

सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करणे ही सर्वोत्तम आणि आदर्श पद्धत मानली जाते. अन्य वेळेला विद्यार्थ्यांचा मूड चांगला असेलच असे नाही.
एखाद्या विषयाचा अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही विद्यार्थी सकाळी लवकर उठून अभ्यास करतात, तर काही जण अभ्यासासाठी दुपारची वेळ निवडतात. तसेच काही मंडळी रात्री उशिरापर्यंत जागरण करून अभ्यास करण्यास प्राधान्य देतात. अभ्यासाची वेळ वेगवेगळी असल्याने त्याचा प्रभावदेखील विद्यार्थ्यांवर पडत असतो. तसे पाहिले तर काही जण अभ्यास कधी करावा, यावरून संभ्रमात असल्याचे दिसतात. मात्र, इथे सकाळी उठून अभ्यास केल्यास लाभ कसा होतो, याबाबत सांगता येईल.
अभ्यासाच्या वेळी मन ताजेतवाने असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आकलनशक्तीवर होतो. तज्ज्ञदेखील सकाळच्या वेळी अभ्यास करण्यावरच अधिक भर देतात. कारण दिवसभरात किंवा रात्री अभ्यास केल्यास आपल्या मनावर कोणता ना कोणता ताण असतो. तसेच दिवसभर केलेल्या कामाच्या थकव्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येतो. परिणामी, दुपारी किंवा रात्री केलेले वाचन लक्षात राहिलच याची हमी नाही. याउलट रात्री चांगली झोप झाल्यानंतर मनावर कोणताही ताण नसतो आणि मूडही रिलॅक्स असतो. अशा स्थितीत स्मरणशक्ती अधिकच जागरूक राहते आणि अभ्यासही लवकर समजतो. अभ्यासाच्या वेळी मनात विचार घोळत असतील, तर तो अभ्यास समजत नाही. दुपारी किंवा रात्री अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
मध्यरात्र किंवा दुपारच्या तुलनेत सकाळच्या वेळी अतिशय शांतता, प्रसन्न आणि आल्हाददायक असते. वातावरणात प्रसन्नता आणि शांतता असेल तर अभ्यास अधिक एकाग्रतेने होतो. पहाटे चार किंवा पाचच्या वेळी असलेली शांतता ही अभ्यासाला अत्यंत उपयुक्त वेळ मानली जाते. यावेळी परिसरात कोणताही गोंगाट, अडथळा नसल्याने अभ्यास हा निर्विघ्नपणे करता येतो. केवळ अभ्यासच नाही तर कोणतेही काम, उपक्रम आपण सकाळच्या वेळी केल्यास ते काम लवकर मार्गी लागते आणि हा अनेकांचा अनुभव आहे.
चांगली झोप झाल्यानंतर सकाळच्या वेळी लवकर अभ्यास सुरू करताना मनावर कोणताही ताण जाणवत नाही. दिवसभराच्या कामाची आखणी आणि वेळापत्रक तयार करून अभ्यासाचे नियोजन करू शकतो. याउलट दुपारी आणि रात्री अभ्यास करताना दिवसभर केलेल्या कामाचा परिणाम जाणवतो. परिणामी अभ्यास प्रभावीपणे होत नाही. मानसिक आणि शारीरिक आरामानंतर सुरू केलेला अभ्यास हा आपल्याला सकारात्मक परिणाम देतो.
आजकाल एकाग्रतेत आणि अभ्यासात अडथळा म्हणजे सर्वात मोठा घटक सोशल मीडिया होय. दुपारी किंवा रात्री अभ्यास केल्यास सोशल मीडियाची टिवटिव सारखी चालू असते. त्यामुळे आपले अभ्यासात लक्ष लागेलच याची खात्री देता येत नाही. याउलट सकाळी माणसांबरोबर सोशल मीडियाही शांत असल्याने अभ्यास विनाअडथळा पार पडतो.