डिजिटल स्कूल, ऑनलाईन शाळा, ऑनलाईन अभ्यास हे सारं म्हणायला फार सोपे आहे. पण हे सारं मुलांच्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे हे ही तितकच मान्य करावं लागेल. अगदी मोठ्या गटासाठी किंवा थोड्या मोठ्या मुलांसाठी ठीक आहे. पण छोट्या मुलांना जवळ घेऊन शिकवणचं कठीण असतं तर ऑनलाईन खूपच दूरची गोष्ट आहे.
सध्या परिस्थिती भयानक आहे. covid-19 सगळीकडे थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचा आहे. ते आपण सोडू शकत नाही. पण शाळेत जसं शिकवतो तसं शिकवता येणार नाही हेही मान्य करावे लागेल. त्याहीपेक्षा मुलांचे मूड फार वेगळे असतात. त्यांच्या मूडप्रमाणे त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
प्रत्येक परिस्थितीवर आपल्याला मात करता आली पाहिजे म्हणून हा पर्यायी मार्ग स्वीकारलेला आहे. ऑनलाईन शाळा, ऑनलाईन अभ्यास हे एरवी आपल्याला म्हणायला फार छान वाटतं. एखादा लेख लिहून पाठवण्यापेक्षा टाईप करून मेल केला की काम समलं. पटकन काम होऊन जातं. पोस्टाचे तिकीट लावा हे सगळे प्रकार करायला नकोत. पण शाळेच्या बाबतीत आपण असं नाही म्हणू शकत नाही. शाळेत जाऊन आपण जे शिकतो ते खूप छानपणे डोक्यात राहते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा पुन्हा शिक्षकांचे शब्द कानावरून जात असतात आणि काही ना काहीतरी डोक्यामध्ये शिरत असतं हा फरक आहे. सध्याच्या परिस्थितीतून दुसरा मार्ग काढत आपण ही ऑनलाइन शिक्षण पद्धती निवडलेली आहे. आमच्या तर छोट्या मुलांना अभ्यास घेताना किंवा व्हिडिओ पाठवताना आम्हालाच वाटतं खरंच या मुलांचं नातं अगदी खूप छान असं मैत्रीचं असतं. घरात घडलेली प्रत्येक गोष्ट मुलं टिचरला सांगत असतात, अगदी गोतावळा असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण टिचरचं आणि मुलांचं नातं तसं फार निरागस असतं. शाळा बंद, मुलांचा किलबिलाट नाही हे सगळे जरी खरं असलं तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हे योग्यच आहे.
डॉ. शीतल शिवराज मालूसरे
शिक्षिका, महाड-रायगड
9850963181
malusaresheetal malusaresheetal90@gmail.com