

दिलीप भिसे, कोल्हापूर
प्रेमाने घायाळ कोवळ्या प्रेमवीराने प्रेयसीला खूश करण्यासाठी ‘चेनस्नॅचिंग’चा फंडा सुरू केला. कोल्हापुरी साज, सोन्याचे गंठण, सोनसाखळीसह महागड्या वस्तूही गर्लफ्रेंडला ‘गिफ्ट’ देण्याचा सपाटा लावला. आठ- दहा वर्षांत त्याने शंभरावर निष्पाप महिलांना हिसडा मारून त्यांच्या गळ्यातील दागिने पळविले. अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह सीमावर्ती भागात मार्निंग वॉक, बाजारपेठ, देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्याच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यासह किमती ऐवज हिसकावून दुचाकीवरून धूम ठोकण्याच्या एकापाठोपाठ एक घटना घडत होत्या. मध्यवर्ती चौकात घडणाऱ्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले होते.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या अमरावती येथील सराईत म्होरक्यासह त्याच्या पुण्यातील साथीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषणने बेड्या ठोकून दागिन्यांसह १५ लाखांचा ऐवज हस्तगत केला. वैभव नारायण आडोळे (वय २६, रा. येरला, ता. मोरशी, जि. अमरावती) व साथीदार करण गोरख जगधने (१९, रा. पिंपळवाडी पिराची, संभाजीनगर, मूळ औंध गावठाण, ता. हवेली, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर चोरट्यांचा छडा लागला. पुण्यातून पाठलाग करीत चोरट्यांना शिरवळ येथे जेरबंद करण्यात आले.
वैभव आडोळे, करण जगधने यांच्या चौकशीतील धक्कादायक माहितीमुळे मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषणची यंत्रणा चक्रावली. आठ ते दहा वर्षांच्या काळात म्होरक्यांवर ६० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहेत. त्यात सर्वाधिक चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय खून, खुनाचा प्रयत्न, गांजा तस्करी, चोरी, घरफोडी, मारामारींच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
म्होरक्या वैभव आडोळे मूळचा अमरावती जिल्ह्यातील. वडिलाेपार्जित दोन एकर शेती. वैभव लहान असताना त्याची आई घर सोडून गेली. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर कसे तरी त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याच्या वडिलांचेही निधन झाले. सावत्र आई, सावत्र भाऊ यांच्यात मतभेद सुरू झाले. वैभवने सवतासुभा घेतला. गावात मोबाईलचे दुकान सुरू केले. चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल खरेदी-विक्रीचा धंदा सुरू केला. चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली. त्यातून बाहेर पडला. नंतर मित्रासमवेत गांजा तस्करी सुरू केली.
पहिल्या भेटीतच पोरीवर फिदा!
पोलिसांना टीप मिळाली. त्यातून साथीदार जेरबंद झाले. वैभवला एका मित्राचा संशय आला. त्याच्यामुळेच पोलिसांनी आपणाला पकडले. या वादातून त्याने २०२१ मध्ये एका मित्राचा खून केला. तत्पूर्वी चेनस्नॅचिंगसह चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांतून त्याच्या वाट्याला सोन्या- चांदीचे दागिन्यांसह हातात पैसा खेळू लागला होता. चैनी, मौजमजा, ओल्या पार्ट्यावर उधळण होऊ लागली. याचकाळात १९ वर्षीय तरुणीशी त्याची नजरा-नजर झाली. पहिल्या भेटीतच वैभव फिदा झाला. त्याच्यात प्रेमाच्या आणाभाका सुरू झाल्या. गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी त्याने महागड्या वस्तू गिफ्ट देण्यास सुरुवात केली. सोन्याच्या विविध, आकर्षक दागिन्यांमुळे गर्लफ्रेंडही फिदा झाली. त्यात मुंबई, गोवा, पुण्यात त्याच्या सहली सुरू झाल्या. एकापाठोपाठ एक महागड्या गिफ्ट आणि किमती दागिन्यांमुळे गर्लफ्रेंडलाही भुरळ पडली. प्रियकर धनवान, बड्या घरातील श्रीमंत असावा, अशी तिची भावना झाली. अखेर अमरावती पोलिसांनी वैभवचे बिंग फोडून त्याला बेड्या ठोकल्या. चोरीच्या गुन्ह्यातील किमती दागिने हस्तगत केले. तरीही गर्लफ्रेंडने त्याचा पाठलाग सोडला नाही, अखेरपर्यंत त्याचा सिलसिला सुरूच राहिला.
चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक झालेल्या वैभवची दि. ४ एप्रिलला औरंगाबाद येथून सुटका झाल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी कोल्हापूर गाठले. चेनस्नॅचिंगचे गुन्हे करून तो पुन्हा गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी अमरावतीला परतला. तेथून गोवा गाठला. चैनी, कॅसिनोवर पैसे उधळले. संशयित वैभवने कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली, कराड, सिंधुदुर्ग येथील १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्यावर आजवर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगरसह कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ६० गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे.
अथक प्रयत्नांनंतर म्होरक्याचा छडा
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गळवे, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर कोल्हापूर पोलिसांनी कुख्यात ठरलेल्या आंतरराज्य टोळीचा छडा लावला.