Generation Beta 2025 | नव्या वर्षात जन्माला येणार बीटा जनरेशन

डिजिटल, तांत्रिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाची पिढी
Generation Beta 2025
Generation Beta 2025 | नव्या वर्षात जन्माला येणार बीटा जनरेशनfile photo
Published on
Updated on

अक्षय निर्मळे

एकविसावे शतक रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाच एका नव्या पिढीची सुरवातही होणार आहे. 2025 नवीन वर्षाची सुरवात काही दिवसांवर आली आहे आणि आता या नवीन वर्षासोबतच ही नवीन पिढीही सुरू होईल. साधारणतः 1901 पासून ठराविक वर्षांचा कालखंड गृहित धरून पिढीचे नामकरण केले गेले आहे. तद्नुसार नवीन वर्षापासून हा नवा पिढीबदल होत आहे. 2025 पासून जनरेशन बीटा सुरू होत आहे. ही जनरेशन 2039 पर्यंत असणार आहे.

म्हणजेच, जानेवारी 2025 ते डिसेंबर 2039 या काळात जन्मलेली पिढी ही बीटा जनरेशन असणार आहे. नामकरण झालेल्या पिढ्यांचा इतिहास सन 1901 पासून धरला तर आपण ग्रेटेस्ट जनरेशन पासून आता अल्फा जनरेशनपर्यंतचा टप्प्यापर्यंत आलो आहोत.

Summary

मिलेनियल्स, जनरेशन झी (झेड), जनरेशन अल्फा ही नावे आता अपरिचित राहिलेली नाहीत. जनरेशन्स म्हणजे पिढ्यांचे हे नामकरण आता नवीन वर्षात नवीन पिढीकडे पास ऑन होत आहे. जानेवारी 2025 पासून 2039 पर्यंतच्या काळात जन्माला येणारी पिढी जनरेशन बीटा म्हणून ओळखली जाईल.

कशी असेल जनरेशन बीटा?

जनरेशन बीटा हा शब्द 2025 नंतर जन्मलेल्या पिढीसाठी वापरला जातो. ही पिढी डिजिटल, तांत्रिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असेल. जनरेशन बीटा हा शब्द बीटा सॉफ्टवेअरच्या विकासामधील टप्प्यासारखा वापरण्यात आला आहे. जो सतत प्रगतीशील आणि बदलांसाठी तयार असतो. या पिढीचे वैशिष्ट्य म्हणजे ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) आणि औद्योगिक क्रांती 4.O त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असेल.

जनरेशन बीटाची वैशिष्ट्ये

ही पिढी स्मार्ट उपकरणे, आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी यामध्ये सहजपणे कार्यक्षम असेल. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा उपयोग असेल. या पिढीसाठी एआय आधारित शिक्षक, डिजिटल वर्ग आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग ही सामान्य बाब असेल. दूरस्थकाम, फ्रीलान्सिंग आणि गिग इकॉनॉमी या गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा भाग असतील. पारंपरिक 9 ते 5 नोकरीची संकल्पना या पिढीसाठी इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाच्या वापराचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम ही पिढी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल. ध्यान, योग आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी डिजिटल साधने वापरली जातील. तथापि, तंत्रज्ञानावर असलेल्या अवलंबित्वामुळे ही पिढी अधिक वेगाने डिजिटल व्यसनाच्या आहारी जाण्याचीही शक्यता आहे. या पिढीत माहितीची (डेटा) गोपनीयता आणि सायबरसुरक्षेचे प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. टेक्नोसॅव्ही असल्याने ऑनलाईन संवादामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होण्याची शक्यता आहे, त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो.

जनरेशन बीटा ही एक अशी पिढी असेल जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाईल. यापिढीचे पालन-पोषण करताना पालक, शिक्षक आणि समाजाने त्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवणे, मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्यात नैतिकता रुजवणे यावर भर देणे गरजेचे असणार आहे. जनरेशन बीटा ही जगाला नव्या पायरीवर नेणारी पिढी ठरेल, परंतु अर्थातच त्यासाठी योग्य दिशा देणे ही जबाबदारी आजच्या पिढीची आहे.

यापूर्वीच्या जनरेशन्स

ग्रेटेस्ट जनरेशन ः 1901-1924

सायलेंट जनरेशन ः 1925-1945

बेबी बूमर्स ः 1946-1964

जनरेशन एक्स ः 1965-1980

मिलेनियल्स ः 1981-1996

जनरेशन झी ः 1997-2012

जनरेशन अल्फा ः 2013-2024

जनरेशन बीटा नंतरच्या पिढ्या

जनरेशन गॅमा ः 2040-2054

जनरेशन डेल्टा ः 2055-2069

जनरेशन एप्सिलॉन ः 2070-2084

जनरेशन झेटा ः 2085-2100

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news