नाक टोचून घेताय? | पुढारी

नाक टोचून घेताय?

सुनीता जोशी : आज पुन्हा एकदा नाकात नथ किंवा रिंग घालणं हा फॅशनचा एक भाग झाला आहे. त्यासाठी आपल्यालाही नाक टोचून घ्यायचं असेल, तर काही गोष्टींची अवश्य काळजी घ्या.

नाकामध्ये नथ किंवा रिंग घालणं हा आज एक फॅशनचा भाग झाला आहे. केवळ भारतीय तरुणीच नाही, तर परदेशी मुली आणि सेलिब्रिटीजही नाकात रिंग घालून फॅशन स्टेटमेंट बनत आहेत. नाकामध्ये रिंग किंवा नथ घालण्याचा संबंध आपल्या संस्कृतीत स्त्रियांच्या सौंदर्याशी जोडला जातो. टेनिस स्टार सानिया मिर्झापासून केटी प्राईजसारख्या परदेशी सेलिब्रिटीजपर्यंत अनेक महिला नाकामध्ये रिंग घालताना दिसतात. केटी प्राईज ज्यावेळी लग्नासाठी भारतात आली होती त्यावेळी तिने भारतीय वधूप्रमाणेच नाकामध्ये नथ घातली होती.

नाकामध्ये घालण्यात येणारी रिंग सोनं किंवा चांदीची असू शकते. नाक टोचून त्यामध्ये रिंग घालण्याचं काम ज्वेलर करतात; पण हल्ली हे काम डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये करू लागले आहेत. त्यासाठी सोने किंवा चांदीच्या वायरचा उपयोग करण्यात येतो. आपण योग्य क्लिनिकमध्ये किंवा डॉक्टरकडे नाक टोचून घेत असाल, तर त्यामध्ये समस्या येत नाहीत, तरीही नाक टोचून घेताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी आपण नाक टोचून घेणार आहात तेथे कोणतंही इन्फेक्शन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी एखादी जखम होऊन डाग पडले असतील, तर नाक टोचून घेऊ नका. किमान याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनेकदा असं होतं की, ज्या जागी तुम्ही नाक टोचून घेऊ इच्छिता त्या जागी गाठ बनण्याची शक्यता असते. असं असेल, तर डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधा. आपल्याला त्वचेसंबंधित अ‍ॅलर्जी असेल, तर त्याबाबत नाक टोचून घेण्याआधीच कल्पना द्यावी.

नाक टोचून घेण्यासाठी तुम्ही जात असाल, तर त्याआधी नेमकं कोणत्या जागी टोचून घ्यायचं आहे, हे ठरवा. काहींना डावीकडच्या बाजूला तर काहींना उजवीकडच्या बाजूला रिंग घालायला आवडते. हे आपल्या नाकाच्या त्वचेवर अवलंबून आहे. नाकाची त्वचा फार नाजूक असते. त्यामुळे ते टोचून घेण्यासाठी तुम्ही जिथे जाणार आहात त्याच्या विश्वसनीयतेबद्दल आधी जाणून घ्या.

हेही वाचा : 

Back to top button