प्रज्ञाशोध परीक्षा आहे तरी काय?
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी 'राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा सद्य परिस्थितीत स्पर्धा परीक्षांनी शैक्षणिक जीवनविश्व व्यापून टाकले आहे. आजमितीस शिपायापासून तर जिल्हाधिकारी यांच्या पदांपर्यंत स्पर्धा परीक्षा अनिवार्य झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना नोकर्या मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या चाकोरीतून जाणे क्रमप्राप्त झाले आहे.
शालेय स्तरावर असणार्या ऑलिंपियाड, MTSE, NNMS, गणित संबोध, गणित प्रावीण्य, गणित प्रज्ञा, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा इ. परीक्षांमुळे बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन रुजविला जातो. शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाची स्पर्धा परीक्षा म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (छढडए) ही परीक्षा इ. १० वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिष्यवृत्ती देणे हा आहे.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणारी ही परीक्षा प्रथम १९६२ ते १९८५ पर्यंत इ. १२ वी विज्ञान वर्गासाठी घेण्यात येत होती. पुढे १९८६ ते २००७ पर्यंत ही परीक्षा इ. १०वी साठी घेण्यात येऊ लागली. त्यानंतर २००७ ते २०११ पर्यंत ही परीक्षा इ. ८ वीसाठी घेण्यात येत होती. मात्र, २०१२ पासून पुन्हा ही परीक्षा इ. १० वीसाठी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत घेण्यात येते.
* ही परीक्षा दोन स्तरावर घेतली जाते.
अ) राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा
इ) राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
अ) राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षा :-
ही परीक्षा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येते. या म्हणजे २०१७-१८ शैक्षणिक वर्षात ती १२ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात आली. इयत्ता दहावीला प्रविष्ठ होणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा तयारी करून दिली पाहिजे. या परीक्षेच्या तयारीमुळे स्पर्धा परीक्षांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होतो व त्याचा आत्मविश्वास वाढतो. बरेच विद्यार्थी व पालक यांना वाटते की राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमुळे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागे पडतील किंवा बोर्डाच्या परीक्षापासून ते परावृत्त होतील. पण हा केवळ गैरसमज आहे. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये संपूर्ण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो. शिवाय ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम संपवावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी खूप अगोदर तयार होतात.
* अभ्यासक्रम :-
१. बौद्धिक क्षमता चाचणी –
ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारण भावविश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ५० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. या पेपरच्या तयारीसाठी Mc Graw Hill Education Series हे पुस्तक यालाच Study Package for NTSE असेही नाव आहे.
२. भाषाकौशल्य –
यामध्ये भाषाविषयक 50 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात
– उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधणे
– कविता वाचून प्रश्नांची उत्तरे शोधणे
– विरुद्धार्थी शब्द बनविणे
– अर्थपूर्ण परिच्छेद बनविणे
– अपूर्ण म्हणी पूर्ण करणे
3. शालेय क्षमता चाचणी
ही सामान्यत: इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान (४० गुण), समाजशास्त्र (४० गुण) आणि गणित (२० गुण) हे तीन विषय असतात.
रिझल्ट :-
राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेचा रिझल्ट सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत घोषित केला जातो. तो आपणास www.mscepune.in या वेबसाईटवर तुमचा बैठक क्रमांक नोंदवून पाहू शकतो. राष्ट्रीय स्तर प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड झालेल्या मुलांची नावे दिली जातात. राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फ राष्ट्रीय स्तर परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले जाते.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा :-
राज्यस्तरीय परीक्षेतून तयार केलेल्या (NTS) विद्यार्थ्याचा गुण यादीतून राज्याला ठरवून दिलेल्या कोट्यानुसार निवडलेल्या उमेदवारांनाच अंतिम परीक्षेस बसता येईल. अंतिम परीक्षा (NCERT) नवी दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी साधारणत: मे महिन्यात घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा १३ मे २०१८ रोजी आहे. महाराष्ट्रात या परीक्षेची दोनच केंद्रे आहेत ती म्हणजे मुंबई आणि पुणे.
परीक्षेचे स्वरूप
राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेप्रमाणे असते.
