

आपण स्वतःला परिपूर्ण समजत असतो. मला समजतं, त्यातलं इतरांना काहीच कळत नाही, अशीही काहींची भावना असते. तुम्ही मान्य करा अथवा करू नका; पण सर्वांमध्ये असतात तशा काही उणिवा तुमच्यातही आहेतच. फक्त वेळीच आपण त्या ओळखल्या आणि स्वतःला बदलवलं, तर प्रगतीचे दरवाजे आपल्यासाठी सताड उघडे होतात.
मी इतरांपेक्षा वेगळा आहे, हा झाला आत्मविश्वास आणि मीच इतरांपेक्षा वेगळा आहे, हा झाला अहंकार, आपण हे एकदा मान्य केलंच पाहिजे की, मीही माणूस आहे, माझ्यात काही दोष आहेत आणि माझ्याकडूनही काही चुका होऊ शकतात. एकदा हे मान्य झालं की त्या दुरुस्त करण्याची आपली तयारी होते, मानसिकता होते. चूक झाल्यावर ती कबूल करण्याची सवयच माणसाला अधिक मोठं बनवते. पण, त्यासाठी आधी आपल्यात काय उणिवा आहेत ते शोधायला हवं, म्हणजे आपल्याला त्यात बदल करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व खुलवता येईल.
अनेकांना आपल्यात काय खास आहे, तेच माहीत नसतं. आपल्यातले अनेकजण चालढकल करणारं आयुष्य जगत असतो. स्वतःला आजमावण्याची संधीच स्वतःला देत नाही. त्यामुळे स्वतःची घुसमट तर होतेच, शिवाय साचलेपण येऊन आपण आजूबाजूच्या स्पर्धेतून हळूहळू बाद होत जातो.
त्यासाठी आधी स्वतःलाच आव्हान दिलं पाहिजे. आता मी जेवढं काम करतो आहे, त्यापेक्षा अधिक करू शकतो का, याचा किमान अंदाज तर घ्यायला हवा ना. अधिक नाही करू शकलो, तर किमान आताच्या कामापेक्षा अधिक चांगले, विशेष काम करू शकतो का, याचाही अंदाज घ्यायला हवा. त्यातून स्वत: तली ऊर्जा तर वाढेलच आणि जगण्याची नव्याने उभारी मिळेल.
अहंकाराचा वारा न लागो माझिया चित्ता, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आता एवढी मोठी माणसं जर अहंकारापासून दूर राहू इच्छित असतील, तर आपण कोण? हा अहंकारच आपल्याला संपवायला निघतो. चारीक विचार करा, मीच इतररांपेक्षा वेगळा आहे, ही भावना आपल्याला दुबळी करते आणि आपण बाकी काही करायचं नावच घेत नाही.
तुम्हाला स्वतःबरोबरच इतरांच्या गुणांचीही कदर करता आली पाहिजे. वेळोवेळी त्यांच्या चांगल्या कामांना दाद देता आली पाहिजे. तसे केल्यावर तुमच्याही चांगल्या कामाचे कौतुक झाल्याशिवाय राहत नाही.
अतिआत्मविश्वास कोणत्याही स्थितीत घातकच. तुम्ही एखाद्या कामात कितीही एक्सपर्ट असलात तरी एखाद्या वेळी अतिआत्मविश्वास तुम्हाला दगा देऊ शकतो. त्याने इतरांचीही मने दुखावली जाऊ शकतात. समूहात काम करताना इतरांना बरोबर घेऊन चालण्याची, त्यांच्याही मतांचा आदर करण्याची सवय अंगी बाणवून घ्यावी लागते.
बऱ्याचदा कुणी काही सूचना केलेलं आपल्याला आवडत नाही. त्याचा एकतर आपण अपमान तरी करतो, किंवा ती सूचना धुडकावून तरी लावतो; पण असे करताना कंपनीचे किंवा त्या व्यक्तीचे नुकसान होतेच असे नाही, तर नुकसान तुमचेच होते. एकतर तुम्ही नव्या कल्पनांना थारा देत नाही, असा समज तुमच्याविषयी निर्माण होतो आणि अशी बरीच माणसे दुखावली की तुमच्याविषयी गॉसिपही सुरू होतात.
आपल्यातल्या या काही उणिवा जर आपण काढल्या तर यशस्वी होण्यापासून आपल्याला कुणीच रोखू शकत नाही; पण त्या काढण्याआधी आपल्यात काय उणिवा आहेत, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. त्या समजल्या तरच त्या कमी करणं किंवा थांबवणं शक्य होऊ शकतं.
नेहमी लक्षात ठेवा की, कोणतेही यश आपल्या गुणांवरच मिळत असतं. आपल्यातील कमजोरी आपल्याला अधिक कमजोर करते. आपल्यातील उणिवाच आपल्या यशात अडसर ठरतात. त्यामुळे त्यांना चार हात लांबच ठेवा.
• उणिवा काढण्यासाठी आधी त्या समजून घ्या.
• इतरांतील गुण, त्यांची मजबूत बाजू नेहमी विचारात घ्या.
• इतरांना कधीही कमी लेखू नका.
• म्हणजेच इतरांच्या सूचनांचे, कल्पनाचे नेहमी स्वागत करा.
• तुमचे कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवा.
• मानवतावादी दृष्टिकोन ठेवा. सतत चिडचिड करण्यानं माणसं दुखावतात आणि तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
• मीच खरा, या अट्टहासापेक्षा योग्य काय आहे, याची शहानिशा करण्यावर भर असू द्या.