

कोशिंबीर, हलवा, भाजी अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यातले अनेक जण गाजर खातात. सामान्यत: गाजर मुळीच आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच आढळते. मुख्य म्हणजे वर्षभर गाजर बाजारात कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळेही त्याचा भरपूर आणि वैविध्यपूर्ण उपयोग आहारात करता येणं शक्य असतं. कोशिंबीर आणि सॅलड अशा स्वरूपात जे गाजर पोटात जातं, त्याचे लाभ तर मानवी शरीराच्या स्वास्थ्याला विशेष आधार देतात. आपल्या शरीरातल्या यकृताच्या निरोगीपणासाठी गाजर मदत करतं. गाजरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं. ते पचनासाठी आवश्यक असतं. रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याच्या ते कामी येतं.
गाजरातलं व्हिटॅमीन ‘ए’ डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायी ठरतं. शिवाय केसांसाठी त्यातलं व्हिटॅमीन ‘ए’ आणि ‘ई’ पोषक मानलं जातं. केसांची वाढ चांगली होण्यासाठी आणि केस लवकर पांढरे होऊ नयेत, फार गळू नयेत याकरता ते फायद्याचं असतं. तसंच मुरूम, पुरळ असे त्वचेचे त्रास बरे करण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी दैनंदिन आहारामधला गाजराचा समावेश उपयोगाचा ठरतो. गाजरामधले अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी पडतात. गाजर खाल्ल्यावर पोट भरल्याची जाणीव होते. सारखी भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी धडपडत असलेल्या व्यक्तींना गाजराच्या सेवनाचा फायदा होण्याची शक्यता असते.
गाजरात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे पोटॅशियम रक्तदाबाचं प्रमाण सांभाळण्यासाठी उपकारक ठरतं. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर तो आटोक्यात ठेवण्यासाठी ज्या फळभाज्या उपयुक्त मानल्या जातात, त्यात गाजराचा समावेश होतो. पोटॅशियम हे एकंदर हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. शरीरातल्या लहानमोठ्या हाडांच्या आणि दातांच्या मजबुतीसाठी विविध अन्नघटकातून पोटॅशियम शरीरात जाणं महत्त्वाचं ठरतं.
गाजर कच्च्या स्वरूपात खाल्ल्यामुळे दात आणि हिरड्या बळकट होतात. तोंडात अन्नकण राहिल्याने होणारी बॅक्टेरियानिर्मिती नियंत्रणात राहिते, त्यामुळे दातांना कीड लागत नाही. अर्थातच, गाजरातल्या अशा या विविध पोषक गुणधर्मांचा आपल्या शरीराला फायदा करून द्यायचा असेल, तर त्यासाठी त्याचं नियमित सेवन अत्यावश्यक ठरतं.