चला, आज आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. सिनेमात जसा फ्लॅशबॅक असतो ना तसं. म्हणजे मनातल्या मनात मागे जायचं. भूतकाळात डोकवायचं आणि मग परत यायचं. असं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर स्वतःला एक गोष्ट विचारायची, आपण अलीकडच्या दिवसात कधी रडल्याचं आपल्याला आठवतंय? अगदी मोकळेपणे आपण रडलोय गेल्या सात-आठ दिवसात? पंधरा दिवसांत... चार-सहा महिन्यांत... वर्षभरात...? अलीकडे कधी रडलोय आपण? स्वतःचे स्वतः एकटे असताना किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसमोर कधी रडून मोकळं केलंय आपण स्वत:ला? आणि असंही आठवून बघा की, अलीकडच्या दिवसात कधी कुणीतरी आपल्यापाशी रडून मोकळं झालंय का? रडण्यासाठीची मोकळीक देत आपण कुणाला अलीकडे मायेने, विश्वासाने सहानुभूती दिलीय का?
असं स्वतःच्या मनात मोकळेपणाने डोकावून बघितलं, तर आपण स्वतः अलीकडच्या काळात रडल्याचं, आपलं आपल्यापाशी किंवा दुसर्या कोणापाशी दुःख व्यक्त केल्याचं आपल्यापैकी बहुतेकांना आठवणार नाही. कुणी आपल्यापाशी मन मोकळं करायला आलंय आणि आपण मोकळेपणाने रडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी त्या व्यक्तीला वाव आणि पुरेसा वेळ दिलाय, असंही कदाचित आपल्यातल्या अनेकांना आठवणार नाही.
काय कारण असतं यामागे? रडणं वाईट असतं, रडणं हे कमीपणाचं लक्षण असतं, रडणं म्हणजे फालतूपणा, रडणं म्हणजे कमकुवतपणा असं काहीसं आपल्या मनात असतं का? आपल्याला रडताना पाहिलं, तर ‘लोक काय म्हणतील’ असं आपल्याला वाटतं का? एका अगदी नैसर्गिक-स्वाभाविक मानवी भावनेला नकारात्मक लेबलं लावली जातात म्हणून आपण त्या भावनेची अभिव्यक्ती टाळतो का?
खरं तर रडावंसं वाटणं, रडून मोकळं व्हावंसं वाटणं हे साहजिक आणि नैसर्गिक असतं. म्हणूनच आपल्याला वाईट वाटणं, दुःख होणं, वेदना होणं आणि रडू येणं हे चुकीचं आहे, कमीपणाचं आहे, असं समजणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या द़ृष्टीने काही फार बरं नसतं. शरीराच्या सोबतीनेच मनाच्या सुद़ृढतेचा आणि स्वास्थ्याचा विचार करणार्या प्रत्येक व्यक्तीने रडण्याविषयीच्या आपल्या कल्पना पारखून घ्यायला हव्यात त्या यासाठीच!