

आपण सर्वार्थाने सुदृढ असावं, आपलं मानसिक आरोग्य चांगलं असावं, असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटत असतं. अर्थात, असं नुसतं वाटून काही फारसा उपयोग नसतो. प्रत्यक्षात मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आपण काही जीवनकौशल्यं जाणीवपूर्वक (Essential Life Skills) आत्मसात करणं आणि दैनंदिन आयुष्यात ती वापरणं हे नितांत आवश्यक ठरतं.
जर अगदी लहानपणापासून घरगुती वातावरणात अनौपचारिकरित्या आणि शाळेच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून औपचारिकपणे ही कौशल्यं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिकवली गेली, तर ते अधिक प्रभावी ठरतं.
'जीवन' कौशल्यं अंगीकारणं वैयक्तिक मानसिक स्वास्थ्यासाठी उपकारक ठरतंच; शिवाय एकंदर समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनेही ते हिताचं मानलं जातं.
दैनंदिन आयुष्यातल्या लहान-मोठ्या कठीण प्रसंगांना निर्भयपणे तोंड देण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करण्यासाठी ही कौशल्यं मदतीला येतात.
'स्व'ची जाणीव, सामाजिक जाणीव, आयुष्याचं ध्येय ठरवण्याची क्षमता, समस्येची उकल करता येणं, निर्णय घेता येणं, साधकबाधक तसंच नवीन व कल्पक विचार करता येणं, समाजात इतरांशी जुळवून घेता येणं, इतर माणसांबरोबर काम करता येणं, त्यांच्या भूमिका समजून घेता येणं, जबाबदारीने वागणं, ताणतणावाचा सामना करता येणं, चर्चेने प्रश्न सोडवता येणं, वेगळ्या विचारधारेच्या माणसांशी संवाद साधता येणं, अयोग्य कृतीला ठामपणे नाही म्हणता येणं, अशा नानाविध पैलूंचा यात समावेश होतो.
सोप्या शब्दात; पण नेमकेपणाने सांगायचं तर स्वतःला समजून घेणं, सहानुभाव बाळगणं, परस्पर नातेसंबंध सुदृढ राखणं, संवादकौशल्य, चिकित्सक व कल्पक विचार करण्याची हातोटी, समस्येची उकल करणं व निर्णय घेता येणं, ताणतणावावर मात करता येणं आणि स्वतःच्या भावना ताब्यात ठेवणं ही मूलभूत दहा जीवनकौशल्यं आपल्या औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचा भाग व्हायला हवीत.
नवीन पिढीला लहान वयापासून अशी जीवनकौशल्यं शिकवण्यात मोठ्या माणसांनी साहाय्यभूत व्हायला हवं. सुदृढ मानसिक आरोग्यासाठी आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी त्यातून हातभार लागेल, हे निश्चित !