अडगळ दूर करा | पुढारी

अडगळ दूर करा

महिलांमध्ये प्रत्येक वस्तू आवरून ठेवणे, नीटनेटके ठेवण्याची सवय असते. त्यामुळे नकळत बिनगरजेच्या वस्तूसुद्धा जपून ठेवल्या जातात; पण या वस्तू घरात अडचणीच्याच ठरतात. बिनगरजेच्या वस्तूंचा निचरा केल्यास घरात पसारा आणि अडगळ दिसत नाही. त्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेतल्यास सुंदर आणि सुटसुटीत घर होऊन जाईल.

१. बाजारात जाण्याअगोदर सामानाची यादी बनवून घ्या.

२. सेल आणि डिस्काऊंटच्या चक्करमध्ये बिनगरजेचे सामान घेणे टाळावे.

संबंधित बातम्या

३. प्रत्येक वस्तूची आपली जागा निश्चित करून त्यांना काम झाल्यावर योग्य जागेवरच ठेवण्याची सवय लावा. म्हणजे गरज पडल्यास ताबडतोब वस्तू सापडते.

४. मुलांच्या खोलीत वेगवेगळे बॉक्स किंवा कंटेनर ठेवायला पाहिजे, त्याने पुस्तक, स्टेशनरी, खेळणी व्यवस्थित राहतील.

५. सर्दी किंवा गर्मीचे कपडे आवरायच्या आधी हे बघणे जरूरी आहे की, पुढच्या ऋतूत हे कामी येणार आहेत की नाही. जर उपयोगात येणार असतील तरच त्यांना सांभाळून ठेवा.

६. स्वयंपाकघरात रिकामे डबे, बाटल्या किंवा बिनउपयोगी खरेदी केलेले सामान उदा. सुंदर कॉफी मग, क्रॉकरी वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात, त्याचा मोह सोडून कमीत कमी सामान खरेदी करावे.

७. आपल्या वॉर्डरोबमध्ये एकदा डोकावून बघा. बरेच कपडे असे दिसतील की ज्यांना तुम्ही महिनोन्महिने वापरलेलेच नाहीत. जर हे कपडे नवीन असतील तर गरज असलेल्या लोकांना किंवा एखाद्या संस्थेला देऊन टाका.

८. चप्पल स्टँड उगीचच भरलेले नसावे. डिझायनर चप्पल, सँडलमध्ये किती कामाचे आहे आणि कित्येक नुसत्या रॅकची शोभा वाढवत आहे, हे अवश्य बघून घ्या. बाथरूममध्ये रिकाम्या सोपकेस पासून, शँपू, डियो, परफ्यूमच्या रिकाम्या बाटल्या लगेचच तेथून हटवा.

९. वाचण्याची आवड असलेल्या लोकांसाठी आता इंटरनेट सर्वात चांगले माध्यम आहे. तुम्हाला प्रत्येक विषयांवर तेथे सामग्री उपलब्ध असते. म्हणून जर त्याचा वापर करता येत असेल तर उगीचच पुस्तकांचा, मासिकांचा संग्रह करणे टाळा.

१०. पर्यटनाला जाताय तेव्हा तेथील खास कलाकृती आणि कपडे सर्वांनाच आकर्षित करतात; पण त्याची खरेदी करताना नंतर ते अडगळीत पडणार नाही, याची खात्री करा.
– सुनीता जोशी

Back to top button