मानवी आयुष्य म्हणजे मोहमयी दुनिया असते. प्रत्येक गोष्टीत जणू गुंतता हृदय असे सततचे मोहाचे क्षण. कोणाला पैशाचा हव्यास, तर कोणी कपडेलत्ता, दागदागिने, जमीनजुमला तर कोणी माणसं यातच रमून जातो. पण काही मनस्वी मात्र आपल्यातील कलेमध्ये इतके रममाण होतात की आजूबाजूचे जग, व्यवहार त्यांच्या लेखी फार महत्त्वाचा नसतो. माणूस आणि कला यांचे एक अतूट नाते युगानुयुगे चालूच आहे. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे आपला श्रीगजानन! याने प्रत्येक जीवात कलेचा अंश बहाल करूनच या भूतलावर पाठवलेले असते. फक्त ती जाणीव आपल्याला होणे महत्त्वाचे…
कलामधील कल हा मूळ संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ प्रकट करणे होय. सुंदरता हा कलेचा जणू आत्मा असतो व ती दाखवण्यासाठी कौशल्य आवश्यक असते. त्याचा परीसस्पर्श झाला की त्या गोष्टीला चिरंतन रूप प्राप्त झाले असे समजायचे. बुद्धीचे लेणे लाभलेल्या मानवाच्या जणू आत्म्याचे प्रकटीकरण म्हणजे ही कला व ते दाखवणारे सर्व मनस्वी कलाकार.
आजकालच्या स्पर्धेत वशिला, आरक्षण यात सर्वांना नोकरी मिळून सुखी आयुष्य मिळतेच असे नाही. त्यामुळे कोणी आपली रोजीरोटी आपल्याकडील कलेच्या माध्यमातून समाधानाने मिळवत असतात. थोडक्यात, ते एक छोटे व्यवसायदार होऊन आपली वेगळी वाट चालत जम बसवू पाहत असतात. नुकताच पुण्यात कोथरूडमध्ये अशाच मनस्वी कलाकारांचा एक स्नेहमेळावा जवळून बघण्याचा योग आला व मन भरून पावले..!
आमचाच एक स्नेही व निखळ मनाचा योगेश फडके याने हा योग जुळवून आणला. त्याच्यासारख्याच अशा विविधतेतील जादूगार लोकांना त्याने एकत्र गुंफून, धागा धागा अखंड विणून एक सुंदर माळ सादर केली. योगेशला जणू साक्षात श्रीगणेशाचा वरदहस्त मिळाला आहे.
…सात-आठ वर्षांपूर्वी हा मुलगा सारसबागेत तळ्याकाठी बसून कुटुंबातील सदस्यांची नावे वापरून गणेश कलाकृती करायचा. हळूहळू त्याचे नाव सांगोवांगी होऊ लागले व सादरीकरणाची लय वाढू लागली. थोडक्यात, कडप्पा ते खुर्ची असा त्याचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्यानेच फक्त वीस दिवसात या प्रदर्शनाची रूपरेखा आखली. किती यश, फायदा होईल याची काहीही खात्री नव्हती; पण तरी मोट तर बांधायची होतीच. त्याला जोड दिली आपल्या चंद्रिकांनी… अतिशय कष्ट व अडचणीतून ही मुलगी आपल्याला कापडी खेळणी व सुंदर वस्तूंच्यात घेऊन जाते. पूर्वीची एक लुप्त होऊ पाहणारी कला म्हणजे सुंदर उबदार गोधडी शिवणे ही या मुलीची खासियत. त्यामुळे ती कितीजणींना रोजगाराचे साधन मिळवून देत आहे व भारतात या क्षेत्रात तिच्या याद्रा ( स्पॅनिशमध्ये आई) या ब्रँडची योग्य दखल घेतली गेली आहे, ही अतिशय कौतुकाची बाब आहे.
बारामतीच्या माधवी आणि चमूची ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, नथ यांनी पुण्यात पहिल्याच फेरीत धुमधडाक्यात आपला उत्तम व्यवसाय केला. भिगवणच्या डॉ. प्राची थोरात यांची आयुर्वेदिक तांबूल (विडा), हर्बल टी या गोष्टी हटके होत्या. तेजस व राजस या कष्टाळू भावांचा वडिलोपार्जित सॉक्स तयार करण्याचा व्यवसाय कष्ट व प्रामाणिकपणाची पावती देऊन गेला. तेसुद्धा अतिशय वाजवी किमतीत. आसमाच्या अनिता आणि विनिताताई पाठ आणि मान एक करून टॉप, साडी यावर अफलातून कशिदा वर्क व हँड एम्ब्रॉयडरीत आपला ठसा दाखवून गेल्या. अश्विनी ही खण ब्लाऊज पीसवर नथ, घुंगरू, स्त्रीचित्र हाताने पेंट करून आपली कला दाखवीत होती. विनी ही सुंदर स्केचेस काढून टेबल मॅट, मग व टी शर्ट सुशोभित करून देण्यात पटाईत. प्रियांका ही तलमकारी, पैठणीचे कापड वापरून सुंदर पर्सेस व बॅगची विक्री करत होती. मानसी ही सर्वांना आपले घरंदाज वस्त्र पैठणी नेसण्याचा हक्क आहे, यामुळे पैठणीची भिशी लावून तो खरेदीचा आनंद मिळवून देण्याचा मानस सार्थकी लावीत होती.
कविताचे हँड प्रिंटेड कलाकुसर असलेले टॉप्स व शर्ट बघून डोळ्याला सुखद समाधान मिळून गेले. नेहाचे हँडमेड व सुगंधित साबण घेतल्याशिवाय राहावलेच नाही. हेता ही मुंबईची कलाकार वॉटर कलरमध्ये पेंट करून सुंदर बुकमार्क, छोटी शुभेच्छा कार्ड बनवून तैनात होती. तिचे चित्रांगणच्या रांगोळीचे पेंटिंग मात्र डोळ्याचे पारणे फेडणारे होते. गौरी परब ही स्वयंसिद्धा अन्नपूर्णा खास मुंबईहून पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवायला आली होती. तेज मसाले यांची विविध मसाल्यांची चव खरोखर लक्षात राहणारी होती. गौरव चकलीची खासियत म्हणजे ती मशीनवर केलेली व अतिस्वादिष्ट होती. नेहमी 400-500 किलो, तर दिवाळीत दिवसाला 2000 किलोचीच ऑर्डर घेणार… या कष्टाला व त्यांच्या टीमला सलाम.
रंग माझा वेगळा असे दाखवून देणारा पराग म्हणजे एमआयटीचा बीई पॉलिमर, पण नोकरी न करता टपर वेअरच्या तोडीसतोड ब्लू बेरीचे कंटेनर तयार करणारा एक हरहुन्नरी तरुण… आईवडिलांकडून प्रॉपर्टीची आशा ठेवणारे व ओरबाडून घेणारे वाढीव तरुण या कळपात आई-वडिलांना स्वतःच्या कंपनीचे मालक करून तो मात्र तिथे नोकर म्हणून काम करणारा. मनाला एक सुखावह दिलासा देऊन गेला.
तर अशा या नानाविध कलाकारांनी या प्रदर्शनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. यातूनच त्यांना प्रसिद्धी मिळत जाते व स्वतःचे एक स्थान निर्माण करण्यात त्यांना यश मिळत जाते. फक्त…
'सब्र का फलही मिठा होता है।'
हे सतत लक्षात ठेवावे लागते… आणि मग मात्र…
'हम होंगे कामयाब एक दिन,
मन में है विश्वास
पुरा हैं विश्वास….'