शहर नियोजनातील करिअर संधी | पुढारी | पुढारी

शहर नियोजनातील करिअर संधी | पुढारी

अपर्णा देवकर

नियोजन आणि रचनेशिवाय कोणतेही शहर किंवा नागरी वसाहत स्थापन होऊ शकत नाही. शहराचा आराखडा आणि नियोजन करण्यासाठी टाऊन प्लॅनरची गरज भासते. टाऊन प्लॅनर हा आर्थिकद‍ृष्ट्या योग्य आणि पर्यावरणपूरक शहर तयार करण्याची योजना आखत असतो. या आधारावर शहराची निर्मिती आणि विस्तार केला जातो. देशातील चंदीगड हे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळील लवासा असो, लोणावळ्याजवळील सहारा सिटी हे टाऊन प्लॅनिंगचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहता येतील. नगररचनाकार (टाऊन प्लॅनर) हा शहराची निर्मिती करणारे आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील दुवा असतो. 

शहर किंवा विकसित होणार्‍या भागांची गरज टाऊन प्लॅनरला ओळखावी लागते. त्याच्या अभ्यासानंतर जमिनीचा वापर कसा करावा, हे निश्‍चित केले जाते. हे काम अतिशय कौशल्यपूर्वक करावे लागते. यासाठी कुशल युवक-युवतींची गरज भासते. 

* पात्रता : यासाठी गणित विषयासह बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यानंतर आर्किटेक्चर किंवा डिझायनिंगमध्ये पदवी करू शकता आणि प्लॅनिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करू शकता. याशिवाय बी.टेक. किंवा बी.ई.ची पदवीबरोबरच प्लॅनिंगमध्ये एम.टेक. करता येते. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आर्किटेक्चर, अर्बन प्लॅनिंग, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, समाजशास्त्र, सिव्हिल इंजिनिअरिंग, अर्बन अँड रिझनल प्लॅनिंग आदी अभ्यासक्रम उपयुक्‍त ठरतात.

हे अभ्यासक्रम •बॅचलर इन आर्किटेक्चर •बॅचलर इन 

एन्व्हायर्न्मेंटल डिझाईन • बॅचलर इन प्लॅनिंग • एम.टेक. इन आर्किटेक्चर •मास्टर ऑफ प्लॅन इन अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग.

* प्रवेश परीक्षा : आयआयटीच्या एम.टेक. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. याशिवाय आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चरची परीक्षा द्यावी लागेल. 

या परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी रूरकी, सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई, चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एनआयटी तिरुचिरापल्ली, एनआयटी कालिकत आणि बीआयटी मेसरा येथे प्रवेश मिळतो. याशिवाय उत्तर प्रदेश राज्य प्रवेश परीक्षा, जादवपूर विद्यापीठ प्रवेश परीक्षा, तामिळनाडू कॉमन एंट्रेस परीक्षा देऊन स्थानिक कॉलेजमध्ये आर्किटेक्चरला प्रवेश मिळवता येतो. 

* कौशल्य : टाऊन प्लॅनर होण्यासाठी पर्यावरण कायद्याची संपूर्ण माहिती आवश्यक आहे. शहराची रचना करताना पर्यावरणाचे आकलन करावे लागते. याशिवाय बिल्डिंग आणि जॉयनिंग नियमांचीही माहिती असावी लागते. उमेदवाराचे ड्रॉईंग स्किल चांगले असणे गरजेचे आहे. शहराचे नियोजन करताना सर्व शहर उभारणीशी निगडित घटकांची काळजी घ्यावी लागते. अशा स्थितीत कुशल युवकाकडे विश्‍लेषणात्मक विचार करण्याची क्षमता असावी. ऐनवेळी उद्भवलेल्या समस्यावर तोडगा काढणे आणि कौशल्यपूर्वक एका प्रश्‍नाची उकल करणे या गोष्टीचा त्यात समावेश होतो. सरकार, स्थानिक प्रशासन आणि टाऊनशिप डेव्हलपरशी  संवाद साधण्याचे काम टाऊन प्लॅनरला करावे लागते. शहराचे नियोजन करताना रचनात्मकता असणेही तितकेच आवश्यक आहे. शहराचे नियोजन करता त्याला शहराचे उपलब्ध स्रोत, साधन याची चांगली माहिती असावी. 

* टाऊन प्लॅनरच्या जबाबदार्‍या : निवासी भाग, स्पोर्टस् आणि आरोग्य सुविधांशी निगडित योजना तयार करावी लागते. संबंधित भागातील पाणी, परिवहन, रस्ते यांसारख्या साधनांसाठी योजना तयार करावी लागते. शहराच्या विकासासाठी सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा करणे, बिल्डर आणि डेव्हलपरशी संवाद साधणे आणि नागरिकांच्या जमिनीचा उपयोग करून त्यानुसार योग्य रचना आखण्याचे काम टाऊन प्लॅनरला करावे लागते.

* पद : असिस्टंट प्लॅनर, असोसिएट सीनिअर प्लॅनर, अर्बन प्लॅनर, ग्राफिक डिझायनर, रिझनल डायरेक्टर, लँड यूज प्लॅनर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर यांसारख्या जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. 

* वेतन : टाऊन प्लॅनरला सुरुवातीला कमी वेतन मिळत असले तरी कालांतराने त्याच्या वेतनात वाढ होत जाते. अनुभवाच्या आधारावर हे वेतन वाढत जाते. 

Back to top button