मॅनेजमेंट अकाऊंटंटची आव्हानात्मक करिअरवाट

तंत्रज्ञान, एफएमसीजी, फार्मास्युटिकल्स आदी क्षेत्रांमध्ये या पदांकरिता मोठ्या संधी
management accountant challenging career
मॅनेजमेंट अकाऊंटंटची आव्हानात्मक करिअरवाटPudhari File Photo
Published on
Updated on
जगदीश काळे

कंपन्यांच्या व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून काम पाहणार्‍या व्यक्तीची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होऊ लागली आहे. यामुळेच माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी, फार्मास्युटिकल्स आदी क्षेत्रांमध्ये या पदांकरिता मोठ्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

तरुण पिढीमध्ये चार्टर्ड अकाऊंटन्सी, कॉस्ट अकाऊंटन्सी, कंपनी सेक्रेटरी (सीएस) यांसारखे अभ्यासक्रम लोकप्रिय बनले आहेत. या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्यांना देश-विदेशांतील कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळू लागल्या आहेत. याखेरीज या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपला स्वतंत्र व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटंट करून टॅक्सेशन, कॉर्पोरेट मॅनेजमेंट आदी विषयात स्पेशलायझेशन करून विद्यार्थ्यांना आपल्या करिअरला वेगळ्या उंचीवर नेता येऊ शकते.

या द़ृष्टीने मॅनेजमेंट अकाऊंटंट हे नवे क्षेत्र तरुणांना खुणावू लागले आहे. पारंपरिक अकाऊंटिंग शिक्षणात जे विषय शिकवले जातात त्याबरोबरच ‘बिझनेस मॅनेजमेंट स्किल’ हा विषयही विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट अकाऊंटन्सीमध्ये शिकवला जातो. यात बिझनेस इकॉनॉमिक्स, एथिक्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, बिझनेस मॅथेमॅटिक्स, फायनान्शियल अकाऊंटिंग आणि मॅनेजमेंट अकाऊंटिंग आदी विषयांचे शिक्षण यामध्ये दिले जाते. अकाऊंटिंग, फायनान्स आणि मॅनेजमेंट या तीनही विषयांचा समुच्चय मॅनेजमेंट अकाऊंटंट या क्षेत्रात झालेला आढळून येईल.

जबाबदार्‍या कोणत्या?

मॅनेजमेंट अकाऊंटंट या पदावर काम करणार्‍या व्यक्तीला कंपनीतील अनेक प्रकारच्या जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतात. कोणत्याही नव्या प्रकल्पाचे आर्थिक परिणाम काय होऊ शकतात, याचे आकलन करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.

याचबरोबर व्यवसायाचे धोरण आखणे, व्यवसायाचे अंतर्गत ऑडिट करणे ही कामेही या पदावरील व्यक्तीला करावी लागतात. याखेरीज कंपनीतून केल्या जाणार्‍या वेगवेगळ्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचे कामही या पदावरील व्यक्तीला कारावे लागते. मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून काम करणार्‍याला मार्केटिंग, मनुष्यबळ, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, उत्पादन आदी वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांबरोबर काम करावे लागते.

आवश्यक कौशल्ये

मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून काम करण्यासाठी तुमचे गणित पक्के असावे लागते. त्याचबरोबर त्याला उद्योग क्षेत्रातील जागतिक घडामोडींची कल्पना असणेही आवश्यक आहे. कंपनीकडून घेतले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक निर्णय कितपत यशस्वी ठरतात, तसेच या निर्णयांचे परिणाम काय होतात, याचा मागोवा घेण्याचे काम मॅनेजमेंट अकाऊंटंटलाच करावे लागते. ज्यांना करिअरमध्ये नोकरी करत असताना नवनव्या क्षेत्राची माहिती करून घेण्याची इच्छा आहे, ज्यांना आपल्या क्षेत्रातील भविष्यातील घडामोडींचा वेध घ्यायचा आहे, अशांकरिता हे क्षेत्र आव्हानात्मक आहे.

शैक्षणिक पात्रता

ज्या विद्यार्थ्यांनी अकाऊंटिंग, इकॉनॉमिक्स अथवा फायनान्समध्ये पदवी मिळवली आहे, असे विद्यार्थी तसेच चार्टर्ड अकाऊंटंटची पदवी मिळवलेले व्यावसायिक, नोकरदार मॅनेजमेंट अकाऊंटिंगचा अभ्यासक्रम शिकू शकतात. याखेरीज मॅनेजमेंट, बिझनेस लॉ, टॅक्सेशन या विषयांत पदवीधर असलेल्यांना चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंस् या संस्थेतून पदवी मिळवता येते. ही पदवी 12 वी नंतरही मिळवता येते. मॅनेजमेंट अकाऊंटंटचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला सरकारी क्षेत्रातील बँका, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल या कंपन्यांमध्ये बिझनेस-फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट, फायनान्शिअल कंट्रोलर, प्रोजेक्ट मॅनेजर, मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करावे लागते. याखेरीज टॅक्सेशन, व्हॅल्युएशन, रिस्क मॅनेजमेंट या क्षेत्रांतही अनेक संधी उपलब्ध आहेत.

हा अभ्यासक्रम शिकवणार्‍या संस्था पुढीलप्रमाणे आहेत :

चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंटस, मुंबई,

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया, दिल्ली.,

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंटस् इंडिया, कोलकाता,

वेतन किती मिळते?

मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून काम करणार्‍या व्यक्तीला दरवर्षी साधारण सहा ते नऊ लाखांचे पॅकेज मिळते. या क्षेत्रात आणखी प्रगती करू इच्छिणार्‍या व्यक्तींना अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. याकरिता विद्यार्थ्यांना नॅशनल ट्रेड पब्लिकेशन या विषयाचा नियमित अभ्यास करणे आवश्यक असते. तुम्हाला व्यवसायाचा आणि फायनान्शिअल क्षेत्राचा अनुभव असेल तर तुमच्या या क्षेत्रातील प्रगतीला मोठा वाव आहे हे लक्षात घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news