सतीश जाधव
नोकरीच्या मुलाखतीचे अनेक प्रकार असतात. त्यापैकीच एक टेलिफोनिक मुलाखतीचा समावेश आहे. मुलाखतीची ही पद्धत जुनी असली तर आजच्या इंटरनेट, सोशल मीडिया आणि व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात प्रचलित झाली आहे आणि आपले महत्त्व टिकून आहे. टेलिफोनिक मुलाखती म्हणजेच दूरध्वनीवर चर्चा करणे. याचा वापर आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. कारण आजच्या बिझी शेड्यूलमुळे प्रत्येकाला मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचणे शक्य नसते तसेच मुलाखर्त्यालाही वेळ असतोच असे नाही. तिसरे कारण म्हणजे वेळ कमी असेल आणि भरती लवकर करायची असेल तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो.
टेलिफोनिक मुलाखत सुरू करण्यापूर्वी काही बेसिक, प्राथमिक माहिती घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेळ. कंपनी आणि उमेदवार यांना चर्चा करण्यासाठी योग्य वेळ निवडणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फोन. लँडलाइन किंवा मोबाईल दोन्हीपैकी कशावरूनही आपण मुलाखत देऊ शकता. फक्त लक्षात ठेवा, दोन्हीचे नेटवर्क चांगले असायला हवे. मोबाईलची बॅटरी चांगली असावी. त्यानंतर मुलाखतीचे स्थान महत्त्वाचे आहे. गोगांटापासून दूर असणारे ठिकाण निवडावे. जेणेकरून दोघांनाही एकमेकांचा आवाज सुस्पष्टपणे जाणे गरजेचे आहे.
नोटपॅड बाळगणे : मुलाखतीदरम्यान नोटपॅड बाळगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मुलाखतकर्त्याची प्रत्येक गोष्ट लक्षात राहिलच असे नाही. पुन्हा विचारणा केल्यास आपली प्रतिमा खराब होण्याची शक्यता असते. सतत विचारण्यात येणार्या प्रश्नांमुळे मुलाखतकर्ते कधी कधी बेजार होतात. त्यामुळे वही, पेन सोबत ठेवूनच मुलाखतकर्त्यांशी संवाद साधावा.
कागदपत्रांची तयारी : टेलिफोनिक मुलाखतीत संपूर्ण कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. मुलाखतकर्त्यांकडून गुण, अनुभव आदींची माहिती विचारली जाते. जर आपण फोन होल्ड ठेऊन कागदपत्रे पाहावयास गेल्यास आपली उमेदवारी नाकारली जाऊ शकतो. वेतन, अपेक्षा, नोटिस पिरियड, कामगिरी अशा बेसिक प्रश्नांची तयारी अगोदरच तयारी करावी.
लक्ष देऊन ऐका : टेलिफोनिक मुलाखतीत मुलाखर्त्याची प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकणे गरजेचे आहे. यासाठी लक्षपूर्वक ऐका. मुलाखतीवर लक्ष केंद्रीत करा. अर्धवट ऐकून घाईगडबडीत कोणतेही उत्तर देऊ नका. जर एखादा प्रश्न समजला नाही तर पुन्हा विचारा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आत्मविश्वासपूर्वक द्या. आपली अचूकपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करा. मोबाईलवर मुलाखत रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा. रेकॉर्ड मुलाखत ऐकून ते पुन्हा ऐकावे जेणेकरून त्यातील चुका काढून पुढच्या मुलाखतीसाठी सुधारणा करता येईल.