बारावीचा टप्पा पार पडला की जीव भांड्यात पडतो; पण तेव्हाच वेळ असते ती करिअरचा आलेख आखण्याची. त्याची सुरुवात होते ती विषयांच्या निवडीपासून. बहुतेकांच्या मनाची गोंधळलेली स्थिती असते. विविध विषयांच्या पर्यायात भविष्य पाहायचे असते. त्यामुळे निवड अधिक कठीण झाली आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा पर्यायच मोजके होते, तेव्हा बहुतांश हुशार विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, केंद्रीय सेवा यांचीच निवड करायचे; पण आज मात्र विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय आहेत. त्यामुळे योग्य निवड न केल्यास भविष्य टांगणीला लागू शकते.
महत्त्वाच्या टिप्स :
आपल्या करिअरची योजना तयार करावी
प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा अटळ आहे. ती वाढत जाते.
व्यावसायिक विषयांमध्ये प्रवेश संख्या मर्यादित असते.
प्रतिस्पर्धी संख्या जास्त असते.
आपल्यामध्ये कितीही क्षमता, मेरीट असले तरीही आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमात किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी सुयोग्य योजना तयार करावी.
करिअरचे विविध पर्याय कोणते आहेत त्यासाठी करिअर कौंन्सिलर, शिक्षक, माजी विद्यार्थी यांची मदत घेता येऊ शकते.
योग्य विषयांची निवड:
बारावीनंतर एखाद्या खास विषयाची निवड ही विद्यार्थ्यांची आवड आणि उपलब्ध पर्याय यांच्यावर अवलंबून असते. कलाकार किंवा सर्जनशील असाल तर जाहिरात, फॅशन डिझाईनसारख्या कोर्सेसची निवड करू शकतो. विश्लेषण करू शकत असाल तर इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञान या क्षेत्रात करिअर करू शकता. त्याशिवाय काही विशेष अभ्यासक्रमही आहेत जे शिकून करिअरमध्ये अधिक वेगाने प्रगती करू शकता. मात्र, विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही विशेष अभ्यासक्रमास प्रवेश घेताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्यावी ती म्हणजे त्या अभ्यासक्रमाला जाण्याचा त्यांचे स्वतःचा हेतू काय आहे. मात्र, तरीही गोंधळाची स्थिती निर्माण होत असेल तर प्रोफाईल टेस्ट करून घ्यावे. त्यामुळे आपली क्षमता ओळखता येते आणि त्यानुसार प्रशिक्षण अभ्यासक्रमाची निवड करता येऊ शकते. कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करताना या काही खास गोष्टींकडे जरूर लक्ष द्यावे.
आवडीचा विषय लक्षात घेऊन कोर्स निवडा :
दुसर्याची नक्कल करू नका, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे लक्ष्य, प्रतिभा आणि रूची वेगवेगळी असते.
स्वयंमूल्यांकन करावे :
कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी स्वतः एक ठाम निर्णय घेतला पाहिजे. स्वतःला कोणत्या कामाची जास्त आवड आहे किंवा कोणत्या कामात रूची आहे ते लक्षात घ्या. ज्या मध्ये स्वतःला सिद्ध करू शकता अशा सर्वच पर्यायांची यादी करा.
पर्याय शोधावे :
काही वर्षांपूर्वीपर्यंत विज्ञान शाखेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी हे दोनच पर्याय होते. पण आताचा काळ बदलला आहे. आज आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. बायोटेक्नॉलॉजी, बायोइंजिनिअरिंग, फिजिओथेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनसारखे कोर्सेस करता येतात. त्याचप्रमाणे कला शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांना बिझनेस किंवा हॉटेल व्यवस्थापनाचा कोर्स करता येतो. रिटेलिंग, हॉस्पिटॅलिटी, टूरिझम इंडस्ट्रीचादेखील एक भाग होता येईल. ज्या व्यक्ती सर्जनशील आहेत त्या फॅशन डिझायनिंग, मर्चडायझिंग, स्टायलिंगचे कोर्सेस करू शकतात.
संस्थेची निवड :
हल्ली प्रवेश परीक्षेशिवाय विविध संस्थांमध्ये प्रवेश मिळत नाही; पण सरकारी महाविद्यालये किंवा खासगी संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टींचा जरूर विचार केला पाहिजे.
