

मोड आलेले मूग सॅलड
या सॅलडमध्ये मोड आलेले हिरवे किंवा पिवळे मूग वाफवून पूर्ण शिजवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि काळे मीठ घाला आणि वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. त्यात उकडलेले बटाटेही तुम्ही घालू शकता. उकडलेले रताळेही बटाट्याऐवजी घातले तरी चालते. त्यात भाजलेले शेंगदाणे किंवा तीळही घालू शकता.
बेबीकॉर्न, मोड आलेले पावटे आणि काकडीचे सॅलड
बेबीकॉर्न, मोड आलेले पावटे आणि चिरलेली काकडी एकत्र करून त्यात लसूण आणि बेसील पावडर घाला आणि लिंबाचा रस घाला. लिंबू आणि बेसील यामुळे सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. त्याशिवाय या सॅलडमध्ये लोहाचे प्रमाणही अधिक आहे. या सॅलडमध्ये ताजी बेसिलची (बेसील ही तुळशीप्रमाणे एक वनस्पती आहे) पाने मिळाली नाहीत, तर बेसिलचे चूर्ण टाका.
बीन्स आणि भोपळी मिरची सॅलड
राजमा आणि छोले भाजलेल्या भोपळी मिरचीत घालून त्यात काही मसाले मिसळले की, चविष्ट सॅलड तयार होते. राजमा आणि छोल्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय कॅल्शियम, लोह, झिंक आणि क जीवनसत्त्व आपल्याला या सॅलडमधून मिळते. हे सॅलड त्वचा सुंदर राखण्यास मदत करते.
बीन्स आणि भाज्यांचे सॅलड
राजमा, कोबी, गाजर आणि भोपळी मिरची हे सर्व एका खोलगट पसरट भांड्यात घ्या आणि चांगल्या तर्हेने एकत्र करा. तीस मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. वाढण्याआधी त्यावर व्हाईट व्हेनेगर, पिठी साखर, ऑलिव्ह ऑईल, मोहरी पूड आणि मीठ घाला. चांगले एकत्र करा आणि वाढा.