

स्वयंपाक घर म्हणजे गृहिणीच्या रोजच्या कामाचे ठिकाण. तेथील स्वच्छता आणि नीटनेटकेपणामुळे कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते. स्वयंपाक झाल्यानंतर तिथे पाली, डास, मुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक गृहिणीला ही काळजी घ्यावी लागते. बाजारात मिळणारे फिनेल सर्वच सुवासिक पण शरीराला अपाय न करणारे मिळेलच असे नाही. तेव्हा ते जर किचनकट्ट्यावर टाकले तर आरोग्य बिघडलेच म्हणून समजा. त्यासाठी व्हिनेगर हा घटक महत्त्वाचा ठरतो. व्हिनेगरचा वापर करून किचनकट्टा व्यवस्थित ठेवल्यास किचन प्रसन्न आणि उत्साहवर्धक ठरते.
स्वयंपाकघरातील स्टीलची बेसिन्स खूपदा मळकट दिसू लागतात. 2 टेबलस्पून मीठ व 1 टी स्पून पांढरं डिस्टिल्ड व्हिनेगर यांची पेस्ट बनवून त्या पेस्टनं बेसिन घासल्यास ते चकचकीत होतं.
बेसिनमध्ये अन्नकण गेल्यानं कित्येक वेळा घाणेरडा वास येतो. तो जाण्यासाठी पांढरं डिस्टिल्ड व्हिनेगर प्रथम बेसिनच्या जाळीमध्ये बेकिंग सोडा घालून त्यावर ओतावं. मग 5 मिनिटं थांबून बेसिनच्या पाण्यात गरम पाणी ओतावं.
कचर्याच्या डब्यामधील घाण जाण्यासाठी डबे प्रथम धुवून मग व्हिनेगर व सोड्याच्या मिश्रणानं घासून धुवावेत.
ओव्हनच्या दरवाजावरचे तेलाचे, तुपाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगरमध्ये स्पंज बुडवून दरवाजा व्हिनेगरनं पूर्ण ओला करावा. थोड्या वेळानं पुसून काढावा.
काचेच्या पेल्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी पेपर टॉवेल्स व्हिनेगरमध्ये बुडवून च्या आत व बाहेर गुंडाळून ठेवावेत. त्यानंतर पाण्यानं पेले धुवून पुसून कोरडे करावेत.
व्हाईट डिस्टिल्ड व्हिनेगर आणि मीठ यांच्या मिश्रणानं चहाचे, कॉफीचे कप घासल्यास त्यावरील चहा, कॉफीचे डाग निघून जातात.
प्लास्टिकच्या डब्यांना लागलेले वास व्हिनेगरनं डबे पुसून काढल्यास जातात.
मुंग्या येऊ नयेत म्हणून खिडकीजवळ, उपकरणाच्या आजुबाजूला, दारापाशी व्हाईट डिस्टिल्ड व्हिनेगर पसरावं.
ओट्याच्या कडांना व्हिनेगर ओतून ठेवल्यास मांजरं ओट्यावर चढत नाहीत. (स्वच्छता)