर्समधील इतर वस्तूंमध्ये महत्त्वाच्या वस्तू मिसळत नाहीत आणि ऐन वेळी त्या काढताना पर्समधील सर्व सामानात तुम्हाला बराच वेळ शोधत बसावे लागत नाही.  

तेव्हा चला तर मग! आपल्या हँडबॅगमधूनही तुमचे कूल, प्रसन्न आणि फॅशनेबल व्यक्‍तिमत्त्व दिसू दे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news