शिक्षकवृंदांची गुणवत्ता, प्राध्यापक, व्याख्याता आणि सहायक प्राध्यापकांचे प्रमाण, अभ्यासक्रमातील विविधता, नोकरी मिळण्याची टक्केवारी, मूलभूत सुविधा.
इतर अभ्यासक्रम :
नॅनो टेक्नॉलॉजी : 12 वीनंतर नॅनो तंत्रज्ञानात बीएससी किंवा बी.टेक. त्यानंतर त्याच विषयात पुढे एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते.
अंतराळ विज्ञान किंवा स्पेस सायन्स ः या क्षेत्रात तीन वर्षांचे बीएससी आणि 4 वर्षांचा बी.टेक. अभ्यासक्रमासमवेत पीएच.डी. पर्यंतचा अभ्यासक्रम करता येतात. इस्रो आणि बंगळुरुतील आयआयएससी मध्ये करता येतात.
रोबोटिक सायन्स : रोबोटिक विज्ञानात एमईची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये संशोधनाचे काम मिळू शकते.
अॅस्ट्रो फिजिक्स : 4 ते 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम म्हणजे बीएस्सी फिजिक्सला प्रवेश घेऊ शकतो. अॅस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करता येते.
डेयरी सायन्स : बारावीनंतर विद्यार्थ्यांना भारताच्या पातळीवर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 4 वर्षांचा डेअरी तंत्रज्ञानाचा पदवी अभ्यासक्रम करता येऊ शकतो. काही संस्था 2 वर्षांचा पदविका अभ्यासक्रमही चालवतात.
पर्यावरण विज्ञान : या अंतर्गत इकोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, प्रदूषण नियंत्रणसारख्या विषयांचा अभ्यास करतात. त्यात नोकरी मिळण्याच्या खूप संधी आहेत.
मायक्रो बायोलॉजी : बीएससी इन लाईफ सायन्स किंवा बीएससी इन मायक्रो बायोलॉजी कोर्स करू शकतो.
वॉटर सायन्स : जल विज्ञान त्यात हायड्रोमिटियोरोलॉजी, हायड्रोजियोलॉजी, ड्रेनेज बेसिन मॅनेजमेंट, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, हायड्रोइपन्फॉर्मेटिक्ससारख्या विषयांचा अभ्यास केला जातो.
प्रमुख शिक्षण संस्था :
वाणिज्य आणि कला या दोन्ही शाखांसाठी पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त अशी व्यावसायिक क्षेत्रे आहेत जिथे प्रवेश घेतल्यानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच उज्ज्वल भविष्य घडवू शकता.
फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन, डिझाईन, रिटेल आणि मॅनेजमेंट यातील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. या चाचणीमधून 1680 जागांवर प्रवेश दिला जातो.
काही हॉटेल मॅनेजमेंट संस्था फूड प्रॉडक्शनमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन करतात. सरकारी 12 खाद्य संस्था देखील या संबंधीचे अभ्सासक्रम राबवतात. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केवळ शेफ म्हणूनच नव्हे तर हॉटेल उद्योगाशी निगडित अन्य क्षेत्रातही करिअर करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट तसेच केटरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुकांना बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
स्टॉक ब्रोकर होण्यासाठी कमीत कमी वाणिज्य क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. अर्थात इतरही विद्यार्थी स्टॉक ब्रोकर होऊ शकतात. आपल्याला वित्त, व्यापार, अर्थशास्त्र, कॅपिटल मार्केट अकाऊंट, इन्व्हेस्टमेंट इत्यादींची चांगली समज आणि आवाका असेल तर करिअरची सुरुवात कोणत्याही स्टॉक ब्रोकिंग फर्ममधून करू शकता.
आर्टस किंवा कला शाखेत जाणारे बहुतेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीत असतात. पण त्या व्यतिरिक्त व्यवसाय म्हणून व्यवस्थापन, पत्रकारिता, मार्केट अॅनालिसिस, टिचिंग, अॅथ्रोपोलॉजी, ह्यूमन रिसोर्स, एमएसडब्ल्यू इत्यादी क्षेत्रांमध्येही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.