

पुढारी ऑनलाईन :
सध्या बाजारात हिरव्यागार आंबट-गोड चविच्या कैऱ्या विकायला आल्याचे दिसून येत आहे. कच्च्या आंब्याचा वापर लोक अनेक प्रकारे करतात. कारले आणि भेंडीच्या भाजीत टाकलेला कच्चा आंबा भाजीची चव आणखीन वाढवतो. मात्र आज आम्ही तुम्हाला कच्च्या आंब्याची आंबट-गोड चवीची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहोत. अधिकतर लोक कच्च्या आंब्याची चटणी बनवून खाणे पसंत करतात. मात्र एकदा तुम्ही या आंबट चवीच्या आंब्याच्या चटणीला ट्राय केले तर पुन्हा-पुन्हा बनवून खाल हे नक्की.... या चटणी समोर पनीर आणि छोले सारख्या भाज्याही फिक्या पडतील. तर चला पाहूया कशी बनवायची कच्च्या आंब्याची चटणी.
पहिली स्टेप :
कच्च्या आंब्याची चटणी करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक मध्यम आकाराचा आंबा घ्यावा लागेल. आंब्याला स्वच्छ धुवून घ्या. आता त्याला कापून त्यातील कोयी काढून टाका. आंब्याचे छोटे-छोटे तुकडे कापून घ्या. तस पाहायला गेलं तर कच्च्या आंब्याची चटणी ही दगडी पाट्यावर बारीक केली तर छान चवीला बनते. मात्र शहरातील लोक मिक्सरमध्येही बारीक करू शकतात.
दुसरी स्टेप :
आता मिक्सरच्या जारमध्ये कच्च्या आंब्याचे तुकडे टाका. त्यात चवीनुसार मीठ, कुटलेली किंवा सुकलेल्या दोन मिर्च्या घ्या. यामध्ये दोन ते तीन पुदीण्याची पाणे टाका. यामुळे या चटणीचा स्वाद आणखीन वाढेल. चटणीत २ चमचे बडीशेप घाला यानंतर आणखी एकाचवेळी सर्व गोष्टी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
तिसरी स्टेप :
जेंव्हा हे मिश्रण थोडे बारीक होईल तेंव्हा मिश्रण हलवून त्यात छोटा गुळाचा खडा टाका. आपल्या आवडीनुसार तुम्ही गुळ टाकू शकता. जर तुम्हाला आंबट चव हवी असेल तर गुळ कमी टाका. जर तुम्हाला गोड चटणी हवी असेल तर गुळ थोडा अधिक टाकला तरी चालेल. लक्षात ठेवा या चटनीत पाणी घालायचे नाही. गुळ टाकल्यानंतर चटणीतील सारे घटक आपल्यातील पाणी सोडतात. तुम्हाला हवे असेल तर फक्त एक चमचाभर पाणी टाकू शकता.
चौथी स्टेप :
चटणी खूप बारीक वाटून घ्या. आता तयार आहे कच्च्या आंब्याची आंबट-गोड चटणी. ही चटणी तुम्ही काही दिवस फ्रिजमध्येही ठेवू शकता. आंब्याची ही चटणी तुमच्या जीभेला चांगली चव देईल. तुम्ही ही चटणी चपाती किंवा पराठ्यांसोबत खाल्ली तर तुम्ही भाज्याच विसरून जाल.