

Hair Growth Inversion Method: केसांची गळती रोखण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक उपाय सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये 'इन्व्हर्जन मेथड' (Inversion Method) नावाचा एक नवा ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे. या पद्धतीनुसार, दररोज पाच मिनिटे डोके उलटे लटकावून ठेवल्यामुळे टाळूची रक्तअभिसरण क्रिया वाढते, ज्यामुळे केस वेगाने वाढतात आणि नवीन फॉलिकल्स सक्रिय होतात, असा दावा केला जातो. मात्र, ही viral पद्धत खरोखरच प्रभावी आहे का किंवा हा केवळ एक भ्रम आहे का, याबाबत प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मयंक सिंह यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. मयंक यांच्या मते, ही संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे. निरोगी व्यक्तीच्या टाळूवरील केसांच्या फॉलिकल्सना आधीपासूनच रक्ताचा पुरेसा पुरवठा मिळत असतो. तसेच, केसांची वाढ ही केवळ रक्ताभिसरणावर अवलंबून नसून अनुवंशिकता (Genetics), हार्मोन्सचे संतुलन आणि फॉलिकल्सची स्थिती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. डोके उलटे करून पाच मिनिटे राहिल्याने केस गळती थांबेल किंवा टक्कल पडण्याची समस्या दूर होईल, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. टाळूची मालीश केल्यामुळे रक्ताभिसरण तात्पुरते सुधारू शकते आणि केस थोडे दाट भासू शकतात, परंतु यामुळे नवीन केस किंवा फॉलिकल्स तयार होत नाहीत.
सोशल मीडियावर या उपायाचे फायदे सांगितले जात असले तरी याचे दुष्परिणाम लपवले जातात. उलटे लटकल्यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त भार पडतो, कवटीतील दाबावर परिणाम होतो आणि रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, glaucoma, हृदयविकार किंवा मणक्याचा त्रास आहे, अशा लोकांनी अशा पद्धती अजिबात वापरू नयेत.
तज्ज्ञांचा सल्ला:
केसांच्या समस्येवर घरगुती उपायांपेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित ठरते. टाळूची योग्य काळजी घेण्यासाठी आणि केस गळतीवर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार, सिरम किंवा उपचारांची मदत घ्यावी.