अलीकडच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायला फार कमी वेळ मिळतो. अशा वेळी रोज केसांना शाम्पू करणे खूपच अवघड असते. कारण, शाम्पू करण्यापूर्वी आणि नंतर कंडिशनिंग करणे आवश्यक असते आणि तेवढा वेळ महिलांकडे नसतो. अशा वेळी एखाद्या खास प्रसंगासाठी तयार व्हायचे असेल तर केसांचे नेमके काय करावे, ते कशा पद्धतीने बांधावेत हे समजत नाही. म्हणूनच, अशा वेळी झटपट आकर्षक हेअर स्टाईल कशी करायची हे माहीत असणे खूप उपयोगाचे ठरते.
केसांना शाम्पू केला नसेल तर फारसे टेन्शन घेण्याचे कारण नाही. कारण अलीकडे मॅसी हेअरलूक बराच पसंत केला जात आहे. सगळे केस विंचरून फ्रेंच वेणी किंवा फिशटेल प्लेट बनवावी. असा लूक आपल्याला मुलांच्या शाळेत पीटीए मीटिंगसाठी जाताना किंवा ऑफिसच्या कॉन्फरन्सला जाण्यासाठीदेखील उपयोगाचा ठरू शकतो. कुठे बाहेर जाण्याचे नियोजन असेल तर सिल्क स्कार्फ किंवा हॅट घालून केस झाकता येऊ शकतात. यामुळे प्रदूषण आणि धुळीपासूनही केसांचे रक्षण होईल.
ऑफिसच्या संध्याकाळच्या पार्टीला जायचे असेल किंवा इतर ठिकाणी समारंभांना जायचे असेल तर आपल्यासोबत छोटेसे पोर्टेबल हेअर ड्रायर जरूर ठेवावे. केसांचे फ्रिंज चांगल्या पद्धतीने वळवावे आणि केस हलकेसे ओले करून छोट्या छोट्या लटांना बोटांनी गोलगोल फिरवून रोल करावे आणि ड्रायरचा वापर करून केस सेट करावेत. यामुळे काही मिनिटातच नवा लूक मिळेल. वेळ अगदी कमी असेल तर थोडेसे मॉईश्चरायजर स्प्रे करून साईड चोटी किंवा आंबाडा बांधून खांद्यावर एका बाजूने केस पुढे घेता येतील.
अलीकडे या हेअरस्टाईलची बरीच फॅशन आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही कपड्यांवर ही हेअर स्टाईल खुलून दिसते. सकाळची वेळ ही सर्वात धावपळीची असते. अशा वेळी उंच पोनी घालणे अधिक सोपे असते. केस छोटे असतील तर स्टायलिश हेअरबँड किंवा हेअरपीस लावून केस बांधता येऊ शकतात. अशा प्रकारे थोडा वेगळेपणा दाखवला तर धावपळीच्या जीवनातही केसांची चांगली हेअर स्टाईल सहज बनवता येते.