

Instagram is addictive सध्या सर्व जगच सोशल मिडीयाच्या आहारी गेले आहे यात सर्वाधिक वापर हा इन्स्टाग्राम व फेसफूकचा होतो. किशोरवयीन मुले तर इन्स्टाग्रामच्या पूर्ण वेडात आहेत. काही मुले तर सोशल मिडीयाच्या पूर्ण आहारी गेले आहेत. यामुळे मुलांचे मोठे नुकसान होत आहे. यावर अनेक देशांमध्ये आता अल्पवयीन मुलांवर सोशल मिडीया वापरावर बंदी घातली आहे. सध्या अमेरिकेत एका खटल्याच्या सुनावणीवर जगाचे लक्ष लागले आहे.
हा खटला आहे मेटाचे सिईओ मार्क झकरबर्ग यांच्याविरोधात, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्म्समुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत हा खटला सुरू आहे. हा खटला 'KGM' नावाच्या एका २० वर्षीय तरुणीने दाखल केला आहे. तिने दावा केला आहे की इन्स्टाग्रामची रचना 'स्लॉट मशीन' किंवा 'कॅसिनो' सारखी करण्यात आली आहे. 'इन्फिनिट स्क्रोलिंग' आणि 'लाईक्स' यांसारख्या फीचर्समुळे मुलांच्या मेंदूमध्ये 'डोपामाइन' रसायनाची पातळी वाढते, ज्यामुळे त्यांना याचे व्यसन लागते.
या खटल्याची सुनावणी सुरु आहे 18 फेब्रुवारी रोजी मार्क झुकरबर्ग यांची साक्ष नोंदवण्यात आली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मुलांना व्यसनाधीन बनवणारे Defective Product आहेत असे गंभीर आरोप झकरबर्ग यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
काय यामध्ये तथ्य आहे ?
इन्स्टाग्राम आणि फेसबुक यासारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममुळे माझी मानसिक हानी झाली आहे. असा आरोप या मुलीने केला आहे. चिंता एक्झांयटी सतावू लागली आहे असे तिने म्हटले आहे . यासाठी Mark Lanier या फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सादर केली यामध्ये इन्स्टाग्राम वापरणाऱ्या १३.५% किशोरवयीन मुलींनी कबूल केले की या अॅपमुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार अधिक प्रबळ होतात. १७% मुलींच्या मते, इन्स्टाग्राममुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींशी संबंधित विकार वाढले आहेत. यासाठी मेटाचे सीईओ व कंपनीचे कर्मचारी यांच्यामधील इमेल, मेसेज सादर करण्यात आले. यामध्ये वरील चर्चा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नफा कमवण्यासाठी सर्व काही
मेटा कंपनीला या धोक्यांची पूर्ण कल्पना होती, तरीही नफा कमावण्यासाठी त्यांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले. कंपनीचे लक्ष मुलांचा स्क्रीन टाइम वाढवण्यावर होते, जेणेकरून अधिक जाहिराती दाखवता येतील. यामुळे अधिकाधिक मुले याकडे आकृष्ट होतील हे कंपनीने पाहिले.
मुलांना लागलेले 'व्यसन':
वकील लॅनिअर यांनी झुकरबर्ग यांना २०१९ मधील एका संशोधन अहवालाबद्दल विचारले, जो एका बाह्य कंपनीने इन्स्टाग्रामसाठी तयार केला होता. या अहवालानुसार, इन्स्टाग्राम वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांना "त्यांना कसे वाटतेय याची पर्वा न करता त्याचे व्यसन (Hooked) जडले आहे." इतकेच नाही तर, तरुण वापरकर्ते त्यांच्या इन्स्टाग्राम वापराबाबत एखाद्या "व्यसनी" व्यक्तीसारखी (Addicts' narrative) भाषा वापरत असल्याचेही या संशोधनातून समोर आले होते.
मार्क झुकरबर्ग यांचा बचाव काय?
यावर उत्तर देताना मार्क झुकरबर्ग यांनी न्यायालयात हे आरोप फेटाळून लावले म्हणाले की, हे संशोधन मेटा कंपनीच्या अंतर्गत करण्यात आलेले नव्हते. तसेच, मेटाचे वकील Paul Schmidt यांनी जेव्हा झुकरबर्ग यांची उलटतपासणी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की त्याच अहवालात इन्स्टाग्राम वापराचे काही 'सकारात्मक' पैलू देखील मांडले आहेत. Paul Schmidt यांनी असा युक्तिवाद केला की, आपले प्लॅटफॉर्म कसे वापरले जातात याचे संशोधन करणे आणि त्यात सतत सुधारणा करणे, हा मेटाच्या नियमित प्रयत्नांचाच एक भाग आहे. "आम्ही वापरकर्त्यांना उपयुक्त वाटतील अशी उत्पादने बनवतो. जर लोकांना एखादी गोष्ट आवडली नाही किंवा त्यांच्यासाठी ती वाईट असेल, तर ते दीर्घकाळ ती वापरणार नाहीत," असे त्यांनी सांगितले.
इमेल्स मध्ये काय ?
२०१९ मधील एका ईमेलमध्ये, जो झुकरबर्ग आणि मेटाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता, कंपनीच्या 'अंमलबजावणी न झालेल्या' वयोमर्यादेच्या धोरणावर आक्षेप घेण्यात आला होता. ब्रिटनचे माजी उपपंतप्रधान आणि मेटाचे 'हेड ऑफ ग्लोबल अफेअर्स' निक क्लेग यांनी या ईमेलमध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, "वयोमर्यादेच्या नियमांची नीट अंमलबजावणी होत नसल्यामुळे आपण (मुलांच्या सुरक्षिततेसाठी) सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असा दावा करणे कठीण झाले आहे."
मुलांच्या मानसिकतेवर खरंच परिणाम होतोय का?
तज्ज्ञांच्या मते आणि या खटल्यातील दाव्यांनुसार, किशोरवयीन मुलांच्या मेंदूचा विकास पूर्ण झालेला नसतो. सोशल मीडियावरील 'परफेक्ट' दिसण्याची स्पर्धा, सततची तुलना यामुळे मुलांमध्ये झोपेची कमतरता जाणवत असून त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. दरम्यान या खटल्यात नाव असलेल्या टिकटॉक (TikTok) आणि स्नॅपचॅट (Snapchat) या कंपन्यांनी सुनावणी सुरू होण्यापूर्वीच न्यायालयाबाहेर तडजोड केली. मात्र, या तडजोडीच्या अटी व नियम जाहीर करण्यात आले नाहीत.