निरोगी केसांसाठी... | पुढारी

निरोगी केसांसाठी...

सध्याच्या वाढत्या प्रदूषणाचा आणि बदलत्या वातावरणाचा अधिक परिणाम केसांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. याबरोबरच केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याच्या चुकीच्या पद्धती, केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन आणि प्रोटीन यांची कमतरता यामुळे केसांचे अकाली पांढरे होणे, कोंड्याची समस्या, केस गळणे, तुटणे, केसांचा विरळपणा किंवा टक्कल पडणे, केसांची मुळे कमकुवत होणे यांसारख्या केसांच्या तक्रारी सुरू होतात. शरीराच्या आरोग्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे. त्याप्रमाणेच मुलायम आणि निरोगी केसांसाठी पोषक आहाराची गरज आहे. त्यासंबंधीच्याच काही टिप्स…

आहार जीवनसत्त्वयुक्त हवा

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. प्रथिने, जीवनसत्त्वयुक्त आहार, मासे, सोया, कॉटेज, चीझ आणि डाळी यांचाही आहारातील समावेश आवश्यक आहे. पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्यांचा आहारातील समावेश वाढवणे गरजेचे आहे. केसांच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने बी १, बी ६, बी १२, सी आणि व्हिटॅमिन ए हे घटक अधिक पोषक ठरतात. शाकाहारी असणाऱ्यांनी दोन टेबलस्पून प्रोटीनयुक्त पावडरचा आहारात समावेश करावा.

गरम पाण्याने धुऊ नका

केसांची काळजी घेताना ओले केस विंचरणे शक्यतो टाळावे. केस विंचरण्यापूर्वी केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. शॅम्पूने केस धुतल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावे. कंडिशनर लावताना ते संपूर्ण केसांना लागेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर शक्यतो टाळावा. केस नैसर्गिकरीत्या कोरडे करणेच अधिक उत्तम असते. हेडमसाज नियमितपणे केल्यास केसांची वाढ चांगली होऊन केस मुलायम होतात. तेलाने केसांना मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, तीळ, एरंडेल किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. गरम पाण्यात टॉवेल भिजवून घट्ट पिळावा आणि केसांना गुंडाळावा. केस धुण्यासाठी वनस्पतींपासून बनवलेले तसेच प्रोटीनयुक्त शॅम्पू वापरावेत. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. अधिक गरम पाण्याने केस धुणे टाळावे.

– मिथिला शौचे

Back to top button