Evergreen vase : सदाबहार फुलदाणी | पुढारी

Evergreen vase : सदाबहार फुलदाणी

Evergreen vase : ताजी फुले घराच्या सजावटीसाठी असतील तर त्यामुळे निर्माण होणारी प्रसन्नता काही आगळीच असते. कारण फुलांमुळे घरातील संपूर्ण वातावरणातच प्रसन्नता जाणवते. एकप्रकारे टवटवीतपणा यामुळे निर्माण होतो. फुलांची सजावट करताना किंवा फुले फुलदाणीत ठेवताना कल्पकतेबरोबरच फुलांची थोडी काळजी घेणेही आवश्यक असते. यामुळे फुलांचा सुगंध आणि टवटवीतपणा अधिक काळ घरामध्ये रेंगाळत राहू शकतो.

बाजारातून फुले आणताना ती ताजी बघून घ्यावीत. त्यासाठी ज्या फुलांच्या पाकळ्या अधिक पट्ट असतील त्यांची निवड करावी. फुले पूर्णपणे उमललेली नसावीत. अर्धवट उमललेल्या पाकळ्या असल्यास अशा फुलांची निवड करावी. ही फुले अधिक काळ टिकतात. पाकळ्यांवर पिवळे डाग पडलेले नसावेत अशी फुले लवकर खराब होतात, फुलदाणीत ठेवण्यासाठी बहुतेक वेळा गुलाब, ऑर्किड, लिली, निशिगंध यासारखी फुले निवडली जातात. या फुलांचा सुगंध दीर्घकाळ राहतो. शिवाय ही फुले झाडावरून काढल्यानंतर बराच काळ राहू शकतात. Evergreen vase

आपण ज्या फुलदाणीत फुले सजवणार आहात ती फुलदाणी सर्वप्रथम स्वच्छ करावी. फुलदाणी खराब असल्यास त्यामध्ये जीवाणूची वाड होते आणि फुले लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे फुले सजवायच्या तासभर अगोदर फुलदाणी गरम पाण्याने स्वच्छ धुवावी. फुलदाणीत फुले ठेवल्यानंतर ती दीर्घकाळ चांगली राहावी म्हणून पाण्यात फ्लोरल फोम टाकावे. हे फ्लोरल फोम बाजारात मिळते. यामुळे फुलांना अन्नपुरवठा होतो. वातावरण ढगाळ असेल, स्वच्छ सूर्यप्रकाश नसेल तर फुले फार काळ टवटवीत राहू शकत नाहीत. अशावेळी फुलदाणीतील पाणी बदलत राहावे.

फुलांना नेहमी थंड वातावरण चांगले असते म्हणूनच ऊन पडणार नाही किंवा उन्हामुळे सभोवतालची जागा तापणार नाही, अशा ठिकाणी फुलदाणी ठेवावी. तसेच इलेक्ट्रिक वस्तू उष्णता वाहून नेणान्या वस्तू फुलांचा टवटवीतपणा घालवतात तेव्हा अशा वस्तूही फुलांच्या रचनेपासून दूर ठेवाव्यात. दुपारच्या वेळी उकाडा वाढतो आणि घरात गरम हवा असते.

अशावेळी फुले कोमेजतात. फुले कोमेजू लागली तर फुलदाणीभोवती बर्फाचे एक-दोन तुकडे ठेवावेत किंवा तळाशी टाकावेत. यामुळे फुलाची कोमजण्याची प्रक्रिया आपण काही काळ नक्कीच थांबवू शकतो. बाजारातून फुले आणल्यानंतर ती फार वेळ बाहेर ठेवू नये. चटकन पाण्यात ठेवावी. म्हणजे ती लवकर कोमेजत नाही. (सजावट)

हेही वाचा : 

Back to top button