राकेश माने
उद्योगाशी संबंधित इंटर्नशिप हे क्लासरूम ते कामाचे ठिकाण यातील पूल मानला जातो. अभ्यासाबरोबर व्यावसायिक कौशल्याचा अनुभव मिळाल्यास संबंधित अभ्यासक्रमाचे सखोल ज्ञान मिळवण्यास हातभार लागतो. एखादी संकल्पना किंवा टूल्स याची इंत्यभूत माहिती मिळवण्यासाठी इंटर्नशिप महत्त्वाचे ठरते.
आजच्याघडीला विद्यापीठ आणि कॉलेजच्या अॅकॅडेमिक वर्षात इंटर्नशिपला महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध उद्योगांकडून इंटर्नशिपचे आयोजन केले जाते आणि विद्यापीठ, महाविद्यालय अशा इंटरशिपमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देत असते. उदा. जर तुम्हाला बिल्डिंग क्षेत्रात काम करायचे असेल तर तुम्ही त्यासंबंधीच्या रिअल्टी, सिमेंट, पोलाद कंपनीत इंटर्नशिप करू शकता. याबरोबर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टायपेंडदेखील दिला जातो. पत्रकारितेत करिअर करायचे असेल तर शिक्षणाबरोबर तीन महिने किंवा सहा महिने एखाद्या वृत्तपत्रात, वृत्तवाहिनीत काम करण्याची संधी मिळते. यातून शिक्षणाबरोबर कामाचा अनुभव मिळतो. कालांतराने पदवी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला नव्याने प्रशिक्षण घेण्यात वेळ देण्याची गरज भासत नाही.
कौशल्य विकासासाठी अशा प्रकारची इंटर्नशिप विद्यार्थ्यांसाठी मोलाची ठरते. व्यावसायिक क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवताना आत्मविश्वास निर्माण करणे आणि वाढीस लावण्यासाठी इंटर्नशिप मोलाची कामगिरी बजावते.
कॉलेज आणि महाविद्यालयाच्या वर्गात एखाद्या टूल्सचे किंवा उपक्रमाचे कागदोपत्री किंवा तोंडी विश्लेषण करणे वेगळे आणि प्रत्यक्षात काम केल्यानंतर त्याचे विश्लेषण करणे यात फरक असतो. या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, ध्येयप्राप्तीसाठी मिळणारे प्रोत्साहन, कामातील बारकावे, सामूहिक जबाबदारी, प्रसंगी अडचणीवर मात करण्याची क्षमता, नेतृत्व क्षमता, व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या गोष्टी साध्य होतात.
इंटर्नशिपमुळे प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाबराबेरच ऑफिसचे नियम, अटी, कार्यतत्परता, शिस्त याचाही अनुभव मिळतो. कामाच्या ठिकाणी कसे राहवे, बोलावे किंवा एकमेकांशी संवाद कसा ठेवावा, सहकार्यांना मदत करणे यासारख्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. कौशल्य विकासाबरोबर कार्यालयीन शिस्त शिकवण्याचे काम इंटर्नशिप करत असते. एखादा निर्णय घेताना किंवा त्याची अंमलबजावणी करताना तो निर्णय कोणकोणत्या टप्प्यातून जातो, याचाही अनुभव आपल्याला मिळतो.
इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांत विचारशक्तीला चालना मिळते. वैचारिक क्षमता आणि पातळीत प्रगल्भता आणण्याचे काम इंटर्नशिप करते. कामाची डेडलाईन पाळताना उडणारी तारांबळ, ऐनवेळी निर्माण झालेले संकट किंवा अडचणींवर कशी मात करावी याचे प्रशिक्षणही अशा इंटर्नशिपमधून मिळते. विश्लेषक क्षमता वाढवण्याचेही काम इंटर्नशिप करते. एखादा उपक्रम राबवताना चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होते. या चर्चेत सहभागी होऊन आपले विचार मांडता येतात. एखादे काल्पनिक, नावीण्यपूर्ण उपक्रम राबवताना किंवा मॉडेलची निर्मिती करताना या गोष्टीचा सारासार विचार कसा करावा, याबाबतची क्षमताही इंटर्नशिपमधून विकसित होत असते.