मुलांचाच होतोय ‘गेम’!

तरुणाईसह लहान मुले ऑनलाईन गेमिंगच्या आहारी
kolhapur News
मुलांचाच होतोय ‘गेम’!
Published on
Updated on
पूनम देशमुख, कोल्हापूर

डिजिटल युगाने माणसाच्या हातात अख्खं विश्व आणून ठेवले आहे; मात्र याच तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करत लहान मुले आणि तरुणाई ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली आहेत. अ‍ॅडव्हेंचर, अ‍ॅक्शन आणि मल्टिप्लेअर गेम्सनी तरुण पिढीला इतकं आकर्षित केलं आहे की अनेकदा या गेम्सचा शेवट आर्थिक नुकसान किंवा जीवघेण्या निर्णयात होतो.अलीकडे अशाच घटना राधानगरी आणि नाशिकमध्ये घडल्या आहेत.

कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात एका शेतकर्‍याच्या मुलाने मोबाईल ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत काही अ‍ॅप्लिकेशन्स घेतले आणि क्षणभरात त्याच्या वडिलांच्या बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली. खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा उलगडला. बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा धडाच पालकांना मिळाला. दुसरीकडे नाशिकमध्ये आईचा एकमेव आधार असलेला एकुलता एक 16 वर्षीय मुलगा ऑनलाईन गेमच्या आडून खेळल्या जाणार्‍या जुगारासाठी जीवानिशी गेला. मोबाईलवर गेम खेळताना अचानक एक मोबाईल गेम अ‍ॅप डाऊनलोड करत त्यावर 1200 रुपये हरला. त्यानंतर घाबरून त्याने स्वतः गळफास घेत आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली .

हायटेक जमान्यात गेमिंगची एक वेगळीच इंडस्ट्री तयार झाली आहे. यामध्ये लहान मुलांपासून तरुणाईही जाळ्यात अडकली आहे. हे गेम ऑफलाईन पद्धतीने खेळले जात नाहीत तर ऑनलाईन पैशाचे व्यवहारही यावरून होतात. या अ‍ॅप्सकडून आर्थिक जोखीम असल्याचा संदेश मिळूनही त्याकडे अनेकजण कानाडोळा करतात. याला पालकही तितकेच जबाबदार ठरतात. ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम गंभीर आहेत. यासाठी पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही आता काळाची गरज बनली आहे.काही दिवसांपासून सायबर फ्रॉडच्या घटना वाढत आहेत. कोणताही ऑनलाईन गेम खेळताना एका प्रमाणाच्या बाहेर खेळणारा माणूस कधीच पैसे जिंकू शकत नाही, ही सिस्टीम त्या मोबाईज गेम अ‍ॅपमध्ये नियोजित केलेली असते. त्यामुळे काही काळानंतर पैसे गमवावे लागतात. यातून मानसिक त्रास, आत्महत्यापर्यंत प्रकरणे जातात. त्यामुळे अशा गेमपासून मुलांना दूर ठेवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news