

आपल्यासारख्या सर्वसामान्य महिला या आई, पत्नी, मुलगी, कर्मचारी, गृहिणी, मैत्रीण अशा विविध भूमिकांमध्ये वावरत असतात. त्यातून येणार्या जबाबदार्या सांभाळताना महिलांना अनेकदा ताणतणावाला सामोरं जावं लागतं. (Stress Management)
कुठलाही तणाव थोड्या प्रमाणात उपयुक्त ठरतो, कारण तो सुप्त क्षमता जागृत करतो. परंतु अति तणावामुळे शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता मोठी असते. महिलांच्या शरीरावर तणावाचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो.
हार्मोन्समधला असमतोल, मासिक पाळीशी संबंधित त्रास, झोपेचा अभाव, थकवा आणि वजन वाढणं यासारख्या समस्यांना त्यातून बळ मिळतं. दीर्घकाळ तणाव राहिल्यास हृदयविकार, मधुमेह आणि पचनासंबंधित विकार यांचा धोका वाढतो. सततचा तणाव नैराश्य, चिंता, चिडचिड वाढण्यास आणि आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतो. कुटुंब आणि सामाजिक नातेसंबंधांवरही याचा परिणाम होतो.
तणावाचा सामना करणार्या महिलांना संवाद साधण्यात आणि स्वतःला व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते, परिणामी एकाकीपणा आणि वैफल्याची भावना निर्माण होते. असा आपल्या जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे डोकावत राहणारा ताण योग्य प्रकारे हाताळायचा तर सर्वप्रथम त्याची जाणीव होणं गरजेचं आहे.
ताणतणावाचं मूळ शोधून त्यावर उपाययोजना करणं, योग्य दिनचर्या ठेवणं, नियमितपणे शरीर-मनाचे व्यायाम करणं आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेणं अशा प्रयत्नांद्वारे तणावावर मात करता येते.