दिसू सुंदर : देखभाल हेअर स्टाईलची | पुढारी

दिसू सुंदर : देखभाल हेअर स्टाईलची

केस आकर्षक दिसण्यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करतो, पण त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणं चुकीच्या पद्धतीने वापरली तर ते आपल्या केसांसाठी आणि सौंदर्यासाठीही घातक ठरू शकतं. त्यामुळे ती वापरताना कोणती काळजी घ्यावी, हे माहीत असणं गरजेचं आहे. 

फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही, तर त्याचबरोबर केसही तेवढेच आकर्षक आणि सुंदर असावे लागतात. आकर्षक केशरचना करण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरतो. त्यामध्ये ड्रायर, रोलर किंवा फ्लॅट आयरन अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. मात्र हीट स्टायलिंगसाठी वापरण्यात येण्याने आपलं नुकसानही होऊ शकतं, याचा आपण फारसा विचार करत नाही. त्यामुळे केसांची अवस्थाही खराब होऊ शकते. पण त्याचा दोष या हेअर अप्लायन्सेनाच देऊन चालणार नाही. आपण त्याचा वापर कसा करतो, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. आपण अनेकदा त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने करतो. त्यामुळे आपल्या केसांचं नुकसान होऊन सौंदर्यालाही बाधा येऊ शकते. केस लवकर वाळवण्यासाठी आपण ड्रायरचा वापर करतो. केस कुरळे असतील, तर ते जास्त काळ सुकवल्यामुळे आणखी कुरळे होऊ शकतात.

त्याचप्रमाणे केस लांब असतील आणि त्यासाठी आपण हेअर ड्रायरचा अधिक उपयोग केल्यास त्याचाही केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. केस लवकर सुकवण्यासाठी अनेकजणी ड्रायरचं तापमान अधिक ठेवतात. त्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अधिक तापमानाऐवजी मध्यम तापमानातच केस सुकवावेत. त्याचप्रमाणे केस आणि ड्रायर यांच्यामध्ये योग्य अंतर ठेवावं. आपले केस खूप जास्त आणि अधिक लांब असतील, तर ते सर्व एकदम सुकवण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. पहिल्यांदा केसांची तीन भागांमध्ये विभागणी करावी आणि एक एक भाग हेअर ड्रायरने सुकवावा. 

कर्लिंग आयरन किंवा रोलर्सचा वापर करण्याआधी संपूर्ण केस आधी सुकवावेत. रोलर्स किंवा कर्लिंग आयरनमध्ये ज्या प्रकारच्या तापमानाचा उपयोग करण्यात आलेला असतो, तो हेअर ड्रायरच्या तापमानापेक्षा फार वेगळा असतो. त्यामुळे ओल्या केसांवर कर्लिंग आयरन किंवा रोलर्सचा उपयोग करू नये. कुरळ्या केसांवर फ्लॅट आयरनचा उपयोग करण्याआधी केसांना ब्लो ड्राय करून ते सरळ करून घ्यावेत. त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला दिसतील. 

संबंधित बातम्या

हेअर ड्रायर किंवा हेअर स्टायलिंगसाठी वापरण्यात येणार्‍या अन्य उपकरणांमुळे केसांचं नुकसान होतं. पण काही गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्या केसांना ऊर्जा देऊ शकता. त्वचेच्या देखभालीप्रमाणेच केसांच्या देखभालींचीही तेवढीच आवश्यकता आहे. त्यामुळे नेहमी पोषक पदार्थांनी युक्त असणार्‍या शॅम्पूचा वापर करावा. केसांमध्ये कंडीशनर लावण्यासाठी रुंद कंगव्याचा वापर करावा. आठवड्यातून एकदा हेअर मास्कही करावा. हेअर स्टायलिंग प्रॉडक्टचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याने आपलं नुकसान झालं असेल, तर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठीही काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जी केसांना रात्रभर लावून ठेवण्याची आवश्यकता असते, अशा हेअर ट्रीटमेंटचा उपयोग करावा. आपण केसांना तेलानेही मसाज करू शकता. याशिवाय हेअर नरिशिंग क्रीमही बाजारात उपलब्ध आहे. यामुळे आपल्या केसांमध्ये सकाळपर्यंत बदल झालेला आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे नियमित काळाने केसांना ट्रिमिंग करावं. ट्रिमिंगमुळे ज्यांना दोन तोंडं आहेत असे केस निघून जातील आणि आपले केस अधिक आकर्षक दिसतील. सहा इंचांपेक्षा आपले केस जास्त लांब असतील, तर त्यांना- केसांना डोक्यावरील केसांना जे पोषण मिळतं ते मिळत नाही. त्यामुळे अशा स्थितीत नियमित काळाने ट्रिमिंग करणं आवश्यक आहे. 

Back to top button