मासिक पाळी म्हटले की प्रत्येक स्त्रीच्या कपाळावर आठी उमटते. त्या काही दिवसांत होणारे त्रास, शरीरात होणारे बदल, यामुळे बर्याचदा मासिक पाळीकडे 'प्रॉब्लेम' म्हणून पाहिले जाते.
काही दिवसांपूर्वी याच संदर्भात एक लेख वाचण्यात आला. लेख ज्या स्त्रीने लिहिला आहे ती स्वतः मॅरेथॉन धावपटू आहे. तिचे म्हणणे असे की, मासिक पाळीला विशिष्ट महत्त्व देण्याचे काय कारण? जरी 'त्या' दिवसात तुम्हाला तुमच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर बिनधास्त व्हा! जो काही शारीरिक त्रास होईल त्याकडे दुर्लक्ष करा.आता तसे पाहता सध्याच्या जीवनशैलीत प्रत्येक स्त्री खरेतर पाळीच्या दिवसांतही तिचे म्हणून असणारे किंवा ठरलेले काम करतच राहते. मग ते नोकरी, व्यवसाय याच्या निमित्ताने असो किंवा घरकाम असो. अपरिहार्यतेने का होईना हे चक्र सुरूच असते.
परंतु हे सोडल्यास ऐच्छिक असणार्या काही छंद किंवा इतर काही क्रियांबाबत मात्र आपण या दिवसांत जराशी विश्रांती घेण्यास काय हरकत आहे?
अनेकदा, याच्या उलट सर्व वयोगटातील स्त्रिया मात्र पाळीच्या दिवसांतही हिरिरीने बरेचसे उपक्रम करताना दिसतात. त्यातही ज्यात शारीरिक दमछाक होईल असे. उदा. ट्रेकिंग, हायकिंग, बरेच किलोमीटर सायकल चालवणे, इत्यादी. शारीरिक व्यायाम, कसरत यांच्याबाबत पाळीच्या दिवसांत काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवण्याजोग्या आहेत.
व्यायामाची नियमित सवय कशी आहे त्यानुसार हलका व्यायाम असावा, कारण शरीर आणि मन या दोहोंना पाळीत आरामाची नक्कीच गरज असते. स्वतःच्या क्षमता गृहीत धरून आपल्या शरीरावर उगाच जास्त ताण टाकू नये. व्यावसायिक खेळाडू इत्यादी महिला याला अर्थातच अपवाद असतील.
पाळीच्या दिवसात होणारी शारीरिक, मानसिक स्थित्यंतरे याकडे एक न टाळता येणारा त्रास असे न पाहता, हक्काचे संपूर्ण शरीराला आराम देण्याचे दिवस म्हणून पाहता येईल. त्यामुळे पाळी येणे म्हणजे 'प्रॉब्लेम' किंवा ींहेीश लरव वरूी ळप ोपींह असे न वाटता 'सुट्टी' असे समजायला सुरुवात केली तर उत्तम. त्यामुळे आपोआपच पाळी येणे ही एक आनंददायक बाब बनून जाईल. त्याआधी असणार्या दिवसांतील मानसिक किंवा हार्मोनल बदलांमुळे होणारी चिडचिड, राग, नैराश्य हे पाळीला 'सुट्टी' संबोधल्यामुळे काही अंशी नक्कीच आटोक्यात येईल. कारण सुट्टीच्या आधी आपले मन ताणतणाव विरहित आनंदी असते.
कोणत्याही ठिकाणी शारीरिक, मानसिक सहभागाचा अट्टाहास टाळावा. त्यात मी स्त्री आहे, मला पाळी येते म्हणून अमुकतमुक करण्यात मी मागे पडते तेव्हा या ही दिवसात मी हे करून मी कोणापेक्षाही कमी नाही हे दाखवून देईन! ही भावना तर मुळीच ठेवू नये. कारण स्त्री-पुरुष यांच्यात असणार्या नैसर्गिक, मूलभूत फरकामुळे कोणाचे पारडे जड किंवा हलके असूच शकत नाही. शिवाय अशा अट्टाहासाने असणारी शारीरिक, मानसिक ऊर्जा जास्तच खच्ची होऊ शकते. त्याचा पुढील आखणीवर परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा थोडी विश्रांती घेऊन पुन्हा झेप घेण्यास काय हरकत आहे.