सर्वत्र नवरात्रीचा मंगलमय माहोल आहे. देवीच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतो. या दरम्यान देवीच्या नैवेद्यासाठी तांबूल बनवला जातो. याशिवाय अनेकदा हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमांना घरी येणाऱ्या स्त्रियांनाही तांबूल किंवा विडा दिला जातो.
तांबूलातील मुख्य घटक म्हणजे विडयाचं पान. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक शुभकार्याला विडयाच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तसेच नागर संस्कृतीतही आलेल्या अतिथीला मुखवास म्हणून किंवा निरोप देताना मान देण्याची पद्धत म्हणून विडा दिला जातो. विडयात किंवा तांबूलात अनेक आरोग्यास हितकारक अशा घटकांचे मिश्रण असते. यामुळे तांबूल मुख, कंठ, पाचन, रक्तशुद्धी या संदर्भातील समस्यांवर गुणकारी आहे. तुम्हीही देवीच्या नैवेद्यासाठी तांबूल बनवू इच्छित असाल तर पुढील सोपी रेसिपी जरूर ट्राय करा.
साहित्य :
विड्याची पानं : 25
बडीशेप : 4 चमचे
गुलकंद : 2 चमचे
कात : 1 टी स्पून
जेष्ठमध पावडर : 2 टेबलस्पून
किसलेले खोबरे : 4 टेबलस्पून
लवंग : 7
वेलची : 9
कृती :
विडयाची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. यामध्ये पाण्याचा अंशही राहणार नाही याची काळजी घ्या.
पानांचे देठ काढून घ्या. हाताने तुकडे करा. वरील साहित्यात गुलकंद वगळता मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
थोडी जाडी भरडी पेस्ट करा.
नंतर गुलकंद मिसळून घ्या. तांबूल तयार आहे.