1960 च्या दशकात जितेंद्र अभिनित 'गीत गाया पत्थरो ने' हा व्ही. शांताराम यांचा चित्रपट कमालीचा गाजला. शिल्पकलेची आवड जोपासणार्या कलाकाराची कहाणी या चित्रपटात साकारली आहे. शिल्पकला केवळ अभ्यासातून किंवा सरावातून येत नाही तर ती एक अंगभूत कला आणि दैवी शक्ती मानली गेली आहे. जसा गोड आवाज हा शिकल्याने नाही तर उपजतच असावा लागतो, तसेच शिल्प कलाकाराचे असते. शिल्पकलेची आवड बाळगणार्या कलाकाराचा विकास होण्यासाठी त्यांला शास्त्रोक्त धडे शिकवण्याचे काम आपल्याकडील अभ्यासक्रम करत आले आहेत.
एक एक शिल्प तयार करण्यासाठी कलाकारांचे अनेक दिवस खर्ची पडतात. आपल्या देशाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जोपासण्यात शिल्पकारांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. देशातील सांस्कृतिक ठेवा जिवंत ठेवण्याचे श्रेय कलाकारांकडे जाते. त्यांच्या कलेमुळेच प्राचीन, पुरातन कला आजही अनुभवता येतात. खजुराहोचो मंदिर असो किंवा अजिंठा वेरूळच्या लेण्या. शिल्पकलेचा अजोड नुमना म्हणून याकडे पाहिले जाते. कलाकारांच्या अद्भूत निर्मिर्तीने जगाला भुरळ पडली आहे. गणेशोत्सव, दुर्गाउत्सव या काळातही शिल्प कलाकार, मूर्तीकार एकाहून एक सरस मूर्ती तयार करून भाविकांना आत्मिक समाधान देण्याचे काम करतात.
शिल्पकला, मूर्ती कला या केवळ आत्मभिव्यक्तीचे साधन नाही तर या कलेच्या आधारे कलाकारांनी देश- विदेशात आपली प्रतिभा सादर केली आहे. या कारणामुळेच आजची युवा पिढी या कलेकडे आकर्षित होत असून यात दमदार करिअर करण्याची संधी आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम – एक कुशल शिल्पकार, मूर्तीकार होण्यासाठी बॅचलर इन आर्ट किंवा व्हिज्युअल आर्टची पदवी किंवा पदविका प्राप्त करणे गरजेचे आहे. हे अभ्यासक्रम देशातील विविध विद्यापीठांत, कला महाविद्यालयांत शिकवले जातात. बी.एफ. इन स्कल्प्चर किंवा बी.व्ही.ए. इन स्कल्प्चर याबरोबरच मूर्तीकलेत मास्टर डिग्रीचा चार ते पाच वर्षांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. डिप्लोमा इन स्कल्प्चर आर्ट अभ्यासक्रम देखील विद्यापीठातून शिकवला जातो.
प्रशिक्षण : अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या बदलत्या ट्रेंडनुसार बेसिक प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना शिल्प, धातू, लाकूड, माती याबरोबरच आधुनिक काळानुसार फॅब्रिक, मेण, काचेच्या मदतीने देखील मूर्तीकाम केले जाते. प्रारंभिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या इच्छेनुसार विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतो.
पात्रता – पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्जदाराला बारावीची परीक्षा किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते. त्यानंतर मुलाखत होते. कला विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सवलत दिली जाते. मूर्तीकलेत उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याला 50 टक्के गुण असल्यास त्याला डॉक्टरेट करता येते. विद्यार्थ्यांत कल्पकता, निसर्गाची आवड, सौंदर्याची आवड, निरीक्षण क्षमता, संयमी, शिल्पकलेचे ज्ञान या गोष्टी असणे गरजेचे आहे. या गुणांच्या आधारे तो उत्तम मूर्तीकार, शिल्पकार होऊ शकतो.
करिअरची संधी – स्वयंरोजगार म्हणून स्वत:चा स्टुडिओ सुरू करता येतोे. देश-विदेशात होणार्या विविध प्रदर्शनांत सहभागी होऊन आपली शिल्पकला लोकांपर्यंत पोहोचवता येते. पदवीधारक शिल्पकार हा सांस्कृतिक आणि कला विभागात सल्लागार, संचालक तसेच शाळेत अध्यापनाचे काम करू शकतो. लष्करात देखील शिल्पकारांना पाचारण केले जाते. युद्धभूमीचे मॉडेल तयार करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाते. दुर्गम भागाचे चित्र साकारून तेथे रणनीती आखण्यासाठी लष्कर मूर्तीकारांची मदत घेतात. पदवी किंवा पदविकाधारक कलाकार आपल्या पात्रतेनुसार पाच ते 50 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळवू शकतात. सरकारदेखील स्वयंरोजगारासाठी कलाकारांना प्रोत्साहन देते. हे क्षेत्र भावनेशी जोडलेले आहे. त्यामुळे केवळ पैसा कमावणार्यांसाठी हे क्षेत्र नाही. मात्र, आता विचार बदलत आहे. देशातच नाही तर परदेशातही मूर्तीकारांना चांगली मागणी आहे. चांगल्या मूर्तींची किंमत ही हजारापासून लाख रुपयांपर्यंत असतात.
संस्था –
ललित कला महाविद्यालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली
रवींद्र भारती विद्यापीठ, जी.टी. रोड कोलकता
जामिया मिल्लीया इस्लामिया डिपार्टमेंट ऑफ फाईन आर्ट, मोहम्मद अली जोहर मागर्र्, जामियानगर नवी दिल्ली
कला विद्यापीठ, लखनौ
बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
अहलाबाद विद्यापीठ, अलाहाबाद
कला महाविद्यालय चंदिगड
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद
इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट, मोदीनगर
सर जे. जे. आर्ट कॉलेज, मुंबई