अभ्यासक्रमः
१) बौद्धिक क्षमता चाचणी (Mental Ability Test) राज्यस्तरीय परीक्षेप्रमाणे परंतु काठीण्यपातळी जास्त असते.
२) शालेय क्षमता चाचणी N.C.E.R.T. चा गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम असतो. तो S.S.C बोर्डच्या अभ्यासक्रमापेक्षा कठीण
असतो.
३) भाषाकौशल्य (Language Testing) या प्रश्नपत्रिकेमध्ये ५० प्रश्न इंग्रजी भाषेचे आणि ५० प्रश्न हिंदी भाषेचे आहेत. विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि हिंदी यापैकी एका भाषेतील प्रश्नांची उत्तरे लिहावयाची आहेत. राष्ट्रीय स्तर प्रज्ञा शोध परीक्षेची बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठीमध्ये असते. भाषा कौशल्य या विषयाची प्रश्नपत्रिका इंग्रजी अणि हिंदीमध्ये असते.
महत्त्वाचे :-
१) प्रत्येक अचूक उत्तराला एक गुण दिला जाईल.
२) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केला जाईल आणि अनुत्तरित प्रश्नासाठी कसलेही गुण कमी केले जाणार नाही.
३) या प्रश्नपत्रिकेसाठी अतिशय मर्यादित वेळ दिला आहे व सर्व प्रश्नांचे गुण समान असल्यामुळे तुम्ही वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करायला पाहिजे म्हणून कोणत्याही एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका.
शिष्यवृत्ती :-
अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्तीसाठी १००० विद्यार्थी निवडले जातात. डउ साठी १५० आणि ST साठी ७५ तसेच अपंगांसाठी ३० आणि उरलेल्या ७४५ शिष्यवृत्त्या या खुल्या प्रवर्गासाठी ठरवून दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याने गेली २६ वर्षे प्रथम क्रमांकाने शिष्यवृत्त्या मिळवल्या आहेत.
शिष्यवृत्तीचे स्वरूप :-
१) इ. ११ वी व इ. १२ वीसाठी – दरमहा १२५० रुपयेप्रमाणे
२) सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत (उदा. B.A.,B.COM, B.SC.,B.E., B.Tech)
– दरमहा २००० रुपयेप्रमाणे
३) सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर
पदवी) – दरमहा २००० रुपयेप्रमाणे
४) Ph.D साठी वर्षांपर्यंत – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखासाठी) नियमानुसार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती :-
NSTE इ. १० वीसाठी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी या परीक्षेचे आयोजन NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत करण्यात येते. या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते. या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती देण्यात येते. या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीसाठी परीक्षेस बसतात. परंतु काहींची निवड होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अभ्यासूवृत्ती दिवसाच्या २४ तासांपैकी १८ ते २० तास अतुलनीय अभ्यास करण्याची प्रवृत्ती, चिकाटीपणा, कठोर परिश्रम या सर्व गुणांची प्रेरणा घेऊन परीक्षेची जोरदार तयारी करावी. यासाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. १० वीसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेमध्ये समाविष्ट झालेल्या व परीक्षा दिलेल्या परंतु शिष्यवृत्तीसाठी पात्र न ठरलेल्या अनुसूचित जातीच्या (SC) सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या 80% रक्कम सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षांपासून देण्यास सुरुवात झाली आहे. (राष्ट्रीय शिष्यवृत्ती दरमहा १२५० रुपये दिली जाते तिच्या ८० टक्के म्हणजे १००० रुपये दिली जाते). दरवर्षी अनुसूचित जातीच्या सदर शिष्यवृत्ती पात्रताधारक संबंधित विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून बार्टी संस्था प्राप्त करून घेते व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत असते.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचे फायदे
– शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यास दरमहा १२५० रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.
M.P.S.C. आणि U.P.S.C. परीक्षांची तयारी होण्यास काही प्रमाणात मदत होते.
– उच्च अभ्यासक्रमातील प्रवेश परीक्षासाठी फायदा होतो.
Tags : National Talent Search Exam, Pradnya Shodh Pariksha, Mental Ability Test
