पोलिस भरती व्हायचंय? | पुढारी

Published on
Updated on

विजयालक्ष्मी साळवी

पोलिस हा समाजाचा रक्षक असतो. पोलिसांचा संबंध कायद्याशी असतो तसाच तो थेट सामान्य लोकांंशीही असतो. त्यामुळे हे काम अत्यंत जबाबदारीचे आहे. शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देणार्‍या तरुणांच्या मनात पोलिसांत भरती होण्याची उर्मी जागृत होतेच. अर्थात बहुतेक तरुणांच्या मनात वर्दीचे आकर्षण असल्याने त्यांना पोलिस होण्याची स्वप्ने असतातच. आपल्याकडे अनेक खेळाडू पोलिसांत भरती होण्याची किंवा आंतरराष्ट्रीय कामगिरी कऱणार्‍या अनेकांना थेट पोलिसांतील पद दिले जाते. यामुळे तरुणांमध्ये पोलिस भरतीविषयीचे आकर्षण आहेच. त्यामुळे पोलिस भरती हा देखील करिअरचा एक चांगला पर्याय तरुणांसमोर आहे. 

खाकी वर्दीचे आकर्षण तरुणाईला असतेच. अनेक तरुण हेच स्वप्न उरी बाळगून आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देतात. ज्या तरुणांची शारीरिक क्षमता आणि उंची योग्य प्रमाणात असते त्यांना पोलिसांत भरती होणे सोपे असते. दिल्ली पोलिस वगळता, सर्वच राज्यांत पोलिस भरती ही राज्य सरकाच्या अंतर्गत होते. थोडक्यात पोलिस भरती हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांच्याकडूनच पोलिस भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. दिल्ली पोलिसची भरती प्रक्रिया ही निवड आयोग म्हणजे एसएससी तसेच दिल्ली पोलिस भरती केंद्राकडून केली जाते. 

पोलिस दलाची कनिष्ठ स्तरावरील भरती ही राज्याची जबाबदारी असते तर पोलिसातील महत्त्वाची वरिष्ठ पदे ही लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीकडून भरली जातात. यूपीएससी दरवर्षी सिव्हिल सेवा परीक्षेचे आयोजन करते. या परीक्षेचे तीन टप्पे असतात, त्यातून योग्य उमेदवाराची निवड केली जाते. यूपीएससीकडून ज्या वरिष्ठ पदांची भरती केली जाते त्यात जिल्हा मॅजिस्ट्रेट किंवा दंडाधिकारी,  उपजिल्हादंडाधिकारी इत्यादींचा समावेश असतो. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतर सर्व राज्यांच्या पोलिसांची भरती राज्याकडून केली जाते. एएसआय आणि एसआय म्हणजेच उपनिरीक्षक आणि निरीक्षक यांच्या भरतीसाठी एसएससी कडून अखिल भारतीय स्तरावर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीही घेतली जाते. त्यानंतरच अंतिम निवड होते. राज्यात पोलिसांची भरती करण्यासाठी राज्यपातळीवर जाहिरात दिली जाते. त्यानंतर विविध अटी नियमांचे पाल करून निवड प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाते. शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. 

पोलिस भरतीसाठी अनेक तरुण म्हणजे शब्दशः शेकड्याने तरुण इच्छुक असतात, तयारीही करतात. मात्र, प्रत्येकाचे स्वप्न खरे होत नाही. पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी थोडी विशेष तयारी करावी लागते, तसेच काही नियमांचे पालनही करावे लागते. त्यासाठी सरसकट पोलिस भरतीसाठी प्रयत्न करण्यापूर्वी पोलिस भरतीचे नियम जाणून घेणे नाक्कीच उपयोगी पडेल. 

कशी असते पोलिस भरतीची प्रक्रिया : पोलिसांच्या भरतीशी निगडित आयोग, संस्था किंवा बोर्ड ही निवड प्रक्रिया व्यवस्थापन करण्यासाठी कॉम्प्युटरवर आधारित एक व्यवस्थापन प्रणाली वापरावी लागते. त्यात ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, प्रक्रिया करणे, संपूर्ण भरती प्रक्रियेत निवड यादी, निवड झालेल्यांची यादी तयार करणे या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून निवड केली जाते. 

कशी करावी तयारी : बहुतांश वेळा उमेदवार लेखी परीक्षेत तर उत्तीर्ण होतो; पण शारीरिक क्षमता चाचणीत मात्र अयशस्वी होतात. त्यामुळे शारीरिक क्षमता चाचणी साठीही तयारी करणे आवश्यक आहे. जेणेकरून ही चाचणीही यशस्वीपणे पार करता येईल. लेखी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मात्र 6 महिन्यांपासून तयारी करणे आवश्यक असते. या परीक्षेच्या तयारीसाठी मॉडेल अ‍ॅन्सर पेपर तसेच या परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके जी बाजारात उपलब्ध असतात त्याचा उपयोग करावा. अर्थात परीक्षेसाठी नियमित अभ्यास आणि तयारी करणे आवश्यक असते. 

या परीक्षेनंतर प्रत्यक्ष मुलाखतही घेतली जाते, त्याचीही तयारी गांभीर्याने केली पाहिजे. मुलाखतीची तयारी करताना कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यानुसार तयारी केली पाहिजे. या परीक्षेला संपूर्ण तयारी करून सामील व्हायला पाहिजे. परीक्षा, मुलाखत, शारीरिक क्षमता चाचणी कोणताही टप्पा सहज नाही आणि कोणत्याही टप्प्याला कमी लेखता कामा नये. परीक्षेची तयारी करताना आळशीपणा करून फायदा नाही. परीक्षेची, मुलाखतीची तयारी करताना मार्गदर्शनासाठी मदत किंवा क्लास लावण्यातही काहीही गैर नाही.

पोलिस भरतीची ही प्रक्रिया दीर्घ असली तरीही योग्य तयारीने सामोरे गेल्यास ही प्रक्रिया पूर्ण करून पोलिस होण्याचे स्वप्न तरुण नक्कीच साकारू शकतात. 

पोलिस भरती झाल्यानंतर काही वर्षांनी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन पदोन्नतीही मिळवू शकतो. थोडक्यात बौद्धिक आणि शारीरिक परिश्रमाची जोड देऊन पोलिस भरतीमध्ये निवड होण्याचे प्रयत्न जरूर करू शकतो. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news