घराला नॅचरल लूक द्यायचाय! ‘अशी’ करा सजावट

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

घर सजवणे ही एक कला असते. थोडासा सौंदर्यपूर्ण द़ृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला तर अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपण कलात्मक पद्धतीने घर सजवू शकतो. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण एखाद्या समुद्रकिनारी पाम ट्रीच्या जवळ बसलो आहोत, असा फीलसुद्धा आपण सजावटीद्वारे देऊ शकतो. घरातील शेल्फ्स अस्ताव्यस्त किंवा खूप भरलेले दिसू नयेत, यासाठी मर्यादित रंगांचा वापर करावा. शक्यतो एकच रंग असेल तर जास्त निटनेटकेपणा जाणवतो. घरामध्ये गर्द हिरव्या आणि लांब पानांची झाडे कुंड्यांमध्ये लावून या कुंड्या आकर्षक पद्धतीने सजवू शकतो. घरातील हिरवळ येणार्‍या प्रत्येकाच्या डोळ्यांना गारवा देते. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. नारळाची किंवा तत्सम दोन मोठी पाने घेऊन ती घराच्या भिंतींवर किंवा खिडकीवर लावता येतील. यामुळे घराला एक नॅचरल लूक मिळेल.

घरामध्ये एखादे आकर्षक पेटिंग लावणे हे सुद्धा कलात्मकतेचेच प्रतीक असते. अर्थात कुठलेही मूळ पेंटिंग खरेदी करायचे म्हणजे, त्याला मोठी किंमत मोजावी लागते. तेवढा खर्च करण्यापेक्षा आपणच काढलेल्या काही आकर्षक फोटोंपैकी एखादा वेगळा फोटो एनलार्ज करून त्याची आकर्षक फोटोफ्रेम बनवून ती घराच्या भिंतीवर लावता येऊ शकते. शक्यतो ही फ्रेम पेंटेड कॅनव्हासप्रमाणे तयार केली तर अधिक आकर्षक दिसेल.

घरातील प्रत्येक वस्तूसाठी एक वेगळे टेक्श्चर तयार करावे. म्हणजे ती वस्तू आहे त्यापेक्षा आकर्षक दिसू शकते. आपल्या नेहमीच्याच वापरातील वस्तू आपण साचेबद्ध पद्धतीने रचून ठेवल्या तर बर्‍याचदा त्या असताव्यस्तच वाटतात. म्हणून साधे टेबलसुद्धा नेटक्या पद्धतीने सजवावे. टेबलवर एखादा विणलेला ट्रे जर ठेवला तर येणार्‍या प्रत्येकाचेच लक्ष तो वेधून घेईल. त्यावर कॉफी बिन्स ठेवल्या तर त्याचा सुगंधसुद्धा सर्वत्र दरवळेल.

घरातील वेगवेगळ्या झाडांची फुले एकत्र करून आकर्षक पद्धतीने फुलांची मांडणी करता येऊ शकते. कुठलेही फूल एखाद्या मोठ्या पानासोबत ठेवले तर ते आकर्षक दिसू शकते. त्यामुळे सोप्या पद्धतीने आपण चांगली मांडणी करू शकतो. पारदर्शक असणारे बॉक्सेससुद्धा सजावटीसाठी उपयोगात येऊ शकतात. म्हणजे, शिंपल्यांपासून किंवा हाताने बनवलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. या वस्तू अशा बॉक्समध्ये सुंदर प्रकारे रचून ठेवाव्यात. यामुळे त्या सुरक्षित तर राहतातच शिवाय बॉक्समधून त्या सहजपणे दिसू शकतात आणि त्यावर धुळवगैरे सुद्धा बसत नाही.

फुलदाण्यांमध्ये आकर्षक फुले सजवून ही फुलदाणी डायनिंग रूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवणे चांगलेच असते; पण वेगळ्या पद्धतीनेसुद्धा आपण याचा वापर करू शकतो. बाथरूमध्येसुद्धा आपण छोटासा फ्लॉवरपॉट करू शकतो. यामुळे तुमच्या आदरातिथ्याचा पाहुण्यांना प्रत्यय येईल आणि नेटकेपणाने देखील ठळकपणे दिसून येईल. प्रत्येकवेळी गुलाब, जरबेरा अशाच फुलांचा वापर करायला हवा असे नाही. तर जास्वंद, कन्हेरी अशी जरा वेगळी फुलेसुद्धा आपण सजावटीसाठी वापरू शकतो.

आकर्षक फ्लॉवरपॉट आणि पानांची योग्य रंगसंगती साधून या फुलांपासूनही सुंदर रचना बनवता येऊ शकते. थोडक्यात गृहसजावटीसाठी नेहमीच्याच पठडीतील कल्पनांऐवजी थोड्या वेगळ्या कल्पना वापरल्या तर कलात्मकता अधिक उठून दